शहरालगतच्या उपनगरात रात्रीच्यावेळी ड्रोनच्या घिरट्या! रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण; खोडसाळपणा की चोरीचा उद्देश?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रात्रीच्यावेळी आकाशात ड्रोनद्वारे घिरट्या घालण्याचे प्रकार चर्चेत असताना आता त्याचे लोण संगमनेर शहरापर्यंत येवून पोहोचले आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरालगतच्या गुंजाळवाडी, लक्ष्मीनगर परिसरात एकापेक्षा अधिक ड्रोन फिरत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. रात्री दहानंतर आकाशात लाल-निळे दिवे चमकावित उडणार्‍या ड्रोनचा हा प्रकार खोडसाळपणातून घडतोय की त्यामागे चोरट्यांचे षडयंत्र आहे अशाही चर्चा सुरु झाल्या असून भयभीत झालेल्या नागरिकांना पोलिसांकडून दिलासा मिळण्याची गरज आहे.


मागील जूनपासून जिल्ह्याच्या आसपासच्या मोठ्या शहरांमध्ये रात्रीच्या अंधारात सुरु असलेल्या ड्रोनच्या घिरट्या चर्चेत आल्या असताना हळूहळू तसेच प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, पाथर्डी व जामखेड तालुक्यातूनही समोर आले होते. मात्र त्याची उकल करण्यात पोलिसांना अपयश आले. त्यातच पुणे जिल्ह्यातील मूळशी व बारामती तालुक्यातही अशाच प्रकारे रात्रीच्यावेळी ड्रोन दिसल्यानंतर दुसर्‍या दिवशी काही भागात चोर्‍या झाल्याचेही प्रकार उघड झाल्याने चोरट्यांकडून रेकी करण्यासाठी ड्रोनचा वापर होत असल्याच्या चर्चांना बळ मिळाले होते. वाढत्या तक्रारी लक्षात घेवून स्थानिक पोलिसांनी अशाप्रकारे ड्रोन उडवणार्‍यांचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर तेथील प्रकारांना पायबंद बसला असताना आता त्याचे लोण पुण्याला लागूनच असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात पसरण्यास सुरुवात झाली आहे.


असेच प्रकार आता संगमनेर शहरालगतच्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायत हद्दितही घडू लागले आहेत. गेल्या चार दिवसांपासून गुंजाळवाडी शिवारातील लक्ष्मीनगर, रहाणेमळा, गोल्डनसिटी, बटवालमळा या भागात रात्रीच्यावेळी आकाशात लाल-निळे दिवे चमचम करीत फिरणारे ड्रोन स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास सुरु होणारा हा खेळ मध्यरात्रीनंतरही सुरुच राहत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याबाबत वेगवेगळ्या सोशल समूहातही चर्चा घडत असून कोणी शासकीय सर्वेक्षण असल्याचे सांगत स्वतःलाच दिलास देत आहे तर, कोणी चोरट्यांकडूनच असे प्रकार घडत असल्याची शंका व्यक्त करीत आहे.


दोन दिवसांपूर्वी रात्री अकराच्या सुमारास अशाचप्रकारे आकाशात ड्रोन फिरत असल्याचा आवाज ऐकून माडीवर गेलेल्या लक्ष्मी नगरमधील एका छायाचित्रकाराने एकापेक्षा अधिक ड्रोन फिरत असल्याचे चित्रणही केले आहे. त्यातून ड्रोनची दहशत संगमनेर शहराभोवती घिरट्या घालीत असल्याची चर्चाही घडू लागली आहे. हा प्रकार नेमका काय आहे? याबाबत कोठूनही समाधानकारक माहिती मिळत नसल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मात्र चार दिवसांपासून सुरु असलेल्या अशा प्रकारातून अद्याप चोरीची घटना समोर आलेली नसल्याने हा प्रकार खोडसाळपणातून घडतोय का? अशाही शंका उत्पन्न झाल्या आहेत.


हल्ली विवाह सोहळे अथवा अन्य कोणत्याही कार्यक्रमात ड्रोनद्वारा छायाचित्रणाचा प्रकार सर्रास झाला आहे. त्यातच पूर्वी बोटावर मोजता येतील इतक्या संख्येने असलेल्या छायाचित्रकारांची संख्याही आज अनेक पटींनी वाढल्याने गावागावात दोन-चार छायाचित्रकार तयार झाले आहेत. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धा निर्माण होवून प्रत्येकजण स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातूनच तालुक्यात ड्रोन वापरणार्‍या छायाचित्रकारांची संख्याही वाढली असून गावागावात ड्रोन असलेली एकतरी व्यक्ति हमखास आढळते. त्यांच्याकडून असले प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात असली तरीही विनाकारण ड्रोन उडवून त्यांना काय साधायचे आहे हा प्रश्‍न मात्र शिल्लक राहतो.


शहरालगतच्या परिसरात जेथून ड्रोन पाहिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत, त्या ठिकाणांचा भौगोलिक विचार केल्यास तेथून फारकमी अंतरावर पुणे-नाशिक महामार्ग असल्याचे दिसून येते. त्यामुळे चोरटे चोरीसाठी एखादे सधन घर शोधून तेथून पळून जाण्यासाठी तर त्याचा वापर करीत नसतील?, किंवा चोरीचा प्रकार सुरु असताना संबंधित ठिकाणी पोलीस अथवा अन्य नगारिक मदतीसाठी धावल्यास त्याची पूर्व कल्पना यावी म्हणून तर हा प्रकार सुरु नसेल अशीही भीती निर्माण झाली आहे. एकंदर काही दिवसांपूर्वी पुणे, नाशिकसारख्या काही शहरांमधील संवेदनशील ठिकाणांसह रहिवाशी क्षेत्रात फिरणारे ड्रोन आता संगमनेर शहरालगतही पोहोचल्याने संगमनेरकर दहशतीखाली आले असून पोलिसांनी वेळीच या गंभीर विषयात लक्ष घालून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.


संगमनेर तालुक्यात छायाचित्रकारांची भक्कम संघटना आहे. या संघटनेत तालुक्यातील बहुतेक व्यावसायिक छायाचित्रकारांचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांना विश्‍वासात घेवून त्यांची बैठक घेतल्यास त्यातून रात्रीच्या ड्रोनवर प्रकाश पडू शकतो. याशिवाय कोणा असामाजिक तत्त्वांकडून अथवा चोरट्यांकडून असे प्रकार घडत असल्यास त्याचाही शोध घेण्यास पोलिसांना मोठी मदत होवू शकते. त्यामुळे पोलिसांनी कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वीच रात्रीच्या ड्रोनला गांभीर्याने घेवून त्याच्या मूळाशी जाण्याची गरज आता व्यक्त होवू लागली आहे.

Visits: 40 Today: 1 Total: 113447

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *