अखेर पालिकेतील शवविच्छेदनगृह हलविण्याच्या हालचाली! दैनिक नायकचा इफेक्ट; अत्याधुनिक इमारत बांधून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकाच दिवशी शवविच्छेदनासाठी आलेल्या पाच मृतदेहांची वेळेत उत्तरीय तपासणी न झाल्याने गेल्या सोमवारी (ता.3) पालिकेच्या आवारातील शवविच्छेदनगृहात मोठा गोंधळ उडाला होता. संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी पालिका कार्यालयात जावून अधिकार्‍यांना धारेवरही धरले होते. यानंतर मुख्याधिकार्‍यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांना शवविच्छेदनगृहाबाबत स्मरणपत्रही पाठवले. ग्रामीण रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकार्‍यांची मनमानी आणि वारंवार विच्छेदन करण्यात होणारी दिरंगाई याबाबत दैनिक नायकने परखड वृत्तही प्रसिद्ध केले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात नव्याने अत्याधुनिक शवविच्छेदनगृह बांधण्याचे आदेश दिले आहेत.

आठवड्यापूर्वी विविध घटनांमधील पाच मृतदेहांची उत्तरीय तपासणी दीर्घकाळ रखडल्याने नातेवाईकांनी पालिकेच्या आवारातच आक्रोश केला होता. यावेळी काहींनी पालिका कार्यालयात जावून अधिकार्‍यांनाही धारेवर धरल्याने मुख्याधिकार्‍यांनी त्याचदिवशी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांशी पत्रव्यवहार करुन त्यांना आपल्या आवारातील शवविच्छेदनगृह ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात हलविण्यासाठी पूर्वी केलेल्या पत्रव्यवहाराचे स्मरणही करुन दिले. याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक नायकने प्रसिद्ध केल्यानंतर गेल्या शनिवारी (ता.8) संगमनेरात आलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी सदरचा विषय गांभीर्याने घेवून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जर्‍हाड यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार वैद्यकीय अधीक्षकांनी सोमवारी (ता.10) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठविले असून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात असलेल्या मात्र आजवर कधीही त्याचा वापर न केलेल्या शवविच्छेदनगृहाचे अत्याधुनिकीकरण करुन देण्यास सांगितले आहे. फेब्रुवारी 2009 पासून ग्रामीण रुग्णालय घुलेवाडीत स्थालांतरीत झाले. नवीन रुग्णालयाच्या इमारतीत शवविच्छेदनगृह बांधण्यात आले, मात्र ते परिपूर्ण नसल्याने त्याचा आजवर वापर करण्यात आला नाही. पर्यायाने तेव्हापासून आजअखेर पालिकेच्या आवारातील शवविच्छेदनाचा वापर सुरु असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

याच पत्रात सोमवारी (ता.3) उत्तरीय तपासणीसाठी एकाचवेळी पाच मृतदेह आल्याच्या उल्लेख करुन वैद्यकीय अधिकारी एकिकडे आणि पोलीस प्रशासन दुसरीकडे असल्याने समन्वयाचा अभाव निर्माण होवून तपासणीस विलंब झाल्याचे व त्यातून मृतांच्या नातेवाईकांचा संताप होवून मुख्याधिकार्‍यांच्या दालनाबाहेर गोंधळ झाल्याचा प्रसंगही सांगण्यात आला आहे. या सर्व घटनाक्रमाबाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्या आणि पालिकेच्या भोवताली राहणार्‍या रहिवाशांचा विरोध लक्षात घेता सदरील शवविच्छेदनगृह तत्काळ ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात हलविणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.

याबाबत शनिवारी (ता.8) संगमनेर दौर्‍यावर आलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ कार्यवाही करुन घेण्याबाबत आदेशित केले असून आपल्या स्तरावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात सद्यस्थितीत असलेल्या शवविच्छेदनगृहाची समक्ष पाहणी करुन आवश्यक ती जागा, ओटा, रॅप, पाणी, विद्युत पुरवठा, मर्च्युरी कॅबिनेट ठेवण्यासाठी जागा, सुरक्षा भिंत अशा सर्व गोष्टी विचारात घेवून तत्काळ अत्याधुनिक सुसज्जता असलेले शवविच्छेदनगृह तयार करुन देण्याची विनंती करण्यात आली आहे. या पत्राच्या प्रती जिल्हा शल्यचिकित्सकांसह संगमनेरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकार्‍यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांत पालिकेच्या आवारातील शवविच्छेदनगृह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाकडे स्थलांतरीत होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पूर्वसंध्येला कोकणगाव व निळवंडे शिवारातील रस्ते अपघातात दोघांचा, जवळे कडलग व पेमगिरी येथे घडलेल्या बुडीताच्या घटनांमध्ये दोन महिलांचा तर निमगाव टेंभी येथील एका तरुणाने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या सर्वांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पालिकेच्या आवारातील शवविच्छेदनगृहात आणण्यात आले होते. मात्र वेगवेगळ्या वेळांमध्ये घडलेल्या या पाचही घटनांमधील मृतदेह जवळपास 12 ते 22 तासांपूर्वी विच्छेदनगृहात येवूनही ग्रामीण रुग्णालयाच्या एका महिला वैद्यकीय अधिकार्‍याच्या मनमानीमुळे त्यांची अपेक्षित वेळेत उत्तरीय तपासणी सुरु झाली नाही. त्याचा परिणाम सकाळपासूनच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पालिकेच्या आवारात जमलेल्या मृतांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि एरव्ही अतिशय शांत असलेल्या शवविच्छेदनगृहाच्या परिसरात त्याचा उद्रेक झाला.

यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी थेट पालिकेच्या मध्यवर्ती कार्यालयात जावून मुख्याधिकार्‍यांच्या दालनासमोर ठिय्या देत गोंधळ घातला. मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेच्या अन्य अधिकार्‍यांनाच धारेवर धरले. वास्तविक पूर्वी संगमनेर नगरपालिकेच्या आवारात असलेल्या ग्रामीण रुग्णालयासाठी सदरचे शवविच्छेदनगृह बांधण्यात आले होते. मात्र सुमारे 14 वर्षांपूर्वी 2009 मध्ये येथील ग्रामीण रुग्णालय घुलेवाडीत स्थलांतरीत करण्यात आले. मात्र शवविच्छेदनगृह आहे तेथेच राहील्याने मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यासाठी प्रत्येकवेळी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना पालिकेच्या आवारात यावे लागते. त्यामुळे तेथील काही अधिकारी वेळकाढूपणा करतात. सध्या ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एक महिला अधिकारी तर गलेलठ्ठ सरकारी पगार घेवूनही कर्तव्य बजावण्यास मात्र चिडचीड करीत मनमानी पद्धतीने वागत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यांच्याच मनमानीतून सदरचा प्रकार घडला आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना त्याची दखल घ्यावी लागली.


सात दशकांपासून शवविच्छेदनगृह!
संगमनेरात 1873 सालीच सरकारी दवाखाना सुरु झाला होता. पुढेे 1943 मध्ये तत्कालीन ब्रिटीश राजवटीने मुंबई इलाख्यातील पाच तालुक्यांमध्ये कॉटेज रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार संगमनेरातील सरकारी दवाखान्याचे रुग्णालयात रुपांतर होवून 12 जून 1943 पासून पालिकेच्या आवारात कॉटेज रुग्णालय सुरु झाले. डॉ. बी. एल. काटे या रुग्णालयाचे पहिले वैद्यकीय अधिकारी होते. पुढे दहा वर्षांनी 1953 मध्ये या रुग्णालयाच्या दक्षिणेस शवविच्छेदनगृह बांधण्यात आले. पूर्वी संगमनेरसह अकोले तालुक्यातील मृतदेहांची उत्तरीय तपासणीही याच ठिकाणी केली जात असत. गेल्या सात दशकांत या विच्छेदनगृहात हजारो मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाली आहे. आता बरोबर 70 वर्षांनी 2023 मध्ये सदरचे शवविच्छेदनगृह घुलेवाडीत हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Visits: 210 Today: 3 Total: 1108947

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *