आणखी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग! रविवारची घटना; दुचाकी शिकवण्याच्या बहाण्याने केला प्रकार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दिवसांत अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले असून रविवारी त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. या प्रकरणात संजय गांधी नगरमध्ये राहणार्या आरोपीने आपल्या परिचयातील अवघ्या चौदा वर्ष वयाच्या मुलीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने रात्री उशिराने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी संतोष रामू धोत्रे याच्या विरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार रविवारी (ता.7) दुपारी दोनच्या सुमारास पालिकेच्या थोरात क्रीडा संकुलाजवळ घडला. या घटनेत आरोपीशी ओळख असलेल्या एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने त्याला दुचाकी शिकवण्याची विनंती केली असता आरोपीने तिला दुचाकी चालविण्यास देत तो तिच्या पाठीमागे बसला. यावेळी काही अंतर दुचाकी चालविल्यानंतर आरोपीच्या मनातील विकृती जागृत झाली आणि त्याने सदरील लहानशा मुलीसोबत दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्यांची दुचाकी वर्दळीच्या रस्त्यावरील क्रीडा संकुलाच्या तिसर्या क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर असताना आरोपी संतोष धोत्रे याने ‘तू मला आवडतेस, तुझे लग्न होत नाही तोपर्यंत माझ्याशी संबंध ठेव’ असे म्हणत महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकाराने घाबरलेल्या पीडित मुलीने तेथेच दुचाकीवरुन उतरुन घराकडे पळ काढला आणि घडला प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. सदरचा प्रकार आज सहन केला तर उद्या पश्चातापाशिवाय हाती ही राहणार नसल्याचे ताडून रात्री उशिराने पीडितेच्या आईने याबाबत पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार पीडितेसह तिच्या आईने पोलीस ठाण्यात येवून घडला प्रकार कथन केला. त्यानुसार पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश देताच आरोपी संतोष रामू धोत्रे (रा.संजय गांधी नगर) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 354 (अ) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 12 नुसार गुन्ह्याची नोंद करीत आरोपीला गजाआड केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांच्याकडे देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दाखल गुन्ह्यांवरुन समोर आले आहे. त्यातही अनेक प्रकरणांत इभ्रतीच्या कारणाने मुली अथवा त्यांचे पालक पोलीस ठाण्यापर्यंत येत नसल्याचेही समजते. मुलींच्या बाबतीत असे प्रकार घडू नये यासाठी राज्यात निर्भया पथकही कार्यान्वित झाले, सुरुवातीचा काही काळ या पथकासाठी अधिकारी, कर्मचारी व वाहनाची तरतूद केल्यानंतर आता शहर पोलिसांना त्याचाही विसर पडल्याने शहरात अल्पवयीन मुलींचे सार्वजनिक वावरणेही धोक्याचे ठरु लागले आहे.

