‘वाळु वहा, तहसीलदार पहा’ ही यांची संस्कृती : डॉ.सुजय विखे पा. भाजपचा युवा संकल्प मेळावा; सलग तिसर्यांदा नाव न घेता थोरांतावर टीकास्त्र..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अद्याप कशात काही नाही, मी एक वाक्यही बोललो नाही. तरीही आपल्याला काही काही ऐकायला मिळतंय. कोणी बाप काढतोय, कोणी संस्कृतीवर बोलतोय. कोणीतरी म्हणालं यांच्या भाषणातून संस्कृती दिसते. चर्चा करायचीच असेल तर, महसूलमंत्री म्हणून दोन्ही बाजुच्या संस्कृतीवर चर्चा झाली पाहिजे. यांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात एकही शासकीय जमीन उद्योग-धंद्यासाठी दिली नाही तर, फक्त स्वतःच्या संस्थेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी ती मिळवली. प्रत्येक गावच्या गायरान जमीनी तेथील सरपंचाला हाताशी धरुन, ग्रामपंचायतीचे ठराव करुन स्वतःच्या घशात घातल्या. तर, तिकडच्या महसूलमंत्र्यांची संस्कृती काय? जवळपास साडेतिनशे कोटी रुपयांच्या जमीनी आम्ही गावाच्या विकासासाठी देवू केल्या, पाचशे एकर जमीनी औद्यौगिक वसाहतींना देवून गोरगरीबांच्या मुला-बाळांचे भविष्य सुरक्षित केले. इथली संस्कृती म्हणजे ‘वाळु वहा आणि तहसिलदारांनी पहा’ इतक्यावरच मर्यादीत असल्याची घणाघाती टीका भाजपचे युवानेते, माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी बुधवारी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील युवा संकल्प मेळाव्यात बोलताना केली.

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून जिल्ह्यातील विखे-थोरात यांच्यातील राजकीय संघर्षाला धार चढत असल्याचे चित्र दिसत असतानाच नगर दक्षिणेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी भाजपकडे संगमनेरची उमेदवारी मागण्यासह ‘युवा संकल्प मेळाव्या’च्या माध्यमातून तालुक्यातील गटागटात सभा घेत जोरदार शक्ति प्रदर्शन घडवण्यास सुरुवात केली आहे. या सभांमधून होणार्या त्यांच्या तडाखेबंद भाषणातून ते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका करीत असून थोरातांची चाळीस वर्षांची राजकीय कारकीर्द दहशत आणि दडपशाहीने भरलेली असल्याचा घणाघात ते वारंवार करीत आहेत. त्यातून तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाला कलाटणी मिळाली असून एकमेकांवर खालच्या स्तरावर जावून आसूड ओढणारी नवीन संस्कृती तालुक्यात रुजू लागली आहे.

तळेगाव दिघे, साकूरनंतर बुधवारी (ता.23) तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे डॉ.सुजय विखे-पाटील यांचा ‘युवा संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. वाळु वाहता वाहता संगमनेर तालुक्यातील रस्त्यांची वाताहत झाली, माणसं डंपरखाली चिरडून मेली. काही दिवसांचे महसूलमंत्री असताना तर वाळु तस्करांची मुजोरी इतकी वाढली की, तहसीलदार आणि तलाठ्यांमध्येही त्यांची गाडी अडवण्याची हिम्मत नव्हती अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले. मात्र त्याचवेळी राज्याच्या महसलूखात्याची जबाबदारी आपल्याकडे आल्यानंतर तालुक्यातील वाळु तस्करांचा बंदोबस्त करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न विखे-पाटील परिवाराने केल्याची पृष्टीही त्यांनी जोडली.

गोरगरीबाला संपवण्याचे आणि ठेकेदार कसा जिवंत राहील, आपण आयुष्यभर कशी सत्ता उपभोगू शकतो ही येथील संस्कृती बदलण्याची वेळ आली आहे. तुम्ही संस्कृतीचा प्रश्न विचारला. ही दडपशाहीची, गुंडगिरीची संस्कृती या निवडणुकीत सर्वसामान्य जनता उखडून फेकेल. तुम्ही मुख्यमंत्रीच काय आमदारही होणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. युवा संवाद यात्रेचा समाचार घेताना त्यांनी तुमच्या यात्रेत सर्वसामान्य युवक का सहभागी होत नाहीत असा सवाल उपस्थित करीत यांच्या 40 वर्षांच्या राजकीय व्यासपीठावरील उपस्थितांची यादी पाहिली तर बाप, त्याच्यानंतर त्याचा मुलगा आणि त्यानंतर त्यांचा नातू याशिवाय कोणीही दिसणार नसल्याची जहरी टीका त्यांनी केली.

निळवंड्याच्या पाण्यावर अनेक वर्ष राजकारण झाले, भाषणं झाली, फ्लेक्स लागले. कालव्याला पहिले आवर्तन सुटले त्यावेळी यांचा एक हात वर आला, दुसरे सुटले त्यावेळी दोन्ही हात वर आले आणि आता तिसरे सुटेल तेव्हा काय? अशी मिश्किल टीकाही डॉ.सुजय विखे-पाटलांनी केली. निळवंड्याला विखे-पाटील परिवाराने विरोध केल्याचे हे स्वर्गीय बाळासाहेब विखे-पाटलांपासून सर्वावर आरोप करताना सांगतात. मात्र आपण आभारी आहोत माजीमंत्री मधुकर पिचड यांचे. ते नसते तर, संगमनेर तालुक्याला कधीही निळवंड्याचे पाणी मिळाले नसते. आम्हाला श्रेय घ्यायचे नाही, पण तुम्ही कधीतरी खरं बोला. पिचड साहेबांचे योगदान कोणीही नाकारु शकणार नाही असा टोला लगावताना त्यांनी ज्या विखे पाटलांवर विरोधाचा आरोप लावला गेला, त्याच धरणाचे पाणी कालव्यांना सोडण्याचा मान नियतीने त्यांना दिला अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.

यापुढे तालुक्यातील लोकांनी दडपशाही, दहशतमुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यांची दहशत मोडून एकदा महायुतीकडे सत्ता द्या येथील प्रत्येक माणूस राजासारखा राहील. इथला प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य अंगणवाडीचे पैसे खातो असा गंभीर आरोप करताना त्यांनी ज्या अंगणवाड्यांची निर्मिती गोरगरीबांच्या मुलांसाठी झाली आहे त्या लोकांच्या भविष्याची टक्केवारीही खाता यापेक्षा मोठी लाजीरवाणी गोष्ट नसल्याचा घणाघात करताना यावेळी तालुक्यात परिवर्तनाची नांदी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. संगमनेर खुर्द जिल्हा परिषद गटात मोडणार्या हिवरगाव पावसामधील या मेळाव्याला मोठी उपस्थिती दिसून आली.

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर मतदारसंघात माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील युवा संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून निवडणुकीचे वातावरण तापवत आहेत. महायुतीत ही जागा शिवसेनेकडे आहे, मात्र अद्याप येथील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर संगमनेरची जागा भाजपकडे जाईल की नीलेश राणे यांच्याप्रमाणे डॉ.सुजय विखे-पाटीलही निवडणुकीसाठी शिवबंधन हाती बांधतील याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही.

