अगस्तिसाठी अखेरच्या दिवशी विक्रमी 287 अर्ज दाखल कैलास वाकचौरेंचा राष्ट्रवादीकडून अर्ज; पिचड पिता-पुत्रांना धक्का

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील शेतकर्यांची कामधेनू असलेल्या अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता.20) अखेरच्या दिवशी एकूण 287 इतके विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे पिचड यांचे खंदे समर्थक कैलास वाकचौरे यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केल्याने पिचड पिता-पुत्रांना चांगलाच धक्का बसला आहे.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्ते, आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, आरपीआयचे विजय वाकचौरे, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कारभारी उगले, शेतकरी संघटनेचे नेते अशोक आरोटे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत मंडळ तर या दोन्ही मंडळांविरुद्ध गेल्या वर्षभरापासून रणशिंग फुंकलेले व परिवर्तनाची हाक दिलेले, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक बी. जे. देशमुख यांनी बैलगाडीतून वाजत-गाजत जात आपल्या तिसर्या आघाडीचेही अर्ज शेवटच्या दिवशी भरले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते असलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक समजले जाणारे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे यांनी अखेर पिचडांची साथ सोडत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळासह अनेक माजी संचालक व त्यांच्या सुपुत्रांनी पुन्हा अर्ज दाखल केल्यामुळे सर्वसामान्य, सुशिक्षित तरुण शेतकरी, सभासदांमधून उलटसुलट चर्चा ऐकू येत होत्या. यातील अनेकांनी दोन-तीन तीन अर्ज भरलेले असल्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या 287 पेक्षा कमी आहे.

शेवटच्या दिवशी अर्ज भरलेल्यांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, कैलास वाकचौरे, मधुकर नवले, भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ, आरपीआयचे विजय वाकचौरे, कम्युनिस्टचे शांताराम वाळुंज, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, माजी प्रशासक बी. जे. देशमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य आप्पासाहेब आवारी, विद्यमान संचालक राजेंद्र डावरे, सुरेश गडाख, माजी संचालक अरुण रुपवते, बाळासाहेब नाईकवाडी, भाऊसाहेब वाकचौरे, चंद्रमोहन निरगुडे, अॅड. बी. जी. वैद्य, भाऊसाहेब वैद्य, कोंडाजी ढोन्नर, कैलास नवले, सदानंद बंगाळ, दिलीप मंडलिक, सचिन दराडे, नितीन नाईकवाडी, भाऊसाहेब वाळुंज, प्रकाश देशमुख, शंकर धुमाळ, विलास वाकचौरे, उत्तम देशमुख, सुभाष घुले, कारभारी बंदावणे, शिवाजी नाईकवाडी, सूर्यभान दातीर, संपत शेटे, संजय देशमुख, भाऊसाहेब येवले, शिवाजी येवले, रमेश राक्षे, अरुण फरगडे, प्रकाश हासे, भाऊसाहेब नवले, सचिन जोशी, विश्वंभर आरोटे, सतीश भांगरे, कारभारी आवारी, अॅड. प्रकाश नवले, रावसाहेब शेळके, रवींद्र आरोटे, चक्रधर सदगीर, माजी संचालिका ताराबाई कोटकर, सकूबाई वाकचौरे, शांताबाई वाकचौरे, नीता उगले, लता देशमुख, आशा नवले, केशरबाई देशमुख, मंदाकिनी धुमाळ, मंदा बंगाळ, मीना देशमुख आदिंचा समावेश आहे. दरम्यान आज 21 जूनला दाखल उमेदवारी अर्जाची छाननी होईल तर 22 जून रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 22 जून ते 6 जुलै अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
