प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास पत्रकार जबाबदार नाही : यमाजी मालकर व्हॉईस ऑफ मीडियाकडून पत्रकारांचा गौरव; श्याम तिवारी, सुनील नवले व विलास गुंजाळ यांचा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशात खूप वेगाने बदल घडताहेत, त्याचे आपल्याला आकलन करता आले नाही तर आपण खूप मागे राहण्याची शक्यता आहे. देशात होत असलेल्या या बदलांची माहिती आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे. आपल्या आजुबाजूला घडणार्या किती घटनांची दखल आपण घेतोय असा प्रश्न पत्रकाराने स्वतःलाच विचारला पाहिजे. हल्ली बदलांची माहिती वाचकांना पटवून देताना त्याचा आपल्याशी मात्र काहीच संबंध नाही असे विरोधाभासी चित्रही अनेक ठिकाणी बघायला मिळते. वेगात बदलत असलेल्या जगाबरोबर आपणही बदललं पाहिजे, मात्र त्यासोबत वाहत जाणंही कामा नये असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर यांनी केले.

व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने संगमनेरातील श्याम तिवारी, सुनील नवले व विलास गुंजाळ या तिघांचा कार्यगौरव पुरस्कार देवून त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजीत तांबे, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी सदस्य मधुसूदन नावंदर, प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड व संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने आदी मंचावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मालकर म्हणाले की, सोशल माध्यमांचा किती वापर करायचा हे समजण्याची खूप गरज आहे. या कारणाने आज शहरातील माणसं नैराश्याच्या गर्तेत सापडले असून त्यांना औषधाच्या गोळ्या खाव्या लागत आहेत. त्या मागील कारणांची मीमांसा करता सोशल माध्यमांचा अतिरेकी वापर, एकमेकांशी तुलना, जे दिसतंय ते आपल्याला मिळालंच पाहिजे अशा अपेक्षेतून या सगळ्यांना मनात खोलवर नेण्याची वृत्ती बळावत आहे. कोणताही आधार नसलेल्या गोष्टीतून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरु आहे. आज मतमतांतराचा इतका गलबला झालाय की, आपण सोशल माध्यमातील गोष्टीही मनाला लावून घेत आहोत. हा प्रकार नैराश्याच्या दिशेने घेवून जाणारा असल्याचे ते म्हणाले.

प्रत्येकाला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विचार आहेत. मात्र सोशल माध्यमातील या गलबल्याला आपणच जबाबदार आहोत असा समज करुन घेणं चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी पत्रकारांची नाही. पत्रकारांसमोर जो विषय येतो, तो उत्तम पद्धतीने वाचकांसमोर पोहोचवण्याचे काम पत्रकारांचे आहे. कोणताही पत्रकार सगळ्याच विषयातील तज्ञ नसतो, त्यामुळे जो तज्ञ आहे त्याच्याकडून ती माहिती मिळवून लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पत्रकाराने पार पाडावी अशी अपेक्षाही मालकर यांनी यावेळी व्यक्त केली.

पत्रकारांची दृष्टी व्यापक असण्याची खूप गरज आहे. अलिकडच्या काळात जात आणि धर्माच्या निकषावर, सोशल माध्यमावर आणि माध्यमांवर ज्या प्रमाणे गट तयार होतात त्यापासून पत्रकारांनी दूर राहीले पाहिजे. पक्ष, जात, धर्म यापासून पत्रकारांनी नेहमी अंतर राखायला हवे. या क्षेत्रात काम करणार्यांची दृष्टी व्यापक नसेल तर अशा व्यक्ति फारकाळ या क्षेत्रात तग धरु शकणार नाही असे रोखठोक मतही मालकर यांनी व्यक्त केले. सध्याच्या काळात इतके विषय समोर येत आहेत की, प्रत्येक विषयाला पत्रकार न्याय देवू शकत नाहीत. पण जनमानसात असा प्रघात निर्माण झालाय की, पत्रकारांनी सगळ्या विषयात लिहिलं पाहिजे ही आजच्या काळातील कमीपणाची गोष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

पत्रकारांच्या दृष्टीने स्थानिक भूमिका घेणं अपरिहार्य असते. मात्र अशी भूमिका घेताना त्याचा संबंध राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काय आहे याचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. नगर जिल्ह्यात मात्र या भूमिकेचा कडेलोट झाल्याचे सांगत त्यांनी पाणी प्रश्नावरुन नगर विरुद्ध मराठवाडा वादाचा दाखलाही दिला. एखाद्या आमदार, खासदाराची मागणी आहे किंवा जिल्ह्यातील लोकांचा मानस आहे म्हणून आपण एखादी लोकप्रिय भूमिका घेतोय की खरोखरी आपण वस्तुस्थितीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय असा प्रश्न पत्रकारांच्या मनात निर्माण व्हायला हवा अशी अपेक्षाही मालकर यांनी यावेळभ बोलताना व्यक्त केली.

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, पत्रकारांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितले जातं असले तरीही आपल्या जीवानात सर्वत्र लोकशाही आहे, मग आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो. त्यात शिर्डीच्या प्रसादालयात भोजन घेणार्या माणसापासून अदाणी-अंबाणीपर्यंत कोणीही त्याशिवाय राहु शकत नाही असे सांगत त्यांनी माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन त्यांना चिमटाही काढला. जीथे लोकशाही येते तीथे चारस्तंभ निश्चितच येतात. त्यातील चौथा स्तंभ पत्रकारितेचा असून पत्रकारांची भूमिका ‘वॉच डॉग’ सारखी असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या काळात पत्रकारिता क्षेत्र सोपे राहिले नसल्याचे सांगताना आमदार तांबे यांनी दिवसोंदिवस या क्षेत्रात होत असलेले बदल विशद् करताना पूर्वीच्या काळी बातमी पाठवण्यासाठी पत्रकारांच्या धावपळीचे काही दाखलेही जोडले. या क्षेत्रात ज्या पद्धतीने बदल घडताहेत, त्या प्रमाणे वाचकांच्या आवडी-निवडीही बदलत असून आजच्या वाचकांना घटनेनंतर लागलीच ‘ब्रेकींग न्यूज’ आणि तत्काळ त्याचे विश्लेषण हवे असल्याचे त्यांनी सांगितले. संगमनेरात जुन्या आणि नव्या पत्रकारांची चांगली सांगड असून पूर्वीचा जुना आणि आत्ताचा आधुनिक काळ अनुभवणारे पत्रकार सोबत काम करीत असल्याचे समाधानही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. काही माणसं अशी असतात जी योगायोगाने तालुक्याच्या ठिकाणी अडकून जातात, त्यातील आजचे तिघेही सत्कारार्थी असल्याचे सांगत ही माणसं एखाद्या महानगरात गेली असती आणि राज्यपातळीवर त्यांनी लिखाण केलं असतं तर ती आज खूप मोठ्या पदावर गेली असती असे गौरोद्गारही त्यांनी यावेळी बोलताना काढले.

यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेरच्या सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य करीत संसदेत मांडलेल्या विविध प्रश्नांचा दाखला दिला. पत्रकारांच्या विविध समस्या आपण सभागृहात यापूर्वीही मांडल्या आणि यानंतरही मांडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. गोरक्षनाथ मदने यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. बाळासाहेब गडाख व संदीप वाकचौरे यांनी पाहुण्याचा तर, नीलिमा घाडगे, भारत रेघाटे व गोरक्ष नेहे यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करुन दिला. विजय पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर, आनंद गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला संगमनेर व अकोले तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

