पोलिसांकडून ‘टोल’ कर्मचार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न! आमदारांच्या सूचनेलाही केराची टोपली; नागरी आंदोलनाचाही परिणाम नाही..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भाजपच्या शहर उपाध्यक्षांसह चौघांना बेदम मारहाण झाल्याच्या घटनेला आठवडा उलटत असताना तालुका पोलीस अद्यापही प्रकरणाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यातच पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी धडक देणार्‍या कारमधील एका अल्पवयीन मुलासह पाचजणांना अटक करुन मैदान मारल्याचा आव आणण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनंतर संगमनेरातील राजकीय क्षेत्रासह व्यापारी वर्गातही संताप निर्माण झाला होता. त्याचे पडसाद व्यापारी असोसिएशनच्या निषेध मोर्चातून उमटले. त्यावेळी विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थितही होते आणि त्यांनी तालुका पोलिसांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे शंकाही घेतल्या. आमदार अमोल खताळ यांनी या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. मात्र त्याला चार दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांना भारतीय न्यायसंहितेत ‘ते’ कलम सापडलेले नाही. यावरही कहर म्हणजे घटनेला आठवडा होत असताना पोलिसांना नाशिकमधील आरोपी तर गवसले, मात्र टोलनाक्यावरील एकही आरोपी आढळून आलेला नाही हे विशेष. यावरुन तालुका पोलीस टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दोघा लोकप्रतिनिधींनी कडक समज देवूनही पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या अशा भूमिकेने आश्‍चर्य निर्माण झाले असून ‘पोलीस आणि टोल’ यांच्यातील प्रेमसंबंधाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.


गेल्या शनिवारी (ता.26) रात्री सव्वाबाराच्या सुमारास माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे दिवंगत नेते राधावल्लभ कासट यांचे ज्येष्ठ सुपूत्र अतुल आपले दोघे भाऊ आणि एका मित्रासह टोलनाक्यावरुन संगमनेरच्या दिशेने येत होते. त्यावेळी लोकल लेनकडे वळत असताना नाशिकचा नोंदणी क्रमांक असलेल्या एका कारने त्यांच्या कारला धडक दिल्याने दोन्ही कारचालकांमध्ये सुरुवातीला शाब्दीक बाचाबाची आणि नंतर सामंजस्याची बोलणी सुरु असताना टोलनाक्यावरील अमोल सरोदे हा मंगेश फटांगरे व किरण रहाणेसह बुलेटवर बसून तेथे आला व शाब्दीक वादाला हिंसक वळण लागले. त्यातून सुरुवातीला या तिघांनी, नंतर प्रोत्साहन मिळाल्याने ‘त्या’ कारमधील पाचजणांनी आणि त्यात भर म्हणून आणखी जमा झालेल्या दोघा-तिघांनी मिळून हा सगळा प्रकार केला. त्यामुळे मारहाण प्रकरणाचा सूत्रधार अमोल सरोदे असल्याचे त्याचवेळी समोर आले होते.


या प्रकरणात लोखंडी रॉड, लाकडी दांडके, नाक्यावरील बॅरिकेट्सचे तुटलेले पाईप, दगडं आणि विटा असे हाताला येईल त्या हत्यारांचा मनसोक्त वापर करुन कासट बंधूंना बेदम मारहाण केली गेली आहे. घटनेतील एका प्रसंगात तर, अतुल कासट यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्यांना जखमी करणारा आरोपी ते रक्तबंबाळ होवून खाली पडलेले असतानाही पुन्हा त्यांच्या डोक्यात घाव घालणार होता. सुदैवाने मारहाण करणार्‍या आरोपींमधील एकाने अगदी ऐनवेळी ‘अरेऽ थांब.. मरुन जाईल तोऽ..’ असे म्हणतं त्याला रोखल्याने अनर्थ टळला. इतका हा प्रकार गंभीर आहे. या घटनेनंतर काही वेळाने तालुका पोलिसांचे सरकारही वाहनही टोलनाक्यावर आले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी त्याचवेळी आरोपींची धरपकड करण्याची गरज होती.


मात्र असा कोणताच प्रकार त्यावेळी घडला नाही. उलट लंगडत्या स्थितीत असलेल्या अमरिश कासट यांनाच जखमींना रुग्णालयात नेण्याचे फर्मान सोडून अधिकारी महाशय आपल्या पुढील उद्योगाला निघूनही गेले. यावरुन पोलिसांनी त्याचवेळी या प्रकरणाला त्यांच्या दृष्टीने कोणतेच महत्त्व नसल्याचे दाखवून दिले होते. राज्यात सत्ता असणार्‍या आणि मुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदही आपल्याकडेच बाळगणार्‍या भाजपच्या शहर उपाध्यक्षांना बेदम मारहाण होवूनही पोलिसांनी थेट सोमवारी कासट यांचा जवाब नोंदवला. त्यातही दाखल प्रकरणातील कलमं जामीनपात्र असल्याने आरोपींना अटक होण्याची शक्यताही नाहीच्या बरोबर. संगमनेरातील व्यापार्‍यांसह सर्वपक्षीयांनी काढलेल्या मोर्चानंतर पोलिसांनी त्यात 326 (आताचे 118 (2)) घातले आणि नाशिकमध्ये जावून मारहाण प्रकरणात ‘साईड हिरो’ असलेल्या एका अल्पवयीन मुलासह पाचजणांना अटक केली.


वास्तविक व्यापार्‍यांच्या मोर्चात बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी थेट पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या कार्यपद्धतीवरच बोटं ठेवले होते. महिन्याभरापूर्वी झालेल्या अशाच एका प्रकरणाचा दाखला देत त्यावेळीही त्यांनी टोल कर्मचार्‍यांना कशी मदत केली आणि त्यानंतर त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घेण्यासाठी कशा पद्धतीने बेकायदेशीरपणे पत्र दिले याचर संपूर्ण दाखला देत त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. खरेतर एखाद्या लोकप्रतिनिधीने माध्यमांसमोर इतके गंभीर आरोप केलेल्या अधिकार्‍याला तत्काळ निलंबित करुन प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र अद्यापपर्यंत तसे काहीही घडलेले नाही. यावेळी आमदार अमोल खताळ यांनीही टोलनाक्यावर वारंवार घडणार्‍या अशा घटना आणि पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधून या प्रकरणात अतुल कासट यांना जीवे मारण्याचा उघड प्रयत्न दिसत असल्याने खुनाच्या प्रयत्नाचा (बीएनएस 109 (1)) गुन्हा दाखल करण्याची सूचना केली होती. मात्र अद्यापपर्यंत असे काहीही घडलेले नाही.


दुसरीकडे या घटनेत सुरुवातीपासूनच अमोल सरोदेसह मंगेश फटांगरे आणि किरण रहाणे यांची नावे समोर आलेली असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्याचे सोडून सरोदे टोळीने मारहाण सुरु केल्यानंतर त्यांच्यात सहभागी झालेल्या नाशिकमधील ‘त्या’ मुलांना उचलून आणीत बढाया मारण्यास सुरुवात केली. यातूनही पोलिसांनी टोलनाक्यावरील आरोपींना फायद्याची भूमिका घेतली. दाखल प्रकरणात सुरुवातीला अटक झालेल्यांची कोठडी मिळवल्यानंतर उशिराने अटक झालेल्यांना पोलीस कोठडीशिवाय न्यायालयीन कोठडीत जावून जामीन घेता येवू शकतो किंवा मिळालेल्या वेळेत न्यायालयांकडून अटकपूर्वचा प्रयत्नही होवू शकतो. या दोन्ही घटना एकमेकांना पूरक असण्यासह पोलीस निरीक्षकांना दोघा लोकप्रतिनिधींनी जाहीर सूचना देवूनही त्याकडे दुर्लक्ष करुन एकप्रकारे त्यांनी जनमताचा अवमान केला आहे. याची दखल घेवून वरीष्ठांनी योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोलनाका कार्यान्वित होवून सात वर्षांचा काळ लोटला आहे. 70 टक्के पूर्णत्त्वाच्या अटीचा परिपूर्ण लाभ घेत ठेकेदार कंपन्यांनी नंतरची कामं वार्‍यावर सोडून आपले संपूर्ण लक्ष ‘वसुलीवरच’ केंद्रीत केले. अर्धवट कामांमूळे या सात वर्षात अनेकांचा बळीही गेला, गंभीर दुखापती होवून कोट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले. मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक न बाळगता ठेकेदाराने आपली वसुली सुरुच ठेवली. नागरी उद्रेकातून टोलधाडी विरोधात अनेकदा आंदोलनेही उभी राहीली, मात्र दरवेळी नेतृत्त्व करणार्‍यांनीच आपले खिशे भरल्याने काळ सोकावला. आजच्या स्थितीत ठेकेदाराने थेट गुंडांच्या टोळ्याच पोसण्यास सुरुवात केली असून त्यांना संरक्षण देण्याचे काम तालुका पोलीस करीत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात संगमनेरातील सूत्रधार धरण्याऐवजी पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी नाशिक जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलासह पाचजणांना अटक करुन आपलीच पाठ थोपटण्याचा सपाटा लावलाय. 

Visits: 259 Today: 3 Total: 1106051

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *