करोनात राहुरी पंचायत समितीचे चांगले काम ः डॉ. तनपुरे पंचायत समिती पदाधिकार्यांच्या पुढाकारातून 135 कर्मचार्यांचा गुणगौरव

नायक वृत्तसेवा, राहुरी
करोना संकटावर मात करण्यात राहुरी पंचायत समितीच्या सर्व विभागाने चांगले काम केले आहे. या कर्मचार्यांचा गुणगौरव व्हावा, अशी इच्छा पंचायत समितीच्या पदाधिकार्यांची होती. त्यामुळे अशा स्वरूपाचे कार्यक्रम भविष्यातही होवो, अशी इच्छा माजी नगराध्यक्षा डॉ. उषा तनपुरे यांनी व्यक्त केली.

राहुरी कृषी विद्यापीठाच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात पंचायत समितीच्यावतीने 135 कर्मचार्यांचा गुणगौरव समारंभ डॉ. तनपुरे यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी सभापती बेबी सोडनर होत्या. यावेळी उपसभापती प्रदीप पवार, गटनेते रवींद्र आढाव, माजी सभापती मनीषा ओहोळ, माजी सभापती व विद्यमान सदस्या सुनीता निमसे, बाळासाहेब लटके, जिल्हा परिषद सदस्या जनाबाई पैसे, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेश निमसे, अण्णासाहेब सोडनर, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अनंत परदेशी आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना डॉ. तनपुरे म्हणाल्या, प्रशासनाच्या समन्वयामुळे शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात आल्या. करोना महामारीमुळे शासन प्रत्येकाला घरीच थांबा असे एकीकडे सांगत असले तरी शासनाचे शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, डॉक्टर यांना मात्र जनतेमध्ये जाऊन त्यांची सेवा करावी लागत होती. या काळात आपली सेवा बजावित असताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. राहुरी पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनी एक कर्तव्य म्हणून तुम्हा कर्मचार्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात गुणगौरव करण्याची इच्छा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना बोलून दाखवली. त्यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम होत असल्याचे डॉ. तनपुरे यांनी सांगितले. यावेळी गटनेते रवींद्र आढाव, सुनील शेलार, सर्जेराव राऊत, सुरेखा शिंदे, उपसभापती प्रदीप पवार, सदस्य बाळासाहेब लटके, जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी अर्जुन गारुडकर, उपभियंता संजय खिळे, विनायक मुळे, वसंत राऊत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले तर आभार उपसभापती प्रदीप पवार यांनी मानले.
