कोल्हेंचा अडथळा सरला मात्र शिंदेसेनेची नाराजी कायम! कोपरगाव विधानसभा मतदारसंघ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट..


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
राज्याच्या स्थापनेनंतर आजवर झालेल्या दहामधील सहा निवडणुकांमध्ये कोपरगाव मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व राखणार्‍या कोल्हे परिवाराची समजूत घालण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर यश आले आहे. विवेक कोल्हे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विधान परिषद अथवा राज्यसभेचा शब्द देण्यात आल्याने त्यांच्याकडून होणारे संभाव्य बंड शमल्यात जमा आहे. मात्र त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचे काम केले नसल्याचा ठपका ठेवून कोपरगावातील शिवसैनिकांनी बंडाची हाक देत नितीन औताडे यांच्या उमेदवारीची मागणी केल्याने कोपरगावच्या जागेवर ‘पेच’ निर्माण झाला आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जागेवर महाविकास आघाडीकडून विवेक कोल्हे यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र तत्पूर्वीच त्यांचे बंड थोपवले गेल्याने आघाडीला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.


मागील अनेक दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीसह काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या महाविकास आघाडीत जागावाटपाच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात अनेक राजकीय घडामोडी होवून संयुक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन भाग झाले. त्यातील प्रत्येकी एका गटाने भाजपशी संधान साधून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता उलथवली. त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी सीमा गाठलेली असतानाच विधानसभेच्या निवडणुका येवून ठेपल्याने दोन्ही बाजुकडून एकमेकांची ताकद दाखवण्याची कवायत सुरु झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व 288 मतदार संघांचा सूक्ष्म अभ्यास करुन जिंकून येणार्‍या उमेदवारांना संधी देण्यासह बंडखोरी टाळण्यासाठीच्या उपयायोजनाही केल्या जात आहेत. त्यासाठी डावलण्यात आलेल्या इच्छुकांना वेगवेगळे शब्द दिले जात आहेत.


माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन सलग दोनवेळा झालेल्या आपल्या पतीच्या पराभवाचा वचपा काढताना शिवसेनेच्या आशुतोष काळे यांचा 29 हजार 270 मतांनी पराभव करीत विधानसभा गाठली होती. तत्पूर्वी 1999 पर्यंत हा मतदार संघ काँग्रेसच्या माध्यमातून शंकरराव कोल्हे यांच्याकडे होता. मात्र राज्यातील राजकीय गणितं बदल्यानंतर 2004 साली अशोक काळे यांनी शिवसेनेकडून लढताना काँग्रेसच्या बिपिन कोल्हे याचा सलग दोनवेळा पराभव केला. विशेष म्हणजे 2004 साली झालेल्या पराभवानंतर कोल्हे यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यातही त्यांना अपयशच बघायला मिळाले.


2014 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारबाबत मोठी नकारात्मकता निर्माण होवून त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांची केंंद्रीय राजकारणात एन्ट्री झाली. त्यावेळी देशभरात मोदीलाट निर्माण झाल्याने वाहत्या वार्‍याचा झोत लक्षात घेवून शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा स्नेहलता यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन कोपरगावचे तिकिट मिळवले. त्यावेळी भाजप-सेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीतही बेबनाव निर्माण झाल्याने त्यावेळची निवडणूक राज्यातील चारही प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढवली होती. मात्र या उपरांतही कोल्हे यांनी तब्बल 51 टक्के मतांसह शिवसेनेकडून उमेदवारी करणार्‍या आशुतोष काळे यांचा 29 हजार 270 मतांनी पराभव केला.


2019 सालच्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील मातब्बर नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपले सुपूत्र डॉ.सुजय यांच्यासह काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत डॉ.सुजय यांनी नगर दक्षिणेत बाजी मारीत लोकसभाही गाठली. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आपले महत्त्व अबाधित ठेवून मंत्रीमंडळात वर्णी लागावी या उद्देशाने विखे परिवाराकडून कोपरगावमधून राजेश परजणे यांना अपक्ष म्हणून उभे करण्यात आले. त्याचा परिणाम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होवून भाजपच्या स्नेहलता कोल्हे याचा अवघ्या 822 मतांनी निसटता पराभव झाला. त्या निवडणुकीत परजणे यांना 15 हजार 446 मतं मिळाली होती. त्यामुळे आपल्या पराभवाला विखे-पाटीलच जबाबदार असल्याचा थेट आरोप करीत कोल्हे परिवार भाजपपासून दुरावला होता.


त्यातही यावेळच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीची शकलं उडून अजित पवारांसह जवळपास 39 आमदारांचा गट वेगळा होवून महायुतीत सहभागी झाल्याने स्नेहलता कोल्हे व त्यांचे सुपूत्र विवेक कोल्हे यांचे राजकीय भवितव्य अधांतरीत झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांनी विवेक कोल्हे यांच्याशी जवळीक साधून विखेंच्या वळचणीला गेलेला आणि आठ वर्ष बंद पडलेला गणेश सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याच्या हालचाली करुन त्यात यशही मिळवले. त्यानंतर झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांनी निर्भेळ यश मिळवल्याने भाजपात नाराज असलेले विवेक कोल्हे थोरातांच्या सोबतीने महाविकास आघाडीकडून कोपरगावची उमेदवारी करतील अशी स्थिती निर्माण झालेली होती. तसे घडले असते तर गणेश कारखान्याच्या सभासदांकडून शिर्डीचे विद्यमान आमदार आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्याचा अप्रत्यक्ष फटका बसला असता.


त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या वरीष्ठ पातळीवरुन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह विवेक कोल्हे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु होते. मंगळवारी (ता.22) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दोनवेळा स्नेहलता कोल्हे यांच्याशी चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यासाठी विवेक कोल्हे यांना राज्यसभा अथवा विधान परिषदेत संधी देण्याचा शब्दही दिला गेला. त्यानंतर आज फडणवीस यांनी स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांच्याकडूनही ‘कोल्हें’ना शब्द मिळवून दिल्याने कोपरगावातील संभाव्य बंड थोपवण्यात भाजपला अखेर यश आले आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेच्या शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे काम केले नसल्याचा आरोप करीत नितीन औताडे यांच्या उमेदवारीची मागणी केल्याने कोपरगावात नवा पेच निर्माण झाला आहे. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय तोडगा काढतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.


गेल्याकाही दिवसांपासून अवघ्या राज्याला परिचित असलेला बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातील राजकीय वाद शिगेला पोहोचला आहे. मध्यंतरी झालेल्या राहाता बाजार समिती व गणेश सहकारी साखर कारखाच्याच्या निवडणुकीत थोरातांनी विवेक कोल्हेंच्या साथीने विखे-पाटलांना धोबीपछाड दिल्याने कोपरगावसह शिर्डी विधानसभेची जागाही धोक्यात आली होती. मात्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई करीत कोल्हे आई-लेकराची समजूत काढण्यात यश मिळवल्याने भाजपच्या दृष्टीने या दोन्ही जागा सुरक्षित झाल्याचे मानले जात आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 83548

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *