मुलींची छेड काढणार्यास जमावाने चोपून काढले! बसस्थानकावरील प्रकार; ‘पोक्सो’तंर्गत गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठवड्यात राजगुरुनगरमध्ये घडलेल्या अत्याचारातून खुनाचे पडसाद अद्यापही उमटत असताना संगमनेरातूनही आता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत खासगी अभ्यासिकेतून बसस्थानकावर आलेल्या तीन अल्पवयीन मुलींना पाहुन एका विकृताने अश्लिल हातवारे करीत त्यांचा पाठलाग केला व त्यातील एका मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार केला. अतिशय गर्दीच्या परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या संतापजनक प्रकारानंतर ‘त्या’ मुलींनी आरडाओरड केल्याने विकृत आरोपीने तेथून पळ काढला, मात्र तेथे जमलेल्या नागरिकांनी पाठलाग करीत त्याला पकडून बेदम चोपून काढले. त्यानंतर आलेल्या पोलिसांनी जमावाच्या गराड्यातून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी तालुक्यातील एका अल्पवयीन पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन आदेश राजेंद्र वाडेकर या विकृतावर विनयभंगासह पोक्सोतंर्गत कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड करण्यात आले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार सोमवारी (ता.6) संगमनेर बसस्थानकावरील नवरत्न चहा सेंटर समोर घडला. या घटनेत इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणार्या तालुक्यातील तीन मुली खासगी अभ्यासिकेतील अभ्यास उरकून बसने आपल्या घराकडे जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या. यावेळी त्या वरील चहाच्या दुकानासमोर उभ्या असतानाच आरोपी आदेश राजेंद्र वाडेकर हातात चहाचा कप घेवून त्यांच्या शेजारी उभा राहीला व काही वेळातच तो ‘त्या’ तिघींमधील एकीकडे पाहुन अश्लिल हातवारे करीत ‘फोन करण्याचा’ इशारा करु लागला. त्यामुळे तिनही मुली घाबरल्या व त्या तेथून निघून जावू लागल्या.

मात्र त्यानंतर त्या विकृताने त्यांचा पाठलाग करीत पुन्हा त्या तिघीतील एकीचा हात पकडला. मात्र वेळीच तिने त्याच्या हाताला हिसका देत त्याच्या तावडीतून सुटका करीत आरडाओरड केली. त्यामुळे आसपासच्या नागरिकांनी तत्काळ त्यांच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत आता आपली लोकांच्या तावडीतून सुटका होणार नाही याची कल्पना आलेला ‘तो’ विकृत तेथून पळून जावू लागला. मात्र घडला प्रकार लक्षात आल्यानंतर जमलेल्या नागरिकांमधील काहींनी त्याला पाठलाग करीत शासकीय विश्रामगृहाजवळ गाठून बेदम चोपायला सुरुवात केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसानेही तत्काळ तेथे धावत जावून आरोपीला पकडून ठेवले. मात्र उपरांतही जमावाकडून त्याला चोप देण्याचा प्रकार सुरुच होता.

याबाबतची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख पोलीस ठाण्यात सुरु असलेला पत्रकार दिनाचा कार्यक्रम सोडून लागलीच घटनास्थळाकडे धावले. यावेळी जमावाकडून आरोपीला भररस्त्यातच मारहाण सुरु होती, त्यामुळे बसस्थानकाजवळील महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीही झाली होती. त्यामुळे पोलिसांना रिक्षाथांब्याजवळच आपले वाहन उभे करुन शासकीय विश्रामगृहाजवळ जावे लागले. पोलीस आल्यानंतर जमलेला जमाव काही प्रमाणात पांगला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आदेश राजेंद्र वाडेकर (रा.चास पिंपळदरी, ता.अकोले) या विकृता विरोधात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला गजाआड करण्यात आले आहे.

सोमवारी सायंकाळी प्रचंड गर्दीच्यावेळी बसस्थानकावर घडलेल्या या घटनेतून शहरात संताप निर्माण झाला असून प्रचंड गर्दी असतानाही आरोपीकडून अल्पवयीन मुलींचा पाठलाग आणि थेट हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्याच्या प्रकाराने नागरिकांमध्ये रोष उसळला आहे. या प्रकरणातील विकृताला कठोर शासन व्हावे ज्यायोगे पुन्हा असा प्रकार घडणार नाही अशी मागणीही आता समोर येत असून संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनीही या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधून दोषीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

