ग्रामीण भागात ‘स्थानिक’ च्या निवडणुकांची धावपळ वाढली!

पुढील पंधरवड्यात आरक्षण सोडती; इच्छुकांची धाकधूक वाढली

संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील 

गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मुहूर्ताचा ‘नारळ’ अखेर दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी येत्या सोमवार दि.१३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ७५ जिल्हा परिषदेच्या गटांसह १५० पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटासह १८ पंचायत समिती गणांचा समावेश असणार आहे.  त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुकीकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांची घालमेल वाढली असून आपला गट आणि गण आरक्षित तर होणार नाही ना? या प्रश्नाने अनेकांची ‘धडकन’ वाढली आहे.

संगमनेर तालुक्यात समनापुर, तळेगाव दिघे, आश्वी बुद्रुक, जोर्वे, घुलेवाडी, धांदरफळ बुद्रुक, संगमनेर खुर्द, बोटा आणि साकुर या नऊ जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. तर निमोण, समनापुर, तळेगाव दिघे, वडगाव पान, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, जोर्वे, अंभोरे, घुलेवाडी, गुंजाळवाडी, धांदरफळ बुद्रुक, राजापूर, संगमनेर खुर्द, चंदनापुरी, खंदळमाळवाडी,बोटा, पिंपळगाव देपा आणि साकुर असे १८ पंचायत समितीचे गण आहेत. गत निवडणुकीत आश्वी बुद्रुक  जिल्हा परिषद गट आणि  आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द,  चंदनापुरी ( पूर्वीचा सावरगाव तळ) गणातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे उमेदवार विजयी झाले होते. त्याचबरोबर समनापुर आणि तळेगाव गणातून शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी ८ गट आणि १३ पंचायत समिती गणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वर्चस्व राखले होते.

संगमनेर विधानसभा मतदारसंघावर निर्विवाद चार दशकांची सत्ता असणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ यांनी अनपेक्षित पराभव करत संगमनेरात परिवर्तन घडवून आणले. या कामी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची रणनीती कारणीभूत ठरली. या पार्श्वभूमीवर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तालुक्यातील परिवर्तनानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आमदार अमोल खताळ आणि त्यांचे राजकीय गुरू पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ही कसोटी यावेळी पणाला लागणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकांवरच २०२९ चा संगमनेरचा आमदार कोण? हे ठरणार आहे. त्यामुळे विरोधी आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची कसोटी ही पणाला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार दि.१३ ऑक्टोबर रोजी गट आणि गणांची आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे ‘टेन्शन’ वाढले असून आपला गट, गण आरक्षित झाला तर करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

आरक्षण सोडतीपूर्वीच इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांची धावपळ वाढली आहे. आपला गट आणि गण आरक्षित होणार की खुला राहणार या संभ्रमामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच काही गटातील आणि गणातील इच्छुकांनी पर्यायी गट, गण शोधण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी आरक्षणाच्या संभावतेनुसार आपले नियोजन आखायला सुरुवात केली आहे. तालुक्यावर गेल्या अनेक दशकापासून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व राहिले आहे. दुसरीकडे नवोदित आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपा महायुती या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. गट आणि गणांच्या आरक्षणावरच या दोन्ही बाजूंच्या राजकीय रणनीती अवलंबून राहणार आहेत. निवडणुकीत कोण उमेदवार रिंगणात उतरणार, कोणाला आरक्षणाचा लाभ होणार आणि कोणाचे राजकीय गणित बिघडणार, याबाबत जनतेतही उत्सुकता आहे.१३ ऑक्टोबरच्या सोडतीनंतरच याचे चित्र स्पष्ट होऊन तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूकडील उमेदवारांची अजून निश्चिती नाही, संभाव्य नावे समोर येत असली तरी त्यांचेही भवितव्य १३ ऑक्टोबरच्या आरक्षणावरच अवलंबून आहे. दोन्ही बाजूकडून या निवडणुकीत दगा फटका होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यातच सर्वार्थाने ‘तगडे’ उमेदवार उभे करण्याकडे दोन्ही बाजूचा कल असणार असून या निवडणुकीत अनेक निवडणुकांचा अनुभव असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि स्थानिकच्या पहिल्याच निवडणुकीला नेतृत्व म्हणून सामोरे जाणाऱ्या आमदार अमोल खताळ यांच्या राजकीय वर्चस्वाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागणार हे निश्चित.

संगमनेर तालुक्यात २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.  या निवडणुकात माजी मंत्री बाळासाहेब थोरात विधानसभेच्या निवडणुकीसारखे गाफील अजिबात राहणार नाहीत हे सर्वश्रुत आहे. येणाऱ्या या निवडणुकीत ते ‘ताकही फुंकून पेतील’ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या निवडणुकीत माजी मंत्री थोरात आणि विधानसभा निवडणुकीत आत्मविश्वास दुणावलेल्या आ.अमोल खताळ यांच्या राजकीय वर्चस्वाची थेट चाचणी होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष संगमनेरकडे असणार आहे.

Visits: 71 Today: 3 Total: 1114200

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *