थोरात यांची ओळख कर्तृत्त्ववान नेत्याची : माजीमंत्री देशमुख काँग्रेसचा युवा निर्धार मेळावा; थोरात यांच्या समर्थकांचे शक्तिप्रदर्शन..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात आज महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या राजकीय लढ्याचे नेतृत्त्व करीत आहेत. गेली पाच दशके त्यांनी जिल्ह्याचा आणि तालुक्याचा कायापालट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांची संपूर्ण कारकीर्द निष्कलंक आणि भ्रष्टाचाराचे गालबोट नसलेली आहे. राज्यात त्यांची ओळख कर्तृत्त्ववान नेत्याची आहे. आज राज्यातील महायुतीचा कारभार पाहिल्यानंतर असे लक्षात येते की, राज्यात भ्रष्टाचार किती फोपावलाय. त्यातून यापूर्वी महाराष्ट्राने कधीही न ऐकलेली आमदार, खासदारांची खरेदी-विक्री प्रत्यक्ष बघायला मिळत आहे. पूर्वी राज्यातील पुढारी आपल्या कर्तृत्त्वाने ओळखले जायचे, मात्र अलिकडे पुढार्यांची ओळख टक्केवारीवरुन होत आहे. ही राज्याची संस्कृती नसून महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढण्यासाठी बाळासाहेब थोरात याचे हात बळकट करण्याचे आवाहन माजीमंत्री अमित देशमुख यांनी केले.
काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ तळेगाव दिघे येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी देशमुख बोलत होते. यावेळी थोरात यांच्यासह शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, दक्षिणेचे खासदार नीलेश लंके, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जयश्री थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना देशमुख यांनी 1999 सालच्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय विलासराव देशमुख काँग्रेसच्या आमदारांमध्ये सर्वाधीक मतांनी विजयी झाले आणि त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचा दाखला देतांना यावेळी संगमनेरात त्याची पुनरावृत्ती होवून ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात राज्याचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला. आजच्या निर्धार मेळाव्यासाठी जणू महाराष्ट्रच आपल्या समोर बसल्याचा आभास होत असून पाठीमागे वळून पाहिल्यास राज्याचा नेता म्हणून बाळासाहेब थोरात दिसतात असे सांगताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात त्यांच्या वक्तव्याला दाद दिली.
पायातली चप्पल आणि अंगातला सदरा बाजारात विकत घेता येतो, मात्र लोकांमधून निवडून गेलेला आमदार व खासदारही विकला जातो असे चित्र महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षात पहिल्यांदाच बघितल्याचा घणाघात करीत आपल्या भाषणाला सुरुवात करणार्या खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका केली. लोकप्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीमुळे सर्वसामान्यांच्या मनात राजकारण आणि समाजकारण कशासाठी अशा शंका निर्माण झाल्या आहेत. मात्र जेव्हा खवळलेल्या समुद्रात एखादे जहाज भरकटत जाते, त्यावेळी त्याला जसा दीपस्तंभाचा आधार असतो तशाप्रकारचे काही दीपस्तंभ राजकारणातही असल्याचे सांगत त्यांनी बाळासाहेब थोरात त्यातील एक असल्याचे गौरोद्गारही काढले.
राजकारणातील अनेकजण आपण इतक्या हजार कोटींचा निधी आणला, अमुक इमारत बांधली, तमूक कामं केल्याचे सांगत फिरताना दिसत आहेत. मात्र केवळ इमारती उभ्या करुन भागत नाही तर, त्या इमारतींच्या माध्यमातून संस्था, माणसं आणि कुटुंब उभी करावी लागतात. बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात या गोष्टी सर्वत्र बघायला मिळतात अशी पृष्टीही खासदार कोल्हे यांनी जोडली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.
