प्रवरापात्रात उडी मारुन व्यापार्याची आत्महत्या! संगमनेरातील हृदयद्रावक घटना; कारण मात्र अद्यापही अस्पष्ट..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरातील अतिशय गजबजलेल्या परिसरातील किराणा दुकानदार श्याम अंबादास सिरसुल्ला (वय 52) यांनी आज दुपारी प्रवरानदीपात्रात उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. अत्यंत सुस्वभावी, हसतमुख आणि संयमी व्यक्ति म्हणून संपूर्ण परिसरात त्यांची ओळख होती. कोणत्यातरी क्षुल्लक कारणावरुन त्यांनी इतक्या टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खराडी शिवारातील नदीपात्रातून वाहून जाणारा अज्ञात इसमाचा मृतदेह स्थानिक तरुणांनी बाहेर काढून सोशल माध्यमात त्याची छायाचित्रे प्रसारित केल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता.1) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडल्याची शक्यता आहे. शहराच्या जून्या उपनगरांमध्ये गणल्या जाणार्या अतिशय गजबजलेल्या इंदिरानगरमधील जय जवान चौकात वैभव प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे त्यांचे किराणा मालाच्या विक्रीचे दुकान होते. या दुकानाचे मालक श्याम अंबादास सिरसुल्ला (वय 52, रा.बाळेश्वर मंदिर परिसर, मालदाड रोड) यांनी आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पुणे नाक्यावरील पुलावरुन नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली.
मात्र त्यानंतरही सदरचा प्रकार समोर आला नाही. या घटनेनंतर तब्बल दोन तासांनी घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील खराडी शिवारातदुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान काही तरुणांना अज्ञात इसम मृतावस्थेत वाहून येत असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच नदीपात्रात उड्या घेत वाहून जाणार्या इसमाला काठावर आणले व त्याची छायाचित्रे काढून पोलिसांना पाठवण्यासह सोशल माध्यमात प्रसारित केली. त्यानंतर काही वेळातच खराडीत सापडलेल्या ‘त्या’ मृतदेहाची ओळख स्पष्ट झाली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कायदेशीर सोपस्कर पूर्ण करुन सिरसुल्ला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेने मालदाडरोड या त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरासह गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून त्यांनी ज्या भागात व्यवसाय केला त्या संपूर्ण इंदिरानगरमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच पद्मशाली समाजातील नागरिकांसह वरील परिसरातील लोकांनी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली व जावई असा परिवार आहे.
