पालिकेच्या निःपक्षपाती निवडणुकांसाठी पुन्हा प्रभाग रचना करा! निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन; माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य निवडणूक आयोगाने 22 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचना करण्यात आली. संगमनेरातही त्यानुसार एकूण 15 प्रभागांची निर्मिती झाली. मात्र शहरातील लोकसंख्या विभागतांना एकाच राजकीय पक्षाला कसा फायदा होईल याचाच विचार प्रशासनाने केला. प्रभागरचनेसाठी आयोगाने दिलेल्या निर्देशांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आगामी निवडणुकांची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच संगमनेरात पक्षपातीपणा समोर आला असून निवडणूक आयोगाने याची दखल घेवून संगमनेरात नव्याने प्रभाग रचनेचा कार्यक्रम राबवावा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे शहर सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी पत्राद्वारे केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 22 फेब्रुवारी रोजी आयोगाने बजावलेल्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे. त्यावर कारवाई करतांना संगमनेरच्या स्थानिक प्रशासनाने वाढीव प्रभागासह संगमनेरात 15 प्रभागांची नव्याने रचना केल्याचे म्हंटले आहे. प्रभागांची रचना करतांना आयोगाकडून त्यासंबंधी देण्यात आलेल्या विविध निर्देशांबाबत मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक कानाडोळा केला.

गेल्या तीन दशकांपासून पालिकेत एका गटाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे प्रभागरचना करताना स्थानिक प्रशासन दबावाखाली काम करीत होते असा आरोपही जहागिरदार यांनी केला आहे. त्यातून आयोगाच्या सूचनांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली करण्यात आली असून शहरातील प्रभागांची लोकसंख्यानिहाय नव्हेतर राजकीय हेतूनिहाय रचना करण्यात आल्याचेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हंटले आहे. यासाठी त्यांनी प्रभागनिहाय एकूण लोकसंख्या व त्या प्रभागातील मतदार संख्याही सोबत जोडली असून त्यातील तफावतीकडे आयोगाचे लख्य वेध्णयाचा प्रयत्न केला आहे. शहरातील काही प्रभाग किमान व कमाल लोकसंख्येचे निकष तोडून निर्माण करण्यात आले आहे. ज्याठिकाणी सत्ताधारी गटाचे प्राबल्य आहे अशा ठिकाणचे प्रभाग कमी मतदार संख्येचे, तर अडचणीचे ठरु शकणारे विभाग मोठ्या प्रभागांमध्ये समविष्ट करण्यात आले आहेत. यावरुन प्रशासनाने आपले कर्तव्य स्वच्छ हेतूने बजावले नसल्याचे स्पष्ट होत असल्याने यापूर्वी संगमनेर नगरपरिषद हद्दीत केलेली प्रभागरचना रद्द करण्यात येवून नव्याने निकषांनुसार रचना केली जावी अशी आग्रही मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

या पत्रासोबत त्यांनी प्रभागनिहाय एकूण लोकसंख्या व प्रभागनिहाय एकूण मतदारांची संख्या असलेली यादीही जोडली आहे. त्यात शहरातील एकूण 15 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक चारची लोकसंख्या 4 हजार 299 तर मतदारांची संख्या 4 हजार 106, प्रंभाग क्रमांक 11 मध्ये एकूण लोकसंख्या 4 हजार 568, तर मतदाराची संख्या 4 हजार 402, प्रभाग क्रमांक 12 मध्ये एकूण लोकसंख्या 4 हजार 549, तर मतदारांची संख्या 4 हजार 849, प्रभाग क्रमांक 13 मध्ये एकूण लोकसंख्या 4 हजार 904 व मतदारांची संख्या 3 हजार 874 तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये एकूण लोकसंख्या 4 हजार 901 व मतदारांची संख्या 4 हजार 72 असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय 2011 सालच्या जनगणनेनुसार शहराची एकूण लोकसंख्या 65 हजार 804 गृहीत धरण्यात आली आहे, विशेष म्हणजे त्यातील 53 हजार 643 मतदारांची नावे असलेल्या याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्याने हा सगळाच सावळागोंधळ असल्याचा आरोपही जहागिरदार यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या तक्रार अर्जात केला आहे. आयोग त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

