प्रदीप पिडियार (महाराज) यांचे निधन! हृदयविकाराचा तीव्र धक्का; भजन सम्राट हरपला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजस्थानी सेन समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शहरात भजनसम्राट म्हणून लौकीक असलेले नामांकित आचारी प्रदीप पिडियार (वय 60) यांचे आज पहाटे निधन झाले. सकाळी त्यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संगमनेरकर एका उत्कृष्ट भजन गायकासह निष्णात आचार्‍याला मुकले आहेत अशी भावना परिसरातील नागरिकांसह शहरातून व्यक्त होत आहे.

कवी प्रदीप यांच्या भजनांचा विशेष लळा असलेले प्रदीप पिडियार गेल्या अनेक दशकांपासून संगमनेर तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये होणार्‍या संकिर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे. त्यांचा पहाडी आवाज आणि त्यातून सादर होणारे एकतारी भजन श्रवणे म्हणजे उपस्थितांसाठी पर्वणीच ठरायची. याशिवाय ते स्वयंपाकातही खूप पारंगत होते. त्यातूनच त्यांनी अनेक वर्ष केटरींगचा व्यवसायही केला. कोविड संक्रमणानंतर अस्तव्यस्त झालेल्या नागरी जीवनातून सावरताना त्यांनी लाल बहाद्दूर शास्त्री चौकात साबुदाणा वडा सेंटर सुरु केले होते. त्यांच्या हाताला असलेल्या चवीने अल्पावधीतच त्यांनी या व्यवसायात आपला जम बसवला.

राजस्थानी ब्राह्मण समाजाच्यावतीने दरवर्षी होळी ते रंगपंचमी या कालावधीत होणार्‍या होलिका उत्सवातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. राजस्थानी शैलीतील होळीची गाणी म्हणण्यातही त्यांचा खास हातखंडा होता. त्यातूनच हा उत्सव उत्तरोत्तर उंचीवर पोहोचला होता. अतिशय धार्मिक वृत्ती असलेल्या पिडियार यांची ब्रह्मलिन बहिरेबाबा (कपिल आश्रम) यांच्यावर खूप श्रद्धा होती. त्यांच्यासोबत त्यांनी देशातील अनेक तीर्थस्थळांसह कुंभमेळ्याच्या वार्‍याही केल्या होत्या. यावेळी प्रयागराज येथे होणार्‍या कुंभमेळ्यात जाण्याचीही त्यांची तयारी होती, मात्र तत्पूर्वीच काळाने त्यांचा मार्ग रोखला.

आज (ता.9) पहाटे सहाच्या सुमारास छातीत वेदना होत असल्याचे त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले. त्यानंतर त्यांना त्यांचे मोठे बंधू बाळासाहेब व त्यांच्या पुतण्यांनी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी यासह मोठा भाऊ, भावजयी, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी 5 वाजता संगमनेरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Visits: 692 Today: 1 Total: 2124474

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *