संगमनेर विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे? पदाधिकार्‍यांची शहरात ‘गुप्त’ बैठक; ‘चौघां’ची नावे बंद लिफाप्यातून मुंबईला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील सत्ता टिकवणं आणि मिळवणं यासाठी दोन गटांत सुरु असलेल्या शाब्दीक संघर्षाचा परिणाम प्रकट करणार्‍या राज्य विधानसभा निवडणुकीच्या तारखा टप्प्यात आहेत. आज पितृपक्षाचा शेवटचा दिवस असल्याने नवरात्रौत्सवासह राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग येणार आहे. सध्या असलेल्या जागांना वगळून उर्वरीत जागा लढवण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी परस्परांचे एकमत झाल्याचे दावेही केले गेले आहेत. अशा स्थितीत शिवसेनेच्या ताब्यात असलेला संगमनेर विधानसभा मतदार संघ तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या पक्षनिरीक्षकांनी मंगळवारी निमंत्रित पदाधिकार्‍यांसह घेतलेल्या ‘गुप्त’ बैठकीत मतदार संघातील चार इच्छुकांची नावे सिलबंद लिफाप्यातून मुंबईला रवाना केली आहेत, त्यातीलच एका नावाची घोषणा केली जाणार आहे.


विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांचा राजकीय प्रवास विचारात घेतल्यास 1985 साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी काँग्रेसने त्यांना तिकिटं नाकारुन शंकुतला थोरात यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी अपक्ष असलेल्या थोरात यांनी त्यांचा 10 हजार 159 मतांनी पराभव करुन सभागृहात पाऊल ठेवले. त्यानंतर राज्यात शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती होवून 1990 साली भाजपकडून वसंतराव गुंजाळ निवडणुकीच्या रिंगणात उतरले. अतिशय अतितटीच्या ‘त्या’ निवडणुकीत गुंजाळ यांनी थोरातांना कडवी झूंज दिली. त्यावेळी त्यांचा अवघ्या 4 हजार 862 मतांनी पराभव झाला. त्यानंतर 1995 पासून हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला.


तेव्हापासून आजवर झालेल्या पाच निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून डॉ.अरुण इथापे, अ‍ॅड.बापूसाहेब गुळवे, संभाजीराव थोरात, बाबासाहेब कुटे व जनार्दन आहेर यांच्यासह राष्ट्रवादीकडून दिलीप शिंदे व आबासाहेब थोरात यांनीही नशिब आजमावून पाहिले. पण कोणालाही यश मिळाले नाही. विशेष म्हणजे 1999 नंतरच्या निवडणुकांपासून बाळासाहेब थोरात यांच्या मताधिक्क्यात वाढ होत गेली. भाजपने ज्यावेळी या मतदार संघातील निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांच्या उमेदवाराला 45.5 टक्के मतं मिळाली होती. त्यानंतर 1995 सालच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अ‍ॅड.बापूसाहेब गुळवे यांना मिळालेल्या 40.8 टक्के मतांचा अपवाद वगळता त्यानंतरच्या एकाही निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला टक्केवारीची तिशी ओलांडता आली नाही.


आता या मतदार संघावर पुन्हा एकदा भाजपकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्त्यांचा कल जाणून सर्वानुमते ठराविक नावे बंद लिफाप्यातून देण्याचे आदेश पदाधिकार्‍यांना दिले होते. त्यासाठी प्रत्येक मतदार संघासाठी स्वतंत्र पक्षनिरीक्षकाचीही नियुक्ति करण्यात आली होती. पक्ष निरीक्षकांनी मतदार संघात जावून स्थानिक, जिल्हा आणि राज्य पदाधिकार्‍यांचा समावेश असलेल्या समितीसह कार्यकर्त्यांशी चर्चा करुन नवरात्रौत्सवापूर्वी इच्छुकांची नावे बंद लिफाप्यातून निवडणूक समितीकडे देण्याचे निर्देश दिले होते.


त्या अनुषंगाने मंगळवारी (ता.1) भाजपच्या संगमनेर विधानसभेचे पक्षनिरीक्षक, माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी संगमनेर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांसह शहर, जिल्हा व राज्यातील निमंत्रित पदाधिकार्‍यांसोबत ‘गुप्त’ बैठक घेतली. या बैठकीत भाजपकडून करण्यात आलेल्या मतदार संघाच्या अंतर्गत सर्वेक्षणाची माहिती देत प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेला ‘कानमंत्र’ही देण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या 85 प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी सर्वानुमते संगमनेर विधानसभा मतदार संघासाठी चार उमेदवारांच्या नावावर एकमत केले. या चौघांचीही नावे बंद लिफाप्यातून कालच मुंबईला रवाना करण्यात आली आहेत.


अतिशय गोपनीय पध्दतीने पार पडलेल्या या बैठकीतील गुजगोष्टी समोर आल्या नाहीत. मात्र बैठकीत चर्चा झालेली ‘ती’ चार नावे मात्र खात्रीशिरपणे समजली आहेत. त्यात प्राधान्यक्रमाने यापूर्वीच संगमनेर विधानसभा लढवण्याची मनशा व्यक्त करणारे माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, भाजपचे संगमनेर विधानसभा प्रमुख अमोल खताळ, माजी नगरसेवक अ‍ॅड.श्रीराम गणपुले आणि निवृत्त अभियंता हरिश चकोर यांच्या नावांचा समावेश आहे. या चौघातील एका नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांच्या मदतीने हाती लागली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गेल्या सात निवडणुकांमध्ये अपवाद वगळता चढत्याक्रमाने विजय मिळवणार्‍या काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपचा उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.


अतिशय गोपनीय पद्धतीने झालेल्या भाजपच्या या बैठकीत पक्षनिरीक्षक, नाशिकचे माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी प्रत्येकाची मतं जाणून घेतली. यावेळी डॉ.सुजय विखे-पाटील वगळता उर्वरीत तिनही इच्छुक बैठकीला हजर होते. मात्र ज्यावेळी उमेदवाराच्या नावाचा विषय आला, त्यावेळी उपस्थित सर्वांनीच एकमुखाने डॉ.सुजय यांच्या नावावर जोर दिला. पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यास पर्याय म्हणून प्राधान्यक्रमाने अमोल खताळ, अ‍ॅड.श्रीराम गणपुले आणि हरिश चकोर यांची नावे देण्यात आल्याची माहितीही दैनिक नायकच्या हाती लागली आहे.

Visits: 60 Today: 4 Total: 98516

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *