शिर्डीत होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवून योग्य नियोजन करा! साईसंस्थानसह विविध विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

नायक वृत्तसेवा, शिर्डी
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिर्डीमध्ये साईभक्तांची गर्दी होण्याची शक्यता गृहित धरत जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबत शिर्डी संस्थानसह विविध विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवून त्याचे योग्य नियोजन करा, असे निर्देश या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. तसेच शिर्डीत 25 ते 31 डिसेंबर याकाळात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील दिला जाणार आहे.


टाळेबंदी दरम्यान बंद असलेले शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर हे साईभक्तांसाठी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले आहे. सध्या येथे दररोज बारा हजार साईभक्तांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. मात्र, आता नाताळपासून 31 डिसेंबरपर्यंत शिर्डी येथे दर्शनासाठी येणार्‍या साईभक्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे वर्षाच्या अखेरीस गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासन आत्तापासूनच अलर्ट झाले आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी संस्थानचे अधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदिंची बैठक झाली. या बैठकीमध्ये शिर्डी संस्थानने केलेल्या व्यवस्थेची माहिती संस्थानच्या अधिकार्‍यांनी दिली.
सध्या मंदिरात जाण्यासाठी चार प्रवेशद्वार असून वाहनतळाची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रसादालय सुरू आहे. मात्र नाताळपासून शिर्डीत गर्दी होण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त द्या, अशी मागणी बैठकीत संस्थानच्यावतीने करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी भोसले यांनी पुढील काही दिवस शिर्डीत अतिरिक्त बंदोबस्त देण्यात यावा, अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच शिर्डीत अवजड वाहने येणार नाहीत, यासाठी बाह्यवळण रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. गर्दी न करता कोरोना अनुषंगाने असलेल्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

संचारबंदीचे पालन केले जाईल…
राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री अकरा ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले, ‘राज्य सरकारचा संचारबंदीबाबत निर्णय आला आहे. त्यानुसार आता आम्ही नियोजन केले असून अहमदनगर जिल्ह्यामध्ये पालिका क्षेत्रात संचारबंदीचे पालन केले जाईल.’

Visits: 85 Today: 1 Total: 1101312

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *