हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्रच; मुख्तार अब्बास नक्वींचे मोठे विधान शिर्डीत सपत्नीक साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद


नायक वृत्तसेवा, शिर्डी
प्रसिद्ध उर्दू कवी अल्लामा इकबाल यांच्या कवितेतील चार ओळी वाचून माजी केंद्रीय मंत्री भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी शिर्डीत मोठं विधान केलं आहे. हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्रच आहे. ‘हिंदी है हम वतन हे हिंदुस्ता हमारा’ अल्लामा इकबाल यांच्या कवितेतील चार ओळी वाचून नक्वी यांनी हिंदुस्थान हे कसे हिंदू राष्ट्र आहे, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदी आणि हिंदू एकच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज शिर्डीत येवून सपत्नीक साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साईबाबांच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी नक्वी दाम्पत्याचा शॉल, साई मूर्ती देवून सन्मान केलाय. यावेळी दर्शनानंतर नक्वी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात काही शहरांची आणि गावांची नावं बदलली जातायत तर काहींची नावं बदलण्याची मागणी केली जातेय. इतिहासात काही छेडछाड केली जात नाही. केवळ गाळलेल्या जागा भरल्या जात असल्याचं नक्वी शिर्डीत म्हणाले.

जिथे कुठे विदेशी ओळख असेल, तर तिथे स्वदेशी जान असली पाहिजे, असं सांगत इतिहास हा सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या वेळी लोकांनी मोडून तोडून आणि आपल्या सुविधेनुसार लिहिला आहे. भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार यापासून काही अंतर राहिलं गेलंय. ते कमी किंवा दूर होत असेल तर चांगली गोष्ट आहे. यात काही राजकारण आहे असं वाटत नसल्याचं नक्वी शिर्डीत म्हणाले. अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आपल्या देशात लोकशाही आहे. लोक आपल्या वेगवेगळ्या सूचना करून नामांतराची मागणी करत असतात. यावर सरकार संवेदनशीलतेने विचार करून आणि चर्चा करून निर्णय घेत असतं, असं नक्वी यांनी स्पष्ट केलं.
शिर्डीच्या साईबाबांनी जगाला जो सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा महामंत्र दिलाय तो सार्थक आहे. साईबाबांनी संपूर्ण जगाला शांती, एकता आत्मविश्वासाचा जो मंत्र दिलाय. याचे पालन भारत देश करत असून या संदेशाचे पालन संपूर्ण जगाने करायला पाहिजे, असं नक्वी यांनी म्हटलं. मी खूप भाग्यशाली आहे. आज साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला सपत्नीक उपस्थिती राहिलो. साईबाबांचं दर्शन घेवून मनाला खूप समाधान मिळालं असल्याचं मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले.

Visits: 18 Today: 2 Total: 115117

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *