विणकर सहकारी सोसायटीवरील प्रशासकीय कारकीर्द संपुष्टात! सुनील मादास यांची अध्यक्षपदी तर पापय्या शिरसुल्ला यांची उपाध्यक्षपदी निवड..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या विणकरांसाठी स्थापन झालेल्या विणकर सहकारी हौसिंग सोसायटीवरील असंतुष्टांचे विघ्न अखेर टळले आहे. गेल्या पाच वर्षांपासून सहकारी उपनिबंधक कार्यालयाच्या निगराणीखाली असलेल्या या संस्थेच्या संचालक मंडळासाठी निवडणुकही जाहीर झाली होती, मात्र समाजाने नऊ संचालकांची बिनविरोध निवड केली. तर, संचालक मंडळाच्या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी सुनील मादास व उपाध्यक्षपदी पापय्या शिरसुल्ला यांची एकमताने निवड करण्यात आली. सदरील संस्थेच्या माध्यमातून हलाखीचे जीवन जगणार्या विणकरांसाठी हक्काची घरे देण्याचा प्रयत्न होता, मात्र काहींनी त्यात खोडा घालून निवडणूक प्रक्रिया टाळण्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत आटापीटा केला, परंतु त्यांना त्यात यश आले नाही.
वर्षोनुवर्ष हातमागाच्या व्यवसायावर जीवन जगणार्या पद्मशाली समाजातील गरीब बांधवांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी 1970 साली संगमनेरात विणकर सहकारी हौसिंग सोसायटीची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरीब घटकांना घरे देण्याचा मुख्य हेतू होता. मात्र समाजातील काही विघ्नसंतोषी घटकांनी वारंवार त्यात अडथळे आणून आपला स्वार्थ साधण्यासाठी जीवाचा आटापीटा केला. त्यातून वाद निर्माण झाल्याने पाच वर्षांपूर्वी या संस्थेवर सहकारी उपनिबंधक कार्यालयाने आर. बी. वाकचौरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली, तेव्हापासून या संस्थेवर प्रशासक राज होते.
या काळात समाजातील बहुतांशी घटकांनी संस्थेचे कामकाज सुरळीतपणे सुरु व्हावे व त्यातून समाजातील गरजू घटकांना हक्काची घरे मिळावीत यासाठी आपला लढा सुरु ठेवला. सहकारी उपनिबंधक कार्यालयानेही कागदपत्रांची पडताळणी करुन संस्थेच्या कामकाजात वारंवार अडथळे निर्माण करणार्या झारीतील शुक्राचार्यांचा संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचा निष्कर्ष काढला आणि अशा प्रवृत्तींकडून निर्माण केलेले अडथळे आपसूक दूर झाले. त्यानंतर या संस्थेच्या नऊ संचालकांसाठी निवडणुकही जाहीर करण्यात आली. येथेही ‘त्या’ प्रवृत्तींचा विरोध उफाळून आला आणि त्यांनी निवडणूक टाळण्यासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तेथेही सदरची व्यक्तीला आपण संस्थेचे सभासद असल्याबाबत कोणताही पुरावा सादर करता आला नाही.
दरम्यान उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केलेली निवडणूक प्रक्रिया सुरुच राहिल्याने नऊ जागांसाठी 15 सभासदांनी उमेदवारी दाखल केली, मात्र अर्ज माघारीच्या दिवशी त्यातील सहा जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने संस्थेच्या संचालकपदी सर्वश्री सुनील सायन्ना मादास, पापय्या रामय्या शिरसुल्ला, अरविंद नारायण पगडाल, चंद्रकांत सायन्ना एनगंदूल, लक्ष्मीनारायण शंकर मुशम, बलराम उत्तम श्रीगादी, राजेंद्र राधेश्याम बुरा, भारती शंकर कोम्पेल्ली व तुळजा राजेंद्र श्रीरामे यांची बिनविरोध निवड झाली. तर त्यानंतर झालेल्या नूतन संचालकांच्या बैठकीत सुनील मादास यांची संस्थेच्या अध्यक्षपदी तर पापय्या शिरसुल्ला यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. विधीज्ञ सुधीर शेटे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहीले. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे चेअरमन रणजीत देशमुख आदिंनी नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.
या बैठकीला ज्येष्ठ मार्गदर्शक हिरालाल पगडाल, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष गणेश मादास, महिला अध्यक्ष कविता सिरसुल्ला, चंद्रशेखर झुंजूर, नारायण इटप, शांताराम आडेप, प्रकाश झुंजूर, जनार्दन एनगंदूल, नारायण दासरी, राम चन्ना, अनिल अन्नलदास, अजय श्रीपतवाड, काशिनाथ आडेप, विनोद झुंजूर, नरेंद्र आडेप, अंबादास आडेप, प्रकाश वनम, शंकर गुंडेट्टी, कल्पना एनगंदूल, आशा झुंजूर, पुष्पा झुंजूर, शितल मादास, रेखा मादास, शामला श्रीगादी, मिनाक्षी श्रीपतवाड, राम सिरसुल्ला, श्याम सिरसुल्ला, रविंद्र उडता, विकास रच्चा, बाबु अमृतवाड, संतोष अंकारम, सुधाकर आडेप, महेश वासलवार, पांडूरंग आनंदम, गिरीश आडेप, पवन पासकंटी, श्रीकांत झुंजूर, पांडूरंग आडेप व राजेंद्र श्रीराम आदी उपस्थित होते.