बुडीत वाहनासह चालक सापडला मात्र एकजण अद्यापही बेपत्ताच! ठाण्याच्या जवानांचा मुक्काम; सलग तिसर्या दिवशीही शोध मोहीम सुरुच

नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्यदिनी जोर्वे-पिंपरणे रस्त्यावरील पुलावरुन प्रवरानदीच्या पात्रात वाहून गेलेल्या मालवाहतूक टेम्पोसह त्याच्या चालकाचा मृतदेह तब्बल 48 तासांनंतर पाण्याबाहेर काढण्यात प्रशासनाला बुधवारी रात्री यश आले. स्थानिक प्रशासनाच्या मंगळवारपासून सुरु असलेल्या शोधकार्यास यश मिळत नसल्याने बुधवारी ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन समूहाला पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी सुरु केलेल्या मोहीमेला रात्री दहाच्या सुमारास यश आले. मात्र पाण्याबाहेर काढलेल्या वाहनात केवळ एकच मृतदेह आढळल्याने बुधवारी अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आलेली शोधमोहीम आज सकाळपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सध्या ठाण्याचे पथक स्थानिक प्रशासनासह ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य करीत आहे.

गेल्या सोमवारी (ता.15) अवघा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना तालुक्यातील जोर्वे-पिंपरणे रस्त्यावर सदरची वेदनादायी घटना घडली होती. मूळच्या जालना जिल्ह्यातील शेवली येथील प्रकाश किसन सदावर्ते हा टेम्पोचालक नाशिकमधील बिटको येथून सुभाष आनंदराव खंदारे व अमोल अरुण खंदारे या काका-पुतण्यांना सोबत घेवून तालुक्यातील ओझर खुर्द येथील संदीप नागरे यांच्या खिडकीच्या काचा पोहोच करण्यासाठी रात्री आठच्या सुमारास आले होते. गाडीतील काचा खाली केल्यानंतर संगमनेरला जायचे असल्याचे सांगत ते कनोलीमार्गे जोर्वे-पिंपरणे रस्त्याने निघाले असता रात्री नऊच्या सुमारास त्यांचे वाहन पिंपरणे शिवारातील प्रवरानदीच्या पुलावर आल्यानंतर चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने ते पुलाच्या कठड्यांना धडकून पात्रात पडले आणि बुडाले.

या अपघातात वाहनातील अमोल अरुण खंदारे हा तरुण मात्र आश्चर्यकारकपणे बुडत्या वाहनाच्या खिडकीतून बाहेर पडला आणि पोहोत काठावर आला. तेथून पायी चालत संगमनेरात पोहोचला व तेथून थेट नाशिकला निघून गेला. दुसर्या दिवशी सकाळी पुलाचे कठडे तुटलेले पाहून स्थानिकांनी अपघाताची शक्यता वर्तविल्यानंतर तालुका पोलिसांनी जलद हालचाली करीत सुरुवातीला स्थानिक पातळीवर शोधमोहीम राबविली. मात्र नदीपात्रात प्रचंड पाणी असल्याने दिवसभर शोध घेवूनही बुडीत वाहनासह त्यातील व्यक्तिंचा शोध लागला नाही. त्यामुळे प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून मदत मागितली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पाच वाजता ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक संगमनेरात दाखल झाले व त्यांनी सायंकाळी सहा वाजेपासून शोधमोहीम सुरु केली.

बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शोधकार्याला यश मिळाले आणि सोमवारी रात्री नऊ वाजता बुडालेला टेम्पो अखेर पाण्याबाहेर काढण्यात आला. मात्र या टेम्पोत केवळ चालकाचाच मृतदेह मिळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी मात्र कायम राहीली. त्यामुळे रात्री साडेदहाच्या सुमारास अंधाराच्या कारणाने शोधकार्य थांबविण्यात आले. आज सकाळी स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा ‘सर्च ऑपरेशन’ सुरु केले असून माध्यान्नाच्या सुमारास ठाण्याचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून जागोजागी पाण्यात कॅमेरा सोडून मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. लवकरच बेपत्ता असलेले सुभाष खंदारे हाती लागतील असा विश्वास शोधपथकातील कर्मचार्यांनी व्यक्त केला आहे.

आपत्तीच्या वेळी नागरिकांना तत्काळ दिलासा मिळावा यासाठी तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची बांधणी केली गेली आहे. मात्र ही बांधणी केवळ कागदोपत्रीच असल्याची धक्कादायक बाब या घटनेच्या माध्यमातून ठळकपणे समोर आली. अशाप्रसंगी शोधकार्य करताना बाह्यमदत घ्यावी लागत असते, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद होण्याची गरज असताना स्थानिक आपत्ती समूहांसाठी तो उपलब्धच नसल्याने या शोधमोहीमेसाठी वापरण्यात आलेले जेसीबी यंत्र व पोकलेन मशिनचे भाडेही स्थानिक नागरिकांना वर्गणीतून द्यावे लागल्याचे धक्कादायक वास्तवही या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे राज्यात संकटसमयी मदतीसाठी ‘तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम’ तयार करण्यात आल्या असल्या तरीही त्यांना आर्थिक बळ मात्र देण्यात आलेले नाही.
