निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण होवूनही चाचणी रखडली जलसंपदा विभागाने तातडीने चाचणी घेण्याची होतेय शेतकर्यांतून मागणी
नायक वृत्तसेवा, राहाता
उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती व कायमच दुष्काळी टापूतील 182 गावांतील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरण बांधून झाले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून धरणाच्या मुख्य कालव्यांची चाचणी होणार असल्याची तारीख पे तारीख जाहीर होत आहे. प्रत्यक्षात निळवंडेच्या मुख्य डाव्या कालव्याचे काम मार्च अखेर पूर्ण झालेले आहे. धरण भरलेले असून आणि धरणात पाणी असतानाही कालव्यांची चाचणी रखडली आहे. उन्हाळ्यात चाचणी झाल्यास पावसाळ्यात ओव्हरफ्लोच्या पाण्याचा या जिरायत भागाला फायदा होणार आहे. जलसंपदा विभागाने तातडीने काम पूर्ण झालेल्या मुख्य डाव्या कालव्याची चाचणी घ्यावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
महाविकास आघाडी सरकारने 2019-22 या काळात प्रकल्पासाठी जवळपास 1100 कोटींचा निधी दिला. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यानी निळवंडे प्रकल्पासंदर्भात कालव्यांची उर्वरीत कामे वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर 2022 मध्ये मुख्य कालव्यांची चाचणी घेणार असल्याची ग्वाही विधानसभेत दिली होती. दरम्यानच्या काळात हे सरकार पडले. नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे फडणीस सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करीत पावणे तीनशे कोटींचा निधी मंजूर केला. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत डिसेंबर 2022 मध्ये मुख्य कालव्यांची चाचणी घेण्याचे निर्देश दिले. मात्र काम पूर्ण न झाल्याने ही चाचणी होऊ शकली नाही.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये मार्चमध्ये मुख्य कालव्यांची चाचणी घेण्याची घोषणा केली. मार्चमध्ये चाचणी होणार या उद्दिष्टामुळे पाटबंधारे विभागाने या कालावधीत डाव्या कालव्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र मार्चमध्येही चाचणी होऊ शकली नाही. काम पूर्ण होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, उन्हाळ्यात काम पूर्ण झालेल्या डाव्या मुख्य कालव्याची चाचणी झाल्यास पुढील महिन्यापासून सुरू होणार्या पावसाळ्यात या कालव्यांतून ओव्हरफ्लोचे पाणी सोडणे शक्य होणार आहे. असे झाल्यास लाभक्षेत्रातील बर्याच गावांतील ओढे नाले, पाझर तलाव यामध्ये हे पाणी देता येणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणार्या जिरायती भागातील शेतकर्यांना खरीप रब्बी हंगामात मोठा फायदा होणार आहे. या कालव्यावर अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यातील जवळपास 44 हजार हेक्टर क्षेत्र येते. मुख्य कालवा व त्याचे तळेगाव फाटा, कोपरगाव फाटा व जांभुळवाडी फाटा प्रवाहीत झाल्यास या कालव्याच्या कडेला असलेल्या बहुतांश गावांना याचा थेट लाभ होणार आहे.