अखेर प्रस्तावित ‘सेमी हायस्पीड’ रेल्वेमार्ग गुंडाळण्याचा निर्णय! संगमनेर-सिन्नरकरांचा अपेक्षा भंग; आमदार सत्यजीत तांबे यांचा आंदोलनाचा पवित्रा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या साडेतीन दशकांपासून सातत्याने मागणी होत असलेला आणि तत्वतः मंजुरीनंतर भूसंपादनाच्या कामाला वेग आलेला पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अखेर गुंडाळण्यात आला आहे. खुद्द रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनीच याबाबतची अधिकृत घोषणा केली असून नारायणगाव जवळील ‘जीएमआरटी’ प्रकल्पाला बाधा निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन प्रस्तावित मार्गात बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता पुण्याहून अहिल्यानगर, शिर्डी आणि नाशिक अशा पर्यायी मार्गाचा विचार करुन सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाने संगमनेर व सिन्नर तालुक्यातील रेल्वेप्रेमींचा अपेक्षा भंग झाला असून या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनीही नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासह प्रसंगी सर्वपक्षीय कृती समितीद्वारा जनआंदोलन उभारण्याचा पवित्राही जाहीर केला आहे.


मागील साडेतीन दशकांहून अधिक काळापासून पुणे व नाशिक या दोन महानगरांना सरळ रेषेत जोडणारा रेल्वेमार्ग व्हावा यासाठी सातत्याने मागणी होत आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पाच्या मागणीला जोर चढल्याने विविध सर्वेक्षणानंतर 235 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गाला तत्वतः मंजुरी मिळाली होती. त्यामुळे मागील कालावधीत या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादन करण्याच्या कामालाही चांगलाच वेग आला होता. मात्र दीड वर्षांपूर्वी नारायणगावमधील खोडद जवळ असलेल्या ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)’ या प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांनी त्यावर आक्षेप घेत हा रेल्वेमार्ग प्रकल्पाजवळून गेल्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती. तेव्हापासून या प्रकल्पाचे काम पूर्णतः थांबवण्यात आल्याने तो अधांतरीत बनला होता.


याबाबत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी गेल्या सहा महिन्यात रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची वारंवार भेट घेवून प्रस्तावित मार्गामुळे पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील अविकसित तालुक्यांचा विकास होवून मोठ्या संधी निर्माण होणार असल्याने प्रस्तावित मार्गात कोणताही बदल न करता त्याला गती देण्याची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकल्पाबाबत अनिश्‍चितता निर्माण होवूनही आशा मात्र कायम होती. त्यातच मध्यंतरी या मार्गात काहीअंशी बदल करुन तो जीएमआरटी प्रकल्पाला वळसा घालून नेण्याची चर्चाही समोर आल्याने जवळजवळ बांसनात गेलेल्या या प्रकल्पाबाबत या तिनही जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात थोडीफार शक्यता टिकून होती, मात्र शनिवारच्या (ता.11) रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्या वक्तव्याने ती देखील संपुष्टात आली आहे.


पाषाणमधील ‘सी-डॅक’ संस्थेला भेट देण्यासाठी शनिवारी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या कामकाजासह विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी खोडद जवळील जीएमआरटी प्रकल्पाचा उल्लेख करीत रेल्वे मंत्रालयाने तत्वतः मान्यता दिलेल्या ‘पुणे-नाशिक’ या पहिल्या सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे जीएमआरटी प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली. त्यासोबतच स्थानिक शेतकर्‍यांनी भूसंपादनाच्या कामास विरोध दर्शवल्याने गेल्या दीड वर्षांपासून या प्रकल्पाचे काम थांबल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.


‘जीएमआरटी’ प्रकल्प केवळ भारतासाठीच नव्हेतर 23 देशांतील वैज्ञानिकांसाठी महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे. रेल्वेमार्गासाठी या प्रकल्पाचे स्थलांतर करणं म्हणजे देशातील सर्वात शक्तिशाली वैज्ञानिक केंद्राची क्षमता कमी करण्यासारखे होईल असे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी यावेळी सांगितले. प्रस्तावित असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गामुळे या केंद्रावरील रेडिओ लहरी प्रभावित होवून संशोधनाला अडसर निर्माण होवू शकतो. सध्या पुणे-दौंड-अहिल्यानगर-मनमाड हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आहे. त्यामुळे जीएमआरटी प्रकल्पाला धक्का न लावता नव्याने पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक अशा पर्यायी रेल्वेमार्गाचा प्रकल्प आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी पत्रकारांना दिली.


रेल्वेमंत्र्यांच्या या घोषणेने गेल्या साडेतीन दशकांपासून ‘झुकझुक गाडीचे’ स्वप्नं पाहणार्‍या सिन्नरसह संगमनेर, आळेफाटा, जुन्नर, नारायणगाव व मंचर तालुक्यातील नागरिकांची घोर निराशा झाली असून मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. लोकसभावनांचा विचार करुन या तालुक्यातील लोकप्रतिनिधीही आता आक्रमक होवू लागले असून प्रस्तावित मार्गात कोणताही बदल मान्य करणार नाही असे म्हणतं त्यांच्याकडून आंदोलनाची भाषाही व्यक्त होवू लागली आहे. त्यामुळे आगामी कालावधीत ‘पुणे-नाशिक व्हाया संगमनेर-सिन्नर’ या रेल्वेमार्गासाठी व्यापक जनआंदोलन उभे राहण्याचीही शक्यता आहे.


पुणे-मुंबई-नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचा विकास व्हावा यासाठी ‘पुणे-नाशिक’ हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्वाचा आहे. संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले, मात्र रेल्वेमार्ग नसल्याने त्याचा अहिल्यानगर जिल्ह्याला काहीच फायदा झाला नाही. पुणे-मंचर-नारायणगाव-संगमनेर-सिन्नर-नाशिक या भागाचा विकास आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीनेही हा सरळ रेल्वेमार्ग खूप आवश्यक आहे. त्याशिवाय पुण्यासारख्या शहरातील स्थलांतराचा ताणही त्यामुळे कमी होवू शकतो. यापूर्वी आपण या रेल्वेमार्गात येणार्‍या चारही लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींना भेटून त्यांना केंद्र सरकारकडे त्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. यासोबतच या तीनही जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, आर्थिक संस्थांमध्ये काम करणार्‍या सर्व पक्षीयांना सोबत घेवून लवकरच कृती समिती तयार करुन त्यासाठी आंदोलन उभारणार आहे.
आमदार सत्यजीत तांबे
सदस्य – विधान परिषद

b

Visits: 423 Today: 2 Total: 1423329

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *