शिवसेनेचे बंडखोर खासदार सदाशिव लोखंडे संगमनेरच्या दौर्यावर! खबरदारी म्हणून शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखांसह शहरप्रमुखांना केले स्थानबद्ध..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर भाजप व शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सरकार स्थापन करुन महिन्याचा कालावधी लोटला असला तरीही त्यातून निर्माण झालेला संघर्ष मात्र आजही कायम आहे. याचाच प्रत्यय आज संगमनेरकरांना प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाला. शिवसेनेचे बंडखोर खासदार सदाशिव लोखंडे आज घुलेवाडीतील एका कार्यक्रमासाठी संगमनेर दौर्यावर आले होते. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेत त्यांनी याबाबत संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांना माहिती दिल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व शहरप्रमुखांना मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 149 अन्वये नोटीसा जारी करुन त्यांना चारतास स्थानबद्ध केले होते.
राज्यात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत विविध राजकीय घडमोडी घडल्या. त्यातून शिवसेना नेते व तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षातील 40 आमदारांसह 10 अपक्ष आमदारांना सोबत घेत शिवसेनेशी बंडखोरी केली. जवळपास दहा दिवस सूरत आणि गुवाहाटी येथे घडलेल्या विविध नाट्यमय प्रसंगानंतर बंडखोर गटाने भाजपाशी संधान साधून राज्यात सरकारही स्थापन केले. त्यानंतर लोकसभेतही राज्यातील बंडखोरी पोहोचली आणि भावना गवळी यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या लोकसभेतील 18 पैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवित त्यांच्या गटात प्रवेश केला.
या सर्व घटनांनी सामान्य शिवसैनिकाचा मात्र संताप झाला. त्याच कालावधीत संगमनेर शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करुन बंडखोर खासदाराला संगमनेरात पाय ठेवू देणार नसल्याची घोषणा केली होती. यापूर्वी 2014 साली तत्कालीन शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही पक्षत्याग करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्येही असाच रोष निर्माण झाला होता. त्यावेळी संगमनेरात आलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शिवसेनेचे विद्यमान उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे व शहरप्रमुख अमर कतारी यांनी शाईफेक करुन त्यांना धक्काबुक्की केली होती. त्याबाबत या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
त्या घटनेनंतर आठ वर्षांनी पुन्हा एकदा तसाच प्रसंग उभा राहिला असून यावेळी शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी पक्षत्याग करीत शिंदे गटात प्रवेश केल्याने मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी मोठा रोष आहे. त्यातच स्थानिक शिवसेनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे यापूर्वीच बंडखोर खासदारांना संगमनेरात पाय ठेवू देणार नसल्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर दौर्यावर आलेल्या खासदार लोखंडे यांच्याबाबतही तसाच प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी त्यांचे संगमनेरात आगमन होण्यापूर्वीच खबरदारी घेतली होती. त्या अनुषंगाने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे व शहरप्रमुख अमर कतारी या दोघांनाही मुंबई पोलीस अधिनियमाच्या 149 नुसार नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी या दोघांचीही भेट घेत त्यांना कोणतीही कृती करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला व खासदार लोखंडे संगमनेरात असेपर्यंत या दोघांनाही एकाच ठिकाणी शिवसेनेच्या कार्यालयातच स्थानबद्ध करण्यात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास खासदार माघारी परतल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली.