केंद्र सरकारमुळे हुकूमशाही पाहायला मिळतेय ः शिंदे अकोले येथे काँग्रेसच्या महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, अकोले
आम्ही सत्तेत आहोत म्हणून काहीही करू शकतो, अशा भूमिकेत भाजपचे नेते शेतकर्‍यांना चिरडत आहेत. विरोधात बोलले म्हणून खासदार राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्याचेही सोशल मीडिया अकाउंट बंद केले जात आहे. हुकूमशाही काय आहे, हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळे आज पाहायला मिळत आहे. त्याविरोधात पेटून उठून काँग्रेसचा सर्वधर्म समभावाचा विचार घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

अकोले तालुका महिला काँग्रेस व शहर काँग्रेसच्यावतीने गुरुवारी (ता.28) आयोजित महिला मेळव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे होत्या. व्यासपीठावर काँग्रेसच्या प्रदेश महासचिव उत्कर्षा रूपवते, लता डांगे, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, नगराध्यक्षा संगीता शेटे, दिलशाद शेख, मंदा नवले, स्वाती नवले, अरुणा पांडे, वनिता शेटे, सुमन जाधव उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाल्या, महिला घर सांभाळण्यासारखे अवघड काम करतात. तेव्हा राजकारणातील जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडत आहेत. आज भारतमातेला केवळ एक माताच वाचवू शकते. काँग्रेसने नेहमी महिलांना नेतृत्व, सन्मान दिला आहे. याउलट, भाजप सरकार महिलांचे शोषण करत आहे. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. आपण गप्प बसलो, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांना 40 टक्के उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले. अकोल्यातही नगरपंचायत निवडणुकीत महिलांना जादा जागा देऊ. महिलांनो, तुम्ही धाडस करा. तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे, असा विश्वासही प्रणिती शिंदे यांनी शेवटी महिलांना दिला.

तांबे म्हणाल्या, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष व सर्वसामान्यांचा पक्ष आहे. महिलांची काळजी घेणारा पक्ष आहे. देशातील भाजप सरकार संविधानाची गळचेपी करत आहे. रूपवते यांनी मनोगत व्यक्त करीत दया पवार यांच्या कवितेचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन प्रा. सतीश पाचपुते, आरिफ तांबोळी, शिवाजी नेहे यांनी केले.

महिलांचे आज अनेक ठिकाणी शोषण होत आहे. त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडल्यावर शासन कायदे करते. मात्र, मुलांनाच चांगले संस्कार दिले, तर कायद्याची गरज राहणार नाही. शाळेत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यापेक्षा मुलांनाच, महिलांचा आदर कसा करावा, याबाबतचा धडा असावा.
– प्रणिती शिंदे, आमदार

Visits: 11 Today: 1 Total: 82659

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *