वाईन विक्रीच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा एल्गार! राज्य सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा बेमुदत उपोषणाचा दिला इशारा..
नायक वृत्तसेवा, अहमदनगर
राज्यातील सुपर मार्केट व किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाला काही राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांचा विरोध होत असतांना आता त्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘एन्ट्री’ झाली आहे. यापूर्वी हजारे यांनी राज्य सरकारचा वाईन विक्रीचा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रीया दिली होती, मात्र आता त्यांनी या निर्णयाविरोधात थेट आंदोलनाचे हत्यार उपसले असून सरकारने आपला निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत प्राणांतिक उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय आता व्यापक होत असल्याचे दिसू लागले असून सरकारची डोकदुखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने शेतकरी हिताचा निर्णय असल्याचे सांगत राज्यातील सुपर शॉपी व किराणा दुकानात वाईन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सुरुवातीपासूनच राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपासह काही राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांनी मोठा विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठनेते शरद पवार यांनीही विरोध होत असल्यास निर्णयाचा पुनःविचार करण्याची भूमिका मांडली होती. मात्र राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून पवारांच्या प्रतिक्रीयेनंतरही सरकारने आपल्या निर्णयाला अंतिम स्वरुप दिले आहे. त्यामुळे सरकारचा हा निर्णय आता पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी दक्षिणेचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी शिर्डी मतदार संघात वाईन विक्री होवू देणार नसल्याचे बजावल्यानंतर संगमनेरातील किराणा दुकानदारांच्या संघटनेने आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या दुकानांमध्ये वाईनची विक्री करणार नसल्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. अर्थात संगमनेर किराणा संघटनेचे अध्यक्ष भाजपाचे पदाधिकारी असल्याने त्यांच्या या निर्णयाला राजकीय किनारही लाभलेली आहे.
त्यातच आता 2014 साली देशात सत्तांतर घडविण्यात मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही वाईन विक्रीच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक झाले आहेत. सुरुवातीला त्यांनी सरकारच्या निर्णयावर केवळ नाराजी व्यक्त करतांना हा दुर्दैवी निर्णय असल्याचे म्हटले होते व या निर्णयाचा पुन्हा विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले होते. मात्र सरकारने हजारेंच्या पत्राची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे हजारे यांनी आता राज्य सरकारने घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास त्या विरोधात प्राणांतिक उपोषणाला बसणार असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे येणार्या काळात वाईन विक्रीचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचे दिसू लागले आहे.