संगमनेर शहरातील गोहत्या थांबवा! मुस्लिम समाजाची मागणी; मोर्चा काढून दिले निवेदन..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गोवंश कत्तलखान्यांचे आगार म्हणून राज्यात बदनामी झालेल्या या बेकायदा उद्योगाचे