भाविकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा ः थोरात संगमनेर येथील लिबर्टी अर्थवेअर आर्टला भेट देत केले आवाहन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
यंदाचा गणेशोत्सव भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला येत आहे. हा गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने पर्यावरणपूरक साजरा करावा. ध्वनी, जल व इतर कोणतेही प्रदूषण होणार नाही याची भक्तांनी काळजी घ्यावी. गणेशोत्सवात मातीपासून बनविलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर येथील लिबर्टी अर्थवेअर आर्ट या लाल व शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविणार्या कारखान्यास भेट देतेवेळी मंत्री थोरात यांनी गणेशभक्तांना वरील आवाहन केले. तसेच पर्यावरणपूरक मूर्ती बनविणार्या लिबर्टीच्या संचालक व कामगारांचे तोंड भरुन कौतुक केले.

याप्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, संगमनेर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष भाऊसाहेब एरंडे, उद्योजक भाऊसाहेब जाधव, लिबर्टी अर्थवेअर आर्टच्या संचालिका वंदना जोर्वेकर, महाव्यवस्थापक भानुदास उपाध्ये, सहाय्यक महाव्यवस्थापक सदाशिव मुळे, उत्पादन व्यवस्थापक हेमंत जोर्वेकर, बाबाराजे शेवाळे, काराखाना व्यवस्थापक अर्चना जेडगुले, निकिता जेडगुले, सरला जेडगुले, सुरेखा बोर्हाडे, सुनीता बढे, स्वाती गोफणे व कामगार उपस्थित होते.

अद्यापही कोरोना संकट टळलेले नसून, यामध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने गणेशभक्तांनी स्वच्छतेच्या दृष्टीने सर्व काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच प्रदूषण टाळण्यासाठी इको फे्ंरडली गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर व स्वयंसेवी दरवर्षी भाविकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करतात. त्यानुसार यंदाही हे आवाहन करण्यात आले आहे.
