‘तनपुरे’ कारखान्याच्या संचालकांना मुदतवाढ द्या! खासदार सुजय विखेंची सहकार मंत्र्यांकडे मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. बुधवारी (ता. 18) मुंबई येथे खासदार डॉ. विखे पाटील यांनी सहकार मंत्री पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 3 जून रोजी संपली आहे. कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. तनपुरे साखर कारखान्याचा गाळप हंगाम तोंडावर आहे. त्याची तयारी करण्यासाठी कारखान्याच्या मशिनरीची दोषदुरुस्ती, ऊसतोडणी ठेकेदारांना आगाऊ उचल देऊन त्यांचे करार व इतर खर्चासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यासाठी कारखाना ताब्यात राहिला पाहिजे, अशी भूमिका खासदार डॉ. विखे पाटील यांनी नुकतीच जाहीर केली.

कारखाना कार्यक्षेत्रात मुबलक ऊस आहे. आगामी ऊस गाळप हंगाम निर्विघ्नपणे पार पाडण्याची तयारी आहे. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ मिळावी. म्हणजे, कारखान्याला आगामी हंगामाच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारी सुरू करता येईल. कारखाना, ऊस उत्पादक सभासद व कामगारांच्या हिताच्या दृष्टीने संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जावा, अशी मागणी खासदार डॉ. विखे पाटील यांनी केली आहे.
