अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्याला एका वर्षाचा सश्रम कारावास! संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा; 2018 साली घडली होती घटना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल बलात्कार व पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीने त्याच प्रकरणातील अल्पवयीन पीडितेला संगमनेरातून फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी संगमनेरच्या प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी सेवाभावी संस्थेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन सदरील मुलीचा शोध लावून आरोपीला अटक केली. त्या खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर.कदम यांनी आरोपी सुरज भाऊसाहेब साठे याला एका वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे.

याबाबतची हकिकत अशी, 2018 साली अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी सुरज भाऊसाहेब साठे (रा.काटवन खंडोबा, अहमदनगर) याच्याविरोधात सदर पीडितेने फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार संबंधिताने सदरची मुलगी सोळा वर्षीय अल्पवयीन असल्याचे माहिती असतांनाही आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपी साठे विरोधात भा.द.वी.कलम 366 (अ), 376 (आय), (एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे कलम 3, 4, 4 (एल), 6 नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक करुन कारागृहातही टाकले होते.

या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी 15 मे 2018 रोजी सदर अल्पवयीन पीडितेला अहमदनगरमधील मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल केले होते. मात्र त्यानंतरच्या कालावधीत वरील प्रकरणात अटक असलेला आरोपी सुरज साठे याची जामीनावर सुटका झाल्याने त्या पीडितेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी सदरचे प्रकरण जिल्हा बालकल्याण समितीसमोर ठेवले. त्यानुसार समितीने सदर पीडितेला संगमनेरच्या प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी सेवाभावी संस्थेच्या मुलींच्या वसतीगृहात ठेवण्याचे आदेश बजावल्याने 2 ऑगस्ट 2018 रोजी कोतवाली पोलिसांनी पीडितेला संगमनेरात आणून सदर संस्थेच्या ताब्यात दिले.

या ठिकाणी वास्तव्य करीत असतांना सदर मुलीचे शिक्षणही सुरु होते. ती इयत्ता 11 वीच्या वर्गात पेटीट कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या दरम्यान दोन महिन्यांनी ती नेहमीप्रमाणे वसतीगृहातील इतर मुलींसह 6 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 11.45 वा. महाविद्यालयात आली. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता सदर महाविद्यालयाच्या वर्गशिक्षिकेने वसतीगृहात फोन करुन सांगितले की, सदरची मुलगी ताप आला असल्याने औषध दुकानातून गोळी घेवून येते असे सांगून गेली ती परत आलीच नाही, तिला तिच्या एका मैत्रिनीने अज्ञात तरुणासोबत हात धरुन जातांना बघितल्याचेही यावेळी त्या शिक्षिकेने सांगितले. सदर घटनेनंतर वसतीगृहाच्या संचालकांनी पेटीट कनिष्ठ महाविद्यालयाच्या आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता सदरील पीडित मुलगी सुरज भाऊसाहेब साठे (रा.काटवन खंडोबा, अहमदनगर) याच्यासोबत गेल्याचे दिसून आले.

याप्रकरणी सदरच्या वसतीगृहाचे अध्यक्ष डॉ.अरुण इथापे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे यांनी केला व पीडितेचा शोध घेवून आरोपीला गजाआड केले. या प्रकरणाचे दोषारोपपत्रही त्यांनी संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. सदरच्या खटल्याचे कामकाज संगमनेरचे अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश आर.आर.कदम यांच्यासमोर चालले. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी या प्रकरणात सबळ पुरावे सादर करीत आठ साक्षीदार तपासले व जोरदार युक्तिवाद करीत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या खटल्यात संस्थाचालक डॉ.अरुण इथापे व तपासी अधिकारी योगिता कोकाटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे व साक्षीदारांच्या साक्षी मान्य करुन संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने आरोपी सुरज कुरसिंग यादव उर्फ सुरज भाऊसाहेब साठे याला भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अपहरण) नुसार दोषी धरुन त्याला एका वर्षाच्या सश्रम कारावासासह एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील गवते यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार सुरेश टकले, सुनील सरोदे, हेडकॉन्स्टेबल प्रवीण डावरे, महिला पोलीस स्वाती नाईकवाडी व दीपाली दवंगे यांनी साहाय्य केले. ज्या आरोपीने पूर्वी पीडितेला फसू लावून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले व त्या प्रकरणात त्याला कारागृहात जावून खटल्याला तोड द्यावे लागले, त्याच प्रकरणातील पीडितेला जामीनावर सुटल्यानंतर पळवून नेण्याचा हा प्रकार अत्यंत विरळा आहे.

