संगमनेरात पालघरची पुनरावृत्ती करण्याचे षडयंत्र! हिंदू साधुंवर दोघांचा हल्ला; सलग दुसर्‍या दिवशी शहरात संताप..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही वर्षात काही विघातक शक्तिंकडून जाणीवपूर्वक समाजातील सौहार्दाच्या वातावरणाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरु असून रविवारी निंभाळे चौफुलीवर चक्क तरुणीसह तिच्या पित्याला मारहाण करण्याची घटना घडल्यानंतर आज दुपारी कुटे हॉस्पिटलजवळ आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत परिसरातून चाललेल्या चौघा हिंदू साधुंना भररस्त्यात आडवून दोघा तरुणांनी त्यांना दमबाजी करीत मारहाण केली. या घटनेनंतर जीवाच्या आकांताने वृद्ध असलेले चौघेही संन्याशी सैरावैरा धावू लागले. हा प्रकार पाहुन रस्त्याने जाणार्‍या काहींनी त्या साधुंना धीर देत घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सद्यस्थितीत शहर पोलीस रुग्णालयात दाखल झाले असून जखमी साधुंचा जवाब नोंदवला जात आहे. या घटनेने चार वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधुंच्या हत्यांकांडाच्या आठवणी जाग्या झाल्या असून संन्याशांना विनाकारण मारहाण करण्याच्या या प्रकाराने शहरात संताप निर्माण झाला आहे.


याबाबत विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.11) दुपारी साडेचारच्या सुमारास नवीन नगररस्त्यावरील कुटे हॉस्पिटलजवळ घडला. अंगावर भगवे वस्त्र परिधान केलेले चार साधु दिल्लीनाक्याकडून या मार्गाने नगर रोडकडे येत असताना अचानक दोघांनी त्यांना रस्त्यात आडवले. यावेळी त्यांच्यात काही क्षणांचे बोलणे झाल्यानंतर ‘त्या’ साधुंना रस्त्यात अडवणार्‍या दोघा तरुणांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेले चारही वृद्ध संन्याशी जीवाच्या आकांताने आरडाओरड करीत सैरावैरा धावू लागले.


हा प्रकार पाहुन आसपासच्या काही नागरिकांनी मारहाण करणार्‍या त्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आलेल्या व्हिडिओतून लक्षात येते. हा प्रकार घडला तेथून हिंदू बहुल नवीन नगर रस्ता जवळच असल्याने संन्याशांना मारहाण करणार्‍यांनी त्यांचा पाठलाग करण्याची हिम्मत दाखवली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यावेळी रस्त्याने जाणार्‍या एका दुचाकीस्वाराला संशय आल्याने त्याने साधुंच्या मारहाणीचा हा प्रकार काही अंतरावर थांबून त्याचे मोबाईलमध्ये चित्रण केले. त्यात मारहाण करणारे आरोपी स्पष्टपणे दिसून येतात.


सदरील साधु धावतपळत नवीन नगररस्त्यावर आल्यानंतर काहींनी त्यांची विचारपूस करीत त्यांना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून शहर पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले असून साधुंचा जवाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. या घटनेत जखमी झालेल्या संन्याशांची नावे बबन देवराम जाधव (वय 70, रा.देहरे, ता.अहिल्यानगर), कैलास रंगनाथ शिंदे (वय 68, रा.रामवाडी, अहिल्यानगर), विलास मारुती वडागळे (वय 48) व मल्हारी दादू चांदणे (रा.रामवाडी, अहिल्यानगर) अशी आहेत.


या प्रकरणातील दोन्ही आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून दोघेही पुनर्वसन कॉलनीतील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर दोघेही पसार झाले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. घटनेतील एका आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव अजय साळवे असल्याची माहितीही समोर आली आहे. रविवारी निंभाळे चौफुलीजवळ कट मारल्याचा जाब विचारल्याने एका विकृताने तरुणीसह तिच्या पित्याला मारहाण केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. तो शमण्यापूर्वीच संन्याशांना मारहाण करण्याची घटना घडल्याने शहरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.


चार वर्षांपूर्वी 16 एप्रिल 2020 रोजी कांदीवलीहून सुरतकडे निघालेल्या दोघा साधुंना मुलं पळवणार्‍या टोळीतील सदस्य समजून पोलिसांच्या ताब्यातून ओढून विकृत जमावाने बेदम मारहाण करण्याची घटना घडली होती. त्या दुर्दैवी घटनेत कल्पवृक्षगिरी महाराज (वय 70), त्यांचा शिष्य सुशीलगिरी महाराज (वय 35) व वाहनचालक नीलेश तेलगडे (वय 30) अशा तिघांचाही जीव गेला होता. या प्रकारानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा संताप निर्माण झाला होता, आता या घटनेच्या चार वर्षांनंतर शहरातील दोघा विकृतांनी वयस्कर साधुंना विनाकारण रस्त्यात आडवून त्यांना दमबाजी आणि मारहाण करण्याची घटना घडल्याने शहरात संताप व्यक्त होत असून दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

Visits: 19 Today: 3 Total: 105218

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *