संगमनेरच्या ‘भगीरथा’शिवाय वाहिली ‘गंगा’! धरण पूर्ण करणार्यांचाच विसर; श्रेयासाठी निमंत्रणही टाळले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तब्बल साडेपाच दशकांच्या प्रतीक्षेनंतर पाच तालुक्यातील दुष्काळी भागांना वरदान ठरणार्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. वास्तविक 1970 साली प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या धरणाच्या दोनवेळा जागा बदलून अनेकवेळा भूमिपूजन होवून प्रत्यक्ष 1993 साली प्रत्यक्षात काम सुरु झाले. त्यानंतरही या धरणाच्या उभारणीतील अडचणी थांबल्या नाहीत. अपूर्ण निधी आणि धरणग्रस्तांचे प्रश्न यामुळे या प्रकल्पाचे भवितव्यच अंधारात असल्यागत स्थिती असतांना संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठनेते मधुकरराव पिचड यांच्या सोबतीने धरणाच्या कामातील अडथळे दूर सारले. 1999 साली बाळासाहेब थोरात यांची पाटबंधारे खात्याच्या राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतरच खर्याअर्थी या धरणाच्या कामाला वेग आला. जिल्ह्यातील सहा तालुक्यांसह सिन्नर तालुक्यातील दुष्काळी जमिनींची तहाण भागवणारे हे धरण झाल्यानंतर त्याच्या डाव्या कालव्यातून बुधवारी पाणीही सोडण्यात आले. थोरात-पिचडांच्या परिश्रमातून आकाराला आलेल्या या धरणाच्या कालव्यातून खळाळणारे पाणी पाहून बळीराजा सुखावला खरा, मात्र ज्या ‘भगीरथा’ने ही गंगा त्यांच्या दारापर्यंत पोहोवण्यासाठी आपले मंत्रीपद डावावर लावले त्या आमदार बाळासाहेब थोरात यांना मात्र या सोहळ्यापासून दूर ठेवण्याचा प्रकार या परमोच्च सुखालाही गालबोट लावणारा ठरला.

17 जुलै, 1970 रोजी प्रवरानदीवरील म्हाळादेवी येथे धरण बांधण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आणि 1977 साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे पहिल्यांदा भूमिपूजनही झाले. मात्र त्यानंतर या धरणाच्या नावातच अडथळे निर्माण होवून बाधित होणार्यांनी तीव्र आक्षेप नोंदविल्याने नंतरच्या कालावधीत तब्बल दोनवेळा धरणाची जागा बदलण्याची वेळ शासनावर आली. अखेर रडतखडत 1992 साली निळवंडे येथे धरणाचे भूमिपूजन होवून 1993 मध्ये प्रत्यक्षात धरणाच्या खोदकामास तर 1996 साली बांधकामास सुरुवात झाली. तेथून पुढील कालावधीत अपूरा निधी आणि बाधितांचे प्रश्न या कारणांनी वारंवार धरणाच्या कामात अडथळे निर्माण झाले. 1985 साली ‘पिण्यासाठी पाणी-पाण्यासाठी बंधारा’ अशी हाक देत आंदोलनाच्या माध्यमातून विधानसभेत पोहोचलेल्या बाळासाहेब थोरात यांनी निळवंडेच्या माध्यमातूनच संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागाचा उद्धार होईल हे ताडले होते. त्यामुळे 1999 साली राज्य मंत्रीमंडळात त्यांच्याकडे पाटबंधारे खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी येताच त्यांनी धरणाच्या कामाला गती देण्यास सुरुवात केली. निधी प्राप्त होत असतांनाच प्रकल्प बांधितांना विश्वासात घेत त्यांनी ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ अशा आश्वासक शब्दांनी बाधितांचा विश्वास प्राप्त करुन आपल्या स्वमालकीची पाच एकर जमीन पुनर्वसनासाठी दिली. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना आपल्या शिक्षण संस्थेत शिक्षणाची, अमृत उद्योग समूहात कामाची सोय केली, पुनर्वसनासाठी संगमनेर-अकोल्यातील शासकीय जमिनी उपलब्ध करुन दिल्या. या सर्वांचा परिपाक म्हणजे सुरुवातीला प्रकल्पालाच विरोध करणारे धरणग्रस्त नंतरच्या काळात धरणासाठी आग्रही झाल्याचे अनोखे चित्रही याच निळवंडे धरणाने राज्याला दाखवले.

एकीकडे संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागांना पाणी देण्यासाठी निळवंडेच्या कामाला गती मिळाली असतांना दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडून आमदार थोरात यांनी संगमनेर शहरासाठी स्वतंत्र पाईपलाईचा निर्णय मंजुर करवून घेतला. त्यासाठी धरणाच्या मुख्य भिंतीत 711 एम.एम.व्यासाचा पाईपही टाकला गेला आणि तेथून गुरुत्वाकर्षाणाच्या जोरावर 37 किलो मीटर अंतरावरील संगमनेर शहराला मुबलक पाणी देणारी योजनाही प्रत्यक्षात उतरविली. धरणाचे काम प्रगतीपथावर असतांना दुसरीकडे डावा आणि उजवा कालवाही खोदला जात होता. धरणपूर्ण होताहोता संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा, गणेशवाडी (झोळे) व कौठे कमळेश्वर या ठिकाणी बोगद्यांचीही कामे पूर्णत्त्वास गेली.

आज मितीस निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असून बुधवारी त्यातून पाणी सोडण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यासह भोजपाचे अनेक दिग्गज या कार्यक्रमाला हजर होते. मात्र पुराणात ज्या सगरराजा दिलीपचा सुपुत्र भगीरथाने आपल्या 60 हजार भावंडांचा उद्धार करण्यासाठी कठोर तपश्चर्या करुन जगदायिनी गंगेला भूमिवर अवतीर्ण केले आणि साक्षात गंगेलाच भागीरथी म्हटले जावू लागले. त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता व सिन्नर तालुक्यातील 68 हजार 878 हेक्टर दुष्काळी क्षेत्राचा उद्धार करणार्या आमदार बाळासाहेब थोरात यांना कालव्याच्या उद्घाटन सोहळ्यातील उपस्थितीच्या नैसर्गिक अधिकारांपासून मात्र वंचित ठेवण्यात आले.

हा प्रकार राजकीय षडयंत्राचाच भाग असल्याचे सर्वसामान्यांना ज्ञात असल्याने कालव्यांची चाके फिरवून बरेही कोणीही पाणी सोडू देत, मात्र कालव्यांतून वाहणारे पाणी धरणात आणणार्या आणि त्यासाठी धरण बांधणार्या आमदार बाळासाहेब थोरात यांचे जनतेच्या मनातील श्रेय मात्र कोणीही हिरावू शकत नाही अशी भावना या प्रकल्पाचा इतिहास जाणणारा प्रत्येकजण व्यक्त करतोय. बरं ही गंगा कालव्यांमधून अवतीर्ण करणार्या भगीरथाला या सोहळ्यापासून दूर ठेवले गेले असेल, पण ती त्यांच्याच दिशेकडे धावत आल्याचे सत्यही कोणी नाकारु शकणार नाही अशाही प्रतिक्रिया आम्हांला प्राप्त झाल्या आहेत. एकंदरीत बाळासाहेब थोरात यांनी गेल्या 25 वर्षांत असंख्य अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत अखेर संगमनेर तालुक्यातील 80 गावांमधील 25 हजार 428 हेक्टर क्षेत्र आठमाही ओलिताखाली आणले आहे या वास्तवाचे दर्शनही बुधवारच्या या सोहळ्यातून घडले.

निळवंडे धरणाची वैशिष्ट्ये..
साठवण क्षमता – 8 हजार 320 दक्षलक्ष घनफूट
लाभ होणारी गावे – 182
संगमनेर तालुक्यातील गावे – 80
लाभक्षेत्र – 68 हजार 878 हेक्टर
सिंचन लाभ – संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता व सिन्नर
उजवा कालवा लांबी – 95 किमी
डावा कालवा लांबी – 85 किमी
याशिवाय अकोले तालुक्यासाठी उच्चस्तरीय डावा व उजवा पाईप कालवा

