तिरंगा रंगाच्या फुग्यांनी केला तब्बल 165 किलोमीटरचा प्रवास सुकेवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अनेकांना प्रवास करायला आवडतो परंतु चक्क निर्जीव फुग्यांनी प्रवास करावा आणि तोही थोडा थोडका नव्हे तर तब्बल 165 किलोमीटरचा. होय, ही गोष्ट थोडी विचित्र वाटत असली तरी अगदी खरी आहे. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आकाशामध्ये तिरंगी रंगाचे फुगे सोडले होते. ते तब्बल 165 किलोमीटरचा प्रवास करुन नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील शेतकर्याच्या शेतात पडले.
यावर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने देशभर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. त्यानुसारच सुकेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने स्वातंत्र्य दिनी आकाशामध्ये तिरंगी फुगे सोडण्याचा उपक्रम केला. ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हे तिरंगी फुगे आकाशात सोडून दिले. त्यानंतर बघता बघता ते नजरेआड गेले. परंतु कार्यक्रम संपायच्या आतच ते फुगे नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती या गावातील शेतकरी सोमनाथ टाके यांच्या शेतामध्ये 165 किलोमीटरचा प्रवास करुन विसावले.
शेतकरी टाके व त्यांची मुलगी झानेश्वरी, मुली प्रथम व प्रतीकने कुतूहलाने ते पाहिले. त्यानंतर सुकेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका बेबी जाधव यांना अतिशय आनंदाने माहीती दिली. या उपक्रमाबद्दल शाळेचे भरभरुन कौतुक केले. मुख्याध्यापक बेबी जाधव, शारदा मोरे, एकनाथ लोंढे, राजू आव्हाड, शैला मुंगसे, मनीषा लोंढे, स्वाती व्यवहारे, अशोक माळी, अविनाश उगले व सुभाष वाघुले यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. तर नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ कोटकर, उपाध्यक्ष अरुण शेटे, सचिन गुंजाळ, मंगेश सातपुते, संदीप सातपुते, लक्ष्मण कुटे, पोलीस पाटील किशोर शेटे, ग्रामसेविका गोर्डे, सरपंच योगिता सातपुते, उपसरपंच सुभाष कुटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, छावा संघटेनेचे जिल्हा उपाध्याक्ष खंडू सातपुते, नानासाहेब कुटे, गोरख सातपुते आदिंनी केले होते. या फुग्यांच्या प्रवासाची सध्या जिल्हाभर चर्चा होत आहे.