नेवासा, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यांत पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे व 3 तलवारी हस्तगत; तर चौदा गुन्हेगार गजाआड
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यांमध्ये पोलिसांनी नुकतेच ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. यामध्ये पोलिसांनी 14 गुन्हेगारांना जेरबंद करतानाच त्यांच्याकडून 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे व 3 तलवारी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईने गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली असून कारवाईचा धसका घेतला आहे.
श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यांतील 81 सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून ह्या गुन्हेगारांचे उपविभागीय दंडाधिकारी, श्रीरामपूर व अहमदनगर यांच्याकडून त्यानंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, डॉ. दीपाली काळे, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, रणजीत डेरे, मसूद खान, विजय करे, संजय सानप, नंदकुमार दुधाळ, सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, रामचंद्र कर्पे, सचिन बागुल, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील 25 पोलीस उपनिरीक्षक व 350 पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.
त्यानुसार गुरुवारी (ता.29) पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यांमध्ये कारवाई करुन 81 गुन्हेगारांच्या घर झडत्या घेऊन अवैध शस्त्रांचा शोध घेतला. यामध्ये अशोक उर्फ देवा जालिंदर लष्करे (रा. संभाजीनगर, नेवासा फाटा), रितेश पूनमचंद साळवे (रा. मक्तापूर, ता. नेवासा), शुभम विश्वनाथ गर्जे (रा. बडुले, ता. नेवासा), लक्ष्मण सहादू अडांगळे (रा. गंगानगर, ता. नेवासा), शाहरुख युनूस पटेल (रा. संजयनगर, श्रीरामपूर), किरण रामू धोत्रे (रा. बाजारतळ, श्रीरामपूर), अनिल बाळू इरले (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), कैलास रामू धोत्रे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) काशिनाथ बबन शिंदे (रा. बेवाडी, सावेडी, अहमदनगर), शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख (रा. घोडेगाव, झोपडपट्टी, ता. नेवासा), अनिल कचरु साळुंके (रा. गंगापूर, जि. औरंगाबाद), मयूर दीपक तावर (रा. श्रीरामपूर), नागेश पाराजी जाधव (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), सिध्दार्थ अशोक नवले (रा. गंगापूर, जि. औरंगाबाद) या सराईत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे व 3 तलवारी असा एकूण 2 लाख 13 हजार 900 रुपयांची अवैध शस्त्रे जप्त केली आहेत.
दरम्यान, वरील आरोपींविरोधात यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, हाणामारी, खुनाचा प्रयत्न, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, विनयभंग, चोरी, दरोड्याची तयारी करणे अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगांरामध्ये एकच खळबळ उडाली असून, अनेकांची कारवाईचा धसका घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनी असाच कारवाईचा सिलसिला सुरू ठेवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्या, असा सूर नागरिकांतून उमटत आहे.