संगमनेर पत्रकार मंचच्या अध्यक्षपदी गोरक्षनाथ मदने! गोरक्ष नेहे उपाध्यक्ष तर संजय अहिरे यांची सचिवपदी निवड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या संगमनेर पत्रकार मंचच्या अध्यक्षपदी गोरक्षनाथ मदने यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी गोरक्ष नेहे व सचिवपदी संजय अहिरे यांच्या नावावरही सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. मावळते अध्यक्ष श्याम तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. ग्रामीण भागात पत्रकारिता करताना येणारी आव्हाने विचारात घेवून पत्रकारांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी नूतन पदाधिकार्यांनी दिली.

मंगळवारी (ता.26) शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत नूतन अध्यक्षपदासाठी गोरक्षनाथ मदने यांच्या नावाची सूचना सुनील नवले यांनी मांडली, त्याला सोमनाथ काळे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी गोरक्ष नेहे यांच्या नावाची सूचना आनंद गायकवाड यांनी मांडली, त्याला नितीन ओझा यांनी अनुमोदन दिले. तर, सचिवपदासाठी संजय अहिरे यांच्या नावाची सूचना सतीश आहेर यांनी मांडली त्याला अमोल मतकर यांनी अनुमोदन दिले.

या बैठकीच्या प्रारंभी कोविड संक्रमणाच्या कालावधीत दिवंगत झालेल्या राज्यातील पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मावळते अध्यक्ष श्याम तिवारी यांनी गेल्या कालखंडात संघटनेद्वारा पत्रकारांसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारिता करताना समोर येणारी आव्हाने, अडचणी यासोबतच पत्रकारांचे संरक्षण, आरोग्य या विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकार आणि समाज यांचे परस्परांशी असलेले नाते विचारात घेवून पत्रकारांनी समाजासाठी काहीतरी उपक्रम राबविण्यावरही यावेळी सूचना करण्यात आल्या.

ग्रामीण भागातील पत्रकारांना कर्तव्य बजावताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. प्रामाणिकपणे माहितीचे संकलन करताना अनेकदा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होण्याच्या घटनाही वेळोवेळी समोर आल्या आहेत. त्यासाठी राज्यात नव्याने कायदा अस्तित्वात आल्याचे निदर्शनास आणून देत या बैठकीवर त्याच्या निकषांवरही चर्चा करण्यात आली. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, मात्र संकटाच्यावेळी त्याच्या मदतीसाठी धावणार्यांची संख्या मात्र अत्यंत तोकडी असल्याने संघटनेच्या माध्यमातूनच त्याला शाश्वत मदत होवू शकते यावर बैठकीत एकमत झाले.

संगमनेर पत्रकार मंचने स्थापनेपासूनच स्थानिक पत्रकारांच्या हितासाठी काम केले आहे. संघटनाच्या स्थापण्याच्यावेळी ठरलेली ध्येयधोरणे हिच संघटनेसाठी घटना असून त्या चौकटीत राहून पत्रकारांसाठी काम करण्याचा मनोदय यावेळी नूतन पदाधिकार्यांनी व्यक्त केला. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुनील नवले, श्याम तिवारी, नितीन ओझा, आनंद गायकवाड, सुनील महाले, सोमनाथ काळे, अमोल मतकर, अंकुश बुब, नीलिमा घाडगे, मंगेश सालपे, शेखर पानसरे, सतीश आहेर, भारत रेघाटे, संजय साबळे, काशिनाथ गोसावी आदी सदस्य उपस्थित होते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्रपत्रसृष्टीचा पाया रचला. संगमनेर पत्रकार मंचच्यावतीने दरवर्षी त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. ही परंपरा यापुढेही कायम ठेवताना त्याचे स्वरुप व्यापक करुन त्यात नागरी सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पत्रकार मंचच्यावतीने सामाजिक क्षेत्रात काम करणार्या उपेक्षीत घटकांसाठी दरवर्षी प्रतिष्ठीत पुरस्कार व व्याख्यानमालेसारखे उपक्रम सुरू व्हावेत यासाठीही यापुढे प्रयत्न करणार आहोत.
– गोरक्षनाथ मदने
अध्यक्ष-संगमनेर पत्रकार मंच

