संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाला हिंसाचाराचे गालबोट! डॉ.विखेंच्या मंचावरुन अश्लाघ्य भाषेचा वापर; माजीमंत्री थोरात यांचे कार्यकर्ते संतप्त, तालुका पोलीस ठाण्यात ठिय्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

गेल्या आठ दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या विविध भागात सुरु असलेल्या भाजप नेते डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या युवा संकल्प यात्रेच्या राजकीय मंचावरुन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांच्या बद्दल अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले गेले गेल्याने धांदरफळसह संपूर्ण तालुक्यातून त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या थोरातांच्या समर्थकांनी सभास्थानी निषेध व्यक्त केला तर, काही संतप्त कार्यकर्त्यांनी सभेवरुन परतणाऱ्या एका वाहनावर चिखलीजवळ हल्ला करुन ते पेटवून दिले. त्यामुळे गेल्या चार दशकांपासून जोपासल्या जाणाऱ्या राजकीय सुसंस्कृतपणाला संगमनेरात हिंसेचे गालबोट लागले.

विधानसभेची घोषणा झाल्यानंतर संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या भाजप नेते डॉ.सुजय विखे-पाटील यांनी युवा संकल्प यात्रा काढून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटनिहय सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी थोरात आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीसह त्यांच्या कन्या डॉक्टर जयश्री यांच्यावरही वेळोवेळी वक्तव्य केलं. त्यातून दोन्ही नेत्यांच्या मुला-मुलीमध्ये शाब्दिक वार रंगलेले असतानाच आज डॉक्टर विखे यांच्या युवा संकल्प यात्रेच्या निमित्ताने धांदरफळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी त्यांच्या राजकीय मंचावरुन मनोगत व्यक्त करताना धांदरफळ येथील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत देशमुख यांची जीभ घसरली आणि त्यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मंचावरील काहींनी देशमुख यांना भाषण थांबवण्यास भाग पाडले. मात्र या कार्यक्रमाचे काही यूट्यूब चॅनेलवरुन थेट प्रसारण सुरु असल्याने काही क्षणातच या वक्तव्याचे पडसाद सभा सुरु असलेल्या धांदरफळसह तालुक्याच्या विविध भागात उमटू लागले.
धांदरफळ मधील थोरात समर्थक कार्यकर्त्यांनी सभास्थानी जाऊन घोषणाबाजी केली. मात्र तोपर्यंत सभा संपलेली असल्याने बहुतेकजण आपापल्या वाहनांकडे निघाले होते. यादरम्यान धांदरफळच्या दिशेने निघालेल्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी चिखली नजीक सभेवरुन परतणाऱ्या एका वाहनाला रस्त्यात अडवून त्यातील प्रवाशांना खाली उतरवून ते पेटवून दिले. तर, अकोले उड्डाणपूलाजवळही तसाच प्रकार घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शेकडो कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी डॉक्टर सुजय विखे व वसंत देशमुख यांच्यासह सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ठिय्या दिला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाल्याने वातावरण  तणावपूर्ण बनले आहे. पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह शहर व तालुका पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
Visits: 48 Today: 2 Total: 112725

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *