कोविड लढ्यातील संगमनेरचे लढवय्ये ‘सेनापती’च झाले जायबंदी.! ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ या संदेशाचे स्मरण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखीत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडची दाहकता कमी होत असल्याचा आनंद साजरा करणार्‍या संगमनेरकरांची चिंता वाढवणारे वृत्त दैनिक नायकच्या हाती आले आहे. कोविड विरोधातील वैश्‍विक लढ्यात अगदी सुरुवातीपासून आपले घरदार विसरुन संगमनेर-अकोल्यातील माणसं वाचवण्यासाठी धडपडणार्‍या प्रशासकीय ‘सेनापतीला’च आता कोविडने विळखा घातला आहे. या वृत्ताने अख्खी प्रशासकीय यंत्रणाच हादरली असून कोविडची दाहकता संपली असं समजणार्‍यांना हा मोठा धक्का आहे. संगमनेरच्या कोविड टिमचे म्होरके, अगदी दिड दिवसांतच आपल्या मातेचे कर्मकांड आटोपून पुन्हा आघाडी सांभाळणार्‍या संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनाच आता कोविडची लागण झाली आहे. त्यामुळे मोबाईलवर वाजणार्‍या ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ या क्वॉलर ट्यूनचे प्रत्येकाने अजूनही काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.


30 मार्च 2020 रोजी संगमनेर तालुक्यात पहिल्यांदाच कोविड संशयित म्हणून 18 जणांची नावे समोर आली. तेव्हापासून आरोग्य, पोलीस, महसुल, पालिका व पंचायत समिती अशा विविध विभागांना एका सूत्रात गुंफून संगमनेरातील प्रत्येक माणसाला कोविडपासून दूर ठेवण्यासाठी संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी कंबर कसली होती. सुरुवातीच्या काळातच त्यांच्या मातोश्रींचे देहवसानही झाले, मात्र घरातील कर्मकांडापेक्षा समाजाचा जीव महत्त्वाचा मानणार्‍या या लढवय्या शिलेदाराने आपल्या जन्मदात्या आईला अग्नीडाग देत अवघ्या दिड दिवसांतच सर्व विधीकर्म आटोपून पुन्हा मैदान गाठले.


तेव्हापासून संपूर्ण यंत्रणेनेचे नेतृत्त्व करीत त्यांनी आजवर चार हजारांहून अधिक आढळून आलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या कोविड बाधित आणि कोविड संशयित अशा सुमारे दोनशेहून अधिक जणांचे अंत्यसंस्कार नियमानुसार घडवून आणले. डोंगरी तालुका असलेल्या संगमनेरात गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या लक्षात घेवून त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आवश्यक ठरणार असल्याचे अगदी सुरुवातीलाच ताडून त्यांनी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचा साजच बदलला. त्यांचा उत्साह आणि जबाबदारीच्या प्रती झोकून देण्याच्या वृत्तीने यंत्रणेतील सर्वच घटकांमध्ये संजीवनी भरण्याचे काम केले.


दिवस असो अथवा रात्र त्यांनी घडाळ्यापेक्षा मानवी हृदयाच्या गतीला अधिक महत्त्व देत जे शक्य आहे ते तर केलेच, पण जे आजवर अशक्य वाटत होते ते देखील शक्य करुन दाखवले. घुलेवाडीतील ग्रामीण रुग्णालयात अभावानेच सामान्य माणसं जात होती, मात्र गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीतच त्यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे एकसारखा पाठपुरावा करीत मोठा निधी मिळवला. याशिवाय संगमनेर सहाय्यता निधी उभारुन त्याद्वारे शहरातील दानशूरांकडून मदत जमा करुन जवळपास सव्वाशे रुग्णांसाठी घुलेवाडीतील ट्रामा सेंटरच्या इमारतीत डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु केले. तेथे आज कृत्रिम प्राणवायुसह विद्युत जनित्राची व्यवस्था त्यांच्याच प्रयत्नांचा परिपाक आहे.


दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदारांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले होते. त्याचवेळी कोविडच्या लढ्यात अविरतपणे काम करणार्‍या या विभागातील अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनात पाल चुकचुकली होती, त्याचा प्रत्यय आता आला आहे. संबंधित नायब तहसीलदाराच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन महसुल विभागातील बहुतेक सर्वच अधिकार्‍यांनी आपली स्राव चाचणी करुन घेतली, त्यातील जवळपास सर्वांचीच चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आली, मात्र दुर्दैवाने अगदी कोविड विरोधात वैश्‍विक लढ्याचा शंखनाद झाल्यापासून प्रशासकीय यंत्रणेचे नेतृत्त्व स्विकारतांना शड्डू ठोकून मैदानात उतरलेल्या सेनापतींनाच कोविडने अगदी अखेरच्या टप्प्यात गाठले.


नाशिकमध्ये केलेली त्यांची स्राव चाचणी सकारात्मक आली असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांसह नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व स्वतःला विलगीकरणात ठेवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असतांना अगदी अखेरच्या टप्प्यात कोविडने सेनापतींनाच जायबंदी केल्याने कोविडची दाहकता अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ या क्वॉलर ट्यूनमधील संदेशाचे पालन करण्याची गरज आहे.

उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचे जीव गेल्याच्या वार्ता आपण ऐकल्या, वाचल्या आहेत. संगमनेरात मात्र अशी एकही घटना समोर आली नाही. त्यामागे खरे कारण आहे प्रशासकीय सेनापतींनी केलेले अचूक नियोजन आणि दूरदृष्टीतून सज्ज केलेली संगमनेरची आरोग्य यंत्रणा. गेल्या सहा महिन्यांपासून दिवस-रात्र मानव सेवेचा ध्यास घेवून कार्यरत असलेल्या या योद्ध्यालाच आता कोविडने जखडले आहे. त्यांना लवकर स्वास्थ प्राप्त होवून ते लवकर आपल्यात यावेत यासाठी आता नागरिकांकडून प्रार्थना सुरु झाल्या आहेत.

Visits: 3 Today: 1 Total: 29681

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *