फोटो व्हायरल करुन यू-ट्युबरकडून पाच लाखांची मागणी! संगमनेरातील धक्कादायक प्रकार; ‘शेरणी’ नावाच्या यू-ट्युबरसह तिघांवर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मित्रांच्या उपस्थितीत प्रेमसंबंधातून साखरपुडा झाला, मात्र व्यक्तिगत मतभेदातून लग्नं होवू शकले नाही. कालांतराने दोघांनीही आपापल्या परिने शुभमंगल करुन संसार थाटला. मात्र चार वर्षांनंतर मित्रांमधील मतभेदाचा फायदा घेत गेल्याकाही दिवसांत ‘शेरणी न्यूज’ नावाने सोशल माध्यमात ‘आपटबार’ फोडणार्या संगमनेरातील यू-ट्युबरने ‘त्या’ प्रसंगाचे फोटो व्हायरल करुन चक्क तक्रारदाराच्या नावानेच पाच लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणात त्यावेळी साखरपुडा झालेल्या तरुणाला कृष्णा सारडा या यू-ट्युबरने फोनवरुन तक्रारदारानेच आपल्या कार्यालयात येवून अशाप्रकारची मागणी केल्याची बतावणी केली. त्या प्रसंगाचे काही फोटोही तिने सोशल माध्यमातून प्रसारित केल्यानंतर गावठाणात राहणार्या एका 21 वर्षीय विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी सारडासह ओंकार राऊत आणि गोविंद नागरे अशा तिघांवर बलाद्ग्रहण करुन क्षति पोहाचवणे आणि बदनामी करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोषसिद्धी झाल्यास सात वर्षांपर्यंतची शिक्षा होवू शकते.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील 21 वर्षीय तक्रारदार महिलेचे एका तरुणाशी
प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांच्या कुटुंबाने दोघांचाही विवाह लावून देण्याचे मान्य केले होते. चार वर्षांपूर्वीच्या या सगळ्या घटनांक्रमात दोघांनीही कर्हे घाटातील एका मंदिरात जावून साखरपुडा केला. त्यावेळी त्यांच्यासोबत घुलेवाडीत राहणारा ओंकार मारुती राऊत आणि त्याची पत्नी असे चौघेच उपस्थित होते. दोघांमध्ये हार घालून पार पडलेल्या या ‘समाधान’ सोहळ्याची छायाचित्रे तक्रारदार महिलेच्या मोबाईलमधूनच चित्रित झाली होती. या नंतर महिन्याभराने दोघेही ओंकार राऊत याच्या घुलेवाडी येथील घरात असताना दोघांमध्ये जोरदार भांडणं झाले. त्यावेळी ओंकार आणि त्याच्या पत्नीने तक्रारदार महिलेचा मोबाईलही काढून घेतला होता. या प्रकारानंतर दोघांच्याही संबंधात कटुता आली आणि त्यांनी आपले संबंध संपुष्टात आणले.

गेल्यावर्षी तक्रारदार महिलेच्या कुटुंबांने दुसर्या मुलाशी तिचा विवाह लावून दिला. त्यानंतर आजवर दोघांमध्ये कधीही संभाषण झाले नसल्याचे तक्रारदार विवाहितेने आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे. सध्या सदरची विवाहिता माहेरी असून शुक्रवारी (ता.17) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तिच्या बहिणीने तिच्या पूर्व प्रियकराचा फोन आल्याबाबत तिच्याकडे विचारणा केली. त्याबाबत अनभिज्ञ असलेल्या विवाहितेने आपल्याला काहीच माहिती नसल्याचे व त्यांच्या सोबत कोणताही संपर्क नसल्याचे सांगितल्यानंतर हा सगळा प्रकार परस्पर नावाचा वापर करुन संगनमताने घडवून आणला गेल्याचे समोर आले. गेल्याकाही दिवसांत ‘शेरणी न्यूज’ या नावाने शहरातील काही घटनांवरुन आपटबार फोडणार्या कृष्णा सारडा या यू-ट्युबरने ‘त्या’ तरुणाला फोन करुन चार वर्षांपूर्वी त्याने ज्या तरुणीशी साखरपुडा केला होता ती आपल्या कार्यालयात येवून गेल्याचे व तिने त्यावेळचे फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची अन्यथा पाच लाख रुपये देण्याची मागणी केल्याचे सांगत अन्यथा बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी भरली.

यावेळी तक्रारदार, तिची बहिण व तो तरुण या तिघांमध्ये संभाषण होवून सगळा घटनाक्रम समोर उभा राहीला. त्यानुसार साखरपुड्याच्या ‘त्या’ प्रसंगानंतर त्याचे ओंकार राऊत सोबत बिनसले होते, तेव्हापासून दोघांमधील संभाषणही थांबले होते. त्यानंतर काही दिवसांनी गोविंद राम नागरे याच्याशीही त्याचे मतभेद झाले. त्यावेळी नागरेने तुमच्या त्यावेळच्या प्रसंगाचे फोटो ओंकार राऊत याने आपल्याला दिल्याचे सांगत योग्यवेळी बघतोच अशी धमकीही भरली होती. याचा अर्थ साखरपुडा मोडण्यापूर्वी झालेल्या भांडणावेळीच राऊतने आपल्या पत्नीच्या मदतीने तक्रारदाराचा मोबाईल काढून घेतला होता. त्याचवेळी त्यांनी त्यावेळचे फोटोही आपल्या मोबाईलमध्ये अपलोड करुन घेतल्याचा संशय आहे.

‘त्या’ तरुणाचे ओंकार राऊतनंतर गोविंद नागरेसोबत भांडणं होवून त्यांच्यात दुरावा झाल्यानंतर भांडणारे ‘ते’ दोघेही एकत्र झाले आणि त्यांनी ‘शेरणी’ नावाच्या यू-ट्युबरकडे याबाबतची वाच्चता केली. तिने सदरचे फोटो व्हायरल करण्यासह ‘शेरणी न्यूजवर’ त्याची ‘बातमी’ करायची नसेल तर, पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी दबाव म्हणून तिने सोशल माध्यमातील एका समूहात ‘त्या’ दोघांच्या कथीत साखरपुड्याची छायाचित्रे प्रसारित करुन त्यांची बदनामीही केली.

हा प्रकार समोर येताच 21 वर्षीय पीडितेने आपल्या बहिणीसह शहर पोलीस ठाण्यात येवून ओंकार मारुती राऊत (रा.घुलेवाडी), गोविंद राम नागरे
(रा.नेहरु चौक) व कृष्णा अजित सारडा (रा.अशोक चौक) अशा तिघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 356 (2), 308 (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोषसिद्धी झाल्यास आरोपींना सात वर्षांपर्यंतची शिक्षा आणि आर्थिक दंडही होवू शकतो. या घटनेने संगमनेर शहरासह संपूर्ण देशात उदंड झालेल्या यू-ट्युब वाहिन्या आणि त्यांचा भ्रष्ट मार्गाने पैसा कमावण्यासाठी होणारा वापर पुन्हा एकदा समोर आला असून या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या आरोपींच्या अटकेनंतर अनेक घटनांवरील ‘पडदे’ उठण्याची शक्यता आहे.

गेल्याकाही दिवसांत पत्रकारितेचा कोणताही गंध नसलेले अनेकजण केवळ ‘ग्लॅमर’ आणि त्यातून पैसा कमावण्याचे ‘तंत्र’ अवगत करुन 192 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या मराठी पत्रकारितेला नख लावण्याचे काम करीत आहेत. खरेतरं अशाप्रकारे बेकायदा माध्यमांचा वापर करुन खंडणीची मागणी आणि त्याची पूर्तता व्हावी यासाठी एखाद्याच्या चारित्र्यावर उघड शिंतोडे उडवण्याचा हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. अशा घटनांमधून उभयतांचे आयुष्य उध्वस्त होण्याचाही धोका असतो. उपविभागीय अधिकार्यांनी आपल्या कायदेशीर शक्तिचा वापर करुन अशाप्रकारे केवळ चारित्र्य हनन करण्यासाठी कार्यरत असलेल्या माध्यमांवर अंकुश लावण्याची गरज आहे.

