शनिशिंगणापूर-राहुरी रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला ठेकेदाराकडून अर्धवट काम तर अतिक्रमणांनी व्यापला रस्ता


नायक वृत्तसेवा, नेवासा
दररोज सुमारे सात हजार विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी शनिशिंगणापूर-राहुरी रस्त्यावरुन प्रवास करतात. मात्र, हा रस्ता रुंदीकरणात मोठा झाला असला, तरी यामुळे मोठ्या अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

एकशे अकरा कोटी रुपये खर्चाचा शनिशिंगणापूर ते राहुरी हा रस्ता तीन वर्षांनंतरही संबंधित ठेकेदाराने सुस्थितीत केलेला नाही. बाजूचे अंतर्गत रस्ते, भराव व दोन्ही बाजूंच्या नाल्याचे काम अर्धवट आहे. रस्त्याच्या बाजूला केलेल्या साईडपट्ट्यावर पत्र्याचे शेड, हातगाड्या, दुकानाच्या टेबल, खुर्च्या मांडण्यात येत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. रस्त्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने अतिक्रमणाने जोर धरला आहे.

सोनई ते यशवंतनगर रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा, कन्या विद्यालय, शनैश्वर विद्यालय, दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळा तर सहा महाविद्यालये आहेत. शिंगणापूर रस्त्यावर एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. सात हजारांहून अधिक विद्यार्थी रोज पायी, सायकल, दुचाकी किंवा बसने येतात. हा रस्ता पूर्वीपेक्षा रुंद झाला असला, तरी अपघातात पहिल्यापेक्षा अधिक वाढ झाली आहे. शिर्डी-शिंगणापूर बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे रोज चारशेहून अधिक वाहने ये-जा करत आहेत. अधिक खेपा होण्यासाठी हे वाहने अधिक गतीने धावतात. वाहनांचा पाठलाग करून पूजा साहित्य विक्री करणारे दुचाकीवरील लटकूंमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. वर्षभरात पन्नासहून अधिक जखमी झालेले आहेत.


विद्यार्थ्यांना ये-जा करण्याबाबत नियमित सूचना दिली जाते. पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येईल.
– डॉ. अशोक तुवर (प्रशासन अधिकारी, मुळा शिक्षण संस्था)

शिंगणापूर ते राहुरी रस्त्याच्या बाजूला अधिक विद्यालय असताना दिशादर्शक फलक, आवश्यक तेथे गतिरोधक नाहीत.
– महावीर चोपडा, पालक

Visits: 159 Today: 1 Total: 1579974

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *