वर्गीकरणाच्या सक्तीमुळे कचराकुंड्यांचे पुनरुज्जीवन! शहर पुन्हा अस्वच्छतेकडे; पहाटेच्या अंधारात फेकला जातोय कचरा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही दिवसांपासून पालिकेच्यावतीने शहरातून गोळा केल्या जाणार्‍या घनकचर्‍याचे ओला व सुका ऐवजी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्याची सक्ती केली जात आहे. त्याचा परिणाम संगमनेरकरांमध्ये नाराजी निर्माण होण्यात झाला असून अनेकजण नसती झंझट नको म्हणून पूर्वीप्रमाणेच गल्ली आणि चौकातील कोपरे हेरुन अंधारात गुपचूप तेथे कचरा टाकत आहेत. त्यामुळे शहरातील गजबजलेल्या भागांमध्ये पुन्हा कचर्‍याचे ढीग साठू लागले असून शहरातून जवळजवळ हद्दपार झालेल्या कुचराकुंड्यांचेही पुनरुज्जीवन होवू लागले आहे. पालिकेने वेळीच यावर उपाय शोधण्याची आवश्यकता आहे, अन्यथा वर्गीकरणाच्या अतिरेकामुळे शहरातील कोपरे पुन्हा कचर्‍याने ओसंडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


संगमनेर शहरातून जमा होणारा घनकचरा संगमनेर खुर्दजवळील पालिकेच्या जागेत साठवला जातो व तेथे त्याच्यावर प्रक्रिया करुन त्यापासून खतनिर्मिती होते. यापूर्वी कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी या परिसरात मोठे खड्डे घेवून त्यात कचरा दाबला जात असल्याने त्याचा अंश जमिनीत उतरुन आसपासच्या परिसरातील पाण्याचे उद्भव दुषीत झाले. त्यातही सदरील कचरा डेपो संगमनेर खुर्दच्या पश्‍चिमेला असल्याने त्या दिशेने वाहणार्‍या वार्‍यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत बारामाही दुर्गंधी पसरलेली असत. येथील कचरा डेपोत बेकायदा कत्तलखान्यांमधील टाकावू अवशेषही टाकण्याचे प्रकार यापूर्वी उघड झाले होते.

त्यामुळे संगमनेर खुर्दच्या ग्रामस्थांनी एकजूट होवून गेल्या दशकात पालिकेच्या तेथील कचराडेपोला कडाडून विरोध करीत तो तेथून हलवण्यासाठी मोठे जनआंदोलन उभे केले. त्यातून पालिकेने रायतेवाडीजवळ पर्यायी जागेचा शोध घेतला, मात्र तेथेही विरोध होवू लागल्याने कचरा साठवण्याबाबत मोठा पेच निर्माण झाला होता. तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी याबाबत पुढाकार घेवून कचर्‍याची विल्हेवाट लावण्याच्या पारंपरिक पद्धतीत अमुलाग्र बदल करुन अत्याधुनिक मशिनरीसह संगमनेर खुर्दच्या कचराडेपोला सुरक्षा भिंत घातल्याने आसपासच्या परिसरात पसरणार्‍या दुर्गंधीवर बर्‍याचअंशी मर्यादा आल्या. मात्र त्या उपरांतही संगमनेर खुर्दच्या ग्रामस्थांचा तेथील कचराडेपोला असलेला विरोध आजही शमलेला नाही.


एकीकडे कचरा साठवण्याबाबतच्या जागेवर दीर्घकाळापासून पालिका आणि ग्रामस्थ असा वाद सुरु असतानाच आता पालिकेच्या मुख्याधिकारीपदी आलेल्या रामदास कोकरे यांनी आपले संपूर्ण लक्ष घनकचरा निर्मुलनाकडे दिल्याने सुरुवातीचे काही दिवस शहरात त्याचा परिणामही दिसून आला. मात्र आता त्यांनी पारंपरिक पद्धतीने ‘ओला आणि सुका’ या दोन वर्गीकरणासह प्लॅस्टिक, कापडं आणि इतर अशा विविध प्रकारांमध्ये विलगीकरण केलेला कचराच स्वीकारण्याबाबत घंटागाड्यांना सक्ती केल्याने दररोज शहरातून घनकचरा गोळा करणार्‍या कर्मचार्‍यांसोबत महिलांचे वाद होवू लागले आहेत.


मात्र मुख्याधिकार्‍यांचा सक्तिचा आदेश असल्याने कर्मचारीही हतबल झाले असून आदेशाची अंमलबजावणी करण्याशिवाय त्यांच्यासमोर अन्य पर्याय नसल्याने त्यांचाही नाईलाज झाला आहे. यासर्वांचा परिणाम संगमनेरकरांमध्ये कचर्‍याच्या वर्गीकरणावरुन नाराजी निर्माण होत असून अनेकांनी घंटागाडीला कचरा देवून वाद करीत बसण्यापेक्षा पूर्वीप्रमाणे गुपचूप प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ओला-सुका, हिरवा-निळा असा सगळ्याच प्रकारचा कचरा एकत्रित भरुन तो आता गल्ल्या अथवा चौकाच्या एखाद्या कोपर्‍यात नेवून टाकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यातून गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या गल्लीबोळातून जवळजवळ हद्दपार झालेल्या कचराकुंड्यांचेही पुनरुज्जीवन होवू लागले आहे.


अतिशय गतीने विकसित झालेला मोठ्या लोकसंख्येचा परिसर म्हणून मालदाडरोडची ओळख आहे. आजच्या स्थितीत या रस्त्यावर हजारो निवासी घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानं असून त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात घनकचरा गोळा होतो. मात्र यापूर्वीच्या ओला आणि सुका अशा दोन भागात होणार्‍या त्याच्या वर्गीकरणासह नव्याने प्लॅस्टिक, कापडं व अन्य अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कचर्‍याचे भाग केलेले असतील तरच घंटागाडीवरील सफाई कर्मचारी कचरा स्वीकारीत असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्यासह शहराच्या अस्वच्छतेतही भर पडू लागली आहे. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांची भूमिका प्रथमदर्शनी योग्य वाटत असली तरीही त्यात बदल न झाल्यास शहराची अवस्था पुन्हा पूर्वीप्रमाणेच होण्याची दाट शक्यताही यातून निर्माण झाली आहे. पालिका प्रशासकांनी यावर गांभीर्याने विचार करुन मध्यम मार्ग शोधण्याची गरज आहे.


केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होवून संगमनेर नगरपरिषदेने आजवर पथदर्शी काम करताना विविध बक्षिसेही पटकावली आहेत. त्यातूनच घनकचर्‍याची विल्हेवाट लागवण्यासाठी कचराडेपोत अद्ययावत यंत्रसामग्रीही बसवण्यात आली. माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी घरोघरी जावून ओला व सुका अशा पद्धतीने कचर्‍याचे वर्गीकरण करण्याबाबत जागृकता निर्माण केल्याने त्याचा मोठा परिणाम शहरात दिसत असतानाच आता दोनपेक्षा अधिक प्रकारांमध्ये कचर्‍याचे वर्गीकरण करण्याच्या सक्तीने महिलावर्गात मोठी नाराजी निर्माण होवू लागली आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 82081

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *