पुणे पोलिसांनी सीमोल्लंघन करीत सव्वा लाख नेले! दुचाकी चोरीचा तपास; समनापूरातील दुचाकी विक्रेत्याशी तडजोड..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलिसांनी ठरवले तरं सामान्य माणसाने रस्त्यात काढून ठेवलेली चप्पल चोरण्याची हिम्मतही कोणाची होणार नाही. मात्र हा डायलॉग फक्त एखाद्या हिंदी चित्रपटापूरताच मर्यादीत असून प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र खूप वेगळी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणात दुचाकी चोरट्याने दिलेल्या माहितीवरुन थेट पुणे जिल्ह्यातून सीमोल्लंघन करीत संगमनेरात पोहोचलेल्या पोलिसांनी ‘त्या’ चोरट्याकडून चोरीची दुचाकी विकत घेणार्या समनापूरातील एकाला उचलले. प्राथमिक तपासात त्याने संबंधिताकडून चोरीची दुचाकी घेतल्याचेही उघड झाले. मात्र त्याला शहर पोलीस ठाण्यात घेवून येईस्तोवर वाटेतच त्याच्याशी ‘तडजोड’ झाल्याने त्याच्याकडून तब्बल एक लाख 10 हजार रुपयांची रक्कम घेत त्याला सोडूनही देण्यात आले. या धक्कादायक प्रकारातून सध्याच्या काळात चोरीच्या घटनांची पोलीस कशापद्धतीने परस्पर विल्हेवाट लावतात याचे जिवंत उदाहरण समोर उभे राहीले आहे.
याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार विजयादशमीच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात घडला. या घटनेत पुणे जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या अटकेत असलेल्या एका दुचाकी चोरट्याला सोबत घेवून संगमनेरात तपासासाठी आले होते. यावेळी त्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी थेट समनापूरातील एकाच्या दुचाकी खरेदी-विक्रीच्या दुकानावर छापा घालीत त्याला ताब्यात घेतले. या दरम्यान पोलिसांनी सोबत आणलेला चोरटा आणि त्याच्याकडून चोरीचा माल विकत घेणारा खरेदीदार अशा दोघांनाही एकमेकांच्या समोर आणताच समनापूरातील ‘त्या’ दुचाकी विक्रेत्याचा थरकाप सुरु झाला आणि तो ‘साहेब, मिटवून घेवू..’ अशी विनवणी करु लागला.
परंतु, जागेवरच तडजोड केली तर, ती थोडक्यात आवरती घ्यावी लागेल याचा अनुभव असल्यागत सुरुवातीला पोलिसांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत त्याला आपल्या वाहनातून शहर पोलीस ठाण्यात आणले. तेथे काहीवेळ दोघांचीही समोरासमोर चौकशी केल्यानंतर आता आपली सुटका नाही असे समजून पुणे पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल विकत घेतल्याचा ठपका ठेवून समनापूरातून उचललेल्या ‘त्या’ दुचाकी विक्रेत्याची भंबेरी उडाली. त्यामुळे त्याने पुन्हा ‘तडजोडी’च्या विनवण्या करण्यास सुरुवात केली. मात्र ‘भाव’ वाढवण्यासाठी पोलिसांकडून त्याच्या विनवण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होवू लागले.
विशेष म्हणजे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारातच सुरु असलेल्या या ‘तडजोडी’ची साधी खबरही स्थानिक पोलिसांना लागली नाही. या दरम्यान पुणे पोलिसांनी दोन्ही आरोपींसह पुण्याला निघण्याची तयारी करण्याचे नाटकं करताच तडजोडीच्या रकमेने लाखाचा आकडा ओलांडला. मनात असलेला आकडा चोरीचे वाहन घेणार्याच्या तोंडातून बाहेर पडताच पुणे पोलिसांनी सुरु केलेले आपले वाहन बंद केले आणि अखेर एक लाख दहा हजार रुपयांची अंतिम तडजोड करीत समनापूरातील ‘त्या’ आरोपीला जागेवरच मुक्त करुन पुणे पोलिसांचे वाहन संगमनेरात जसे आले तसेच सोबत आणलेल्या एकट्या चोरट्यासह पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले.
गेल्याकाही वर्षात जवळजवळ संपूर्ण राज्यातच दुचाकी चोरीसह महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवण्याचे प्रकार वाढत आहेत. अनेकदा त्यातील चोरटे आणि त्यांच्याकडून हस्तगत झालेल्या लाखो, करोडों रुपयांचा मुद्देमालाच्या बातम्याही माध्यमांमधून समोर आल्या आहेत. मात्र अलिकडच्या काळात यासर्व प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल झाल्याचे चित्र दिसू लागले असून अनेक ठिकाणी गंठण चोरणारे आरोपी पकडल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यांची कबुली करुन घेतली जाते. त्यातून त्याने ज्या सोनारांना मुद्देमाल विकला असेल त्यांना गाठून मुद्देमालासह गुन्ह्यातून वगळण्यासाठीचा मोठा मलिदा मिळवला जातो. जिल्ह्यातही यापूर्वी अशा घटना अनेकदा घडल्या असून संगमनेरही त्यापासून अलिप्त राहिलेले नाही.
चोरीच्या सोन्याप्रमाणे आता मोटर सायकल चोरीच्या प्रकरणातही पोलिसांकडून सर्रासपणे असेच प्रकार करण्यास सुरुवात झाली आहे. वास्तविक कायद्यानुसार चोरी करणं ज्याप्रकारे गुन्हा आहे, त्याप्रमाणे चोरीचा माल विकत घेणेही गुन्हा आहे. हल्ली दुचाकीच्या किंमतीही गगनाला भिडल्याने अनेकजण वापरलेल्या दुचाकी घेण्यात स्वारस्य दाखवतात. त्यामुळे दुचाकी चोरणार्यांना सुगीचे दिवस आले असून अशा चोरट्यांकडून कवडीमोल भावात वाहने विकत घेवून त्याच्या विक्रीतून हजारों रुपयांची कमाई करणार्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे मोटर सायकल लांबविणारे पोलिसांच्या हाती लागले की, त्यांच्याकडून चोरीची वाहने घेणारेही उघड होतातच. मात्र अपवादात्मक स्थितीत चोरीची वाहनं विकत घेणारे कायद्याच्या कक्षेत येतात. यावरुन पोलिसांचा तपासही आता संशयाच्या गर्तेत आला असून कायद्यानुसार ज्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत झाला त्यालाही गजाआड करण्याची गरज असताना सर्रासपणे त्याच्याशी परस्पर तडजोडी करुन कायद्यालाच चुना लावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
अडीच वर्षांपूर्वी संगमनेरच्या स्थानिक पोलिसांनी तिघा दुचाकी चोरट्यांना जेरबंद करीत एकाचवेळी 51 मोटरसायकलचा शोध घेवून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांचे कौतुक करण्यासाठी खूद्द पोलीस अधिक्षक संगमनेरात आले होते. यावेळी पत्रकारांना पोलिसांच्या कर्तृत्त्वाची माहिती देत असतानाच इतक्या मोठ्या संख्येने सापडलेल्या दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपंीची संख्या पाहुन त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले होते. त्यावेळी त्यांचा कटाक्ष एकूण आरोपींची संख्या 50 पेक्षा जास्त असावी असाच होता, प्रत्यक्षात मात्र दुचाकी खरेदी करणार्या एकालाही पोलिसांनी आरोपी केलेले नव्हते. त्यावरुन पोलीस कायद्यालाच कसा चुना लावतात हे देखील स्पष्ट झाले होते.