विविधतेत एकता मानणार्या महाराष्ट्रातील अठरापगड जाती, बारा बलुतेदार आणि सोळा आलुतेदारांच्या अस्तित्वाला एखाद्या गाठोड्यात बांधून त्याला धर्माचे नाव देत मोजक्या लोकांच्या हातात सत्ता सोपवण्याचा हा प्रकार कुठवर चालणार असा ठोक सवालही त्यांनी केला. ‘लोकसभेला झाली मतांची कडकी, म्हणूनच तर, विधानसभे आधी बहिण झाली लाडकी’ अशा शब्दात सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर त्यांनी टीकास्त्र डागले. ‘चाय पर शुरु हुयी सरकार, गायपर अटक गयी. बात तो हुयी थी 15 लाख की, पंधरा सौ पर कैसे सिमट गयी. अशी मिश्किल कोटी करीत त्यांनी ‘इसलिये दादा, भाई, भाऊ यह गुलाबी धुल, हमारीं ऑखों में ना झोकें. आपको गद्दारी कें लिये 50 खोके और, लाडली बहेना पंधरा सौ में ओके’ अशी हिंदीत शेरोशायरी करीत डॉ.कोल्हे यांनी महायुती सरकारच्या धोरणांची जोरदार खिल्ली उडवताना उपस्थितांमध्ये हशाही पिकवला.
खासदार नीलेश लंके यांनी बाळासाहेब थोरात केवळ राज्याचे नव्हेतर देशाचे नेते असल्याचे सांगताना दक्षिणेतील पराभवावरुन नाव न घेता विखे-पाटलांवर तोफ डागली. तुम्ही थोरात साहेबांचा झटका दक्षिण मतदारसंघात अनुभवलाय, संगमनेर तर, त्यांचे होमग्राऊंड आहे. आमच्याकडे खरा टायगर आहे. मांजराने वाघाचे झूल घातल्याने तो वाघ होत नसतो असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या ‘टायगर अभी जिंदा है’ या घोषणेवर निशाणा साधला. ज्यांच्या बरोबर दहा हत्तीचे बळं आहे, त्यांच्यासोबतच सावड करायची असते, ज्यांच्या मनगटातच दम नाही त्यांच्याशी सावड करण्यात काहीच अर्थ नसतो असा उपरोधिक टोलाही खासदार लंके यांनी लगावला.
बाळासाहेब थोरात म्हणजे परिस असून ज्याच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला त्याचे सोनं झाल्याचे गौरोद्रगार काढताना खासदार लंके यांनी संगमनेरमधून हा परिसच निवडणूक लढवत असल्याने त्यांचा दोन लाखांहून अधिक मताधिक्क्याने विजय होण्यासह शेजारच्या (शिर्डी) मतदारसंघालाही या परिसस्पर्शाचा अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नसल्याचा चिमटा त्यांनी काढला. यावेळी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपस्थितांचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहता बाळासाहेब थोरात एक लाखांहून अधिक मताधिक्क्य मिळवतील असा विश्वास व्यक्त केला. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर तळेगाव भागासाठी निळवंड्याचे दहा टक्के राखीव पाणी आणण्यासह भोजापूर धरणाचे पाणी मिळवण्यासाठी काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आजचा निर्धार मेळावा ‘अविस्मरणीय’ ठरेल अशा शब्दात आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी त्यांच्या 1985 सालच्या पहिल्या निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देताना त्यानंतरच्या काळात तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून निर्माण झालेल्या तरुण नेतृत्त्वांचा नामोल्लेख केला. तळेगावमधील या मेळाव्यातून पुढील 25 ते 50 वर्षांसाठी तरुण नेतृत्त्व निर्माण होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. राज्य घटनेतील प्रस्तावनेचा विचार हाच काँग्रेसचा विचार असून सत्ता मिळो अथवा न मिळो, पद असो अथवा नसो, परंतु राज्यघटनेतील तो विचार आपला समजून आयुष्यभर काम केले तर यशस्वी राजकारण झाले याचे समाधान मिळेल असे आपले स्पष्ट मतं असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या संतांनी आणि समाज सुधारकांनी जो विचार सांगितला आहे, तोच विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत मांडला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे पसायदान आणि राज्यघटनेची प्रस्तावना हीच आपली श्रद्धास्थानं आहेत. सत्ता येते आणि जाते. मात्र आपण या विचारांवर आणि तत्त्वांवरच कामं केले पाहिजे असे सांगताना त्यांनी इतिहास त्यांच्याच लिहिला जातो, जो तत्त्वाने लढतो, वागतो. सतरावेळा कोलांटउड्या मारुन कितीही मंत्रीपदं अन् पैसा मिळो त्यांच्या नावापुढे तेच लिहिले जाईल असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विखे-पाटलांनाही चिमटा काढला. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्यासह विविध वक्त्यांनीही आपले विचार मांडले. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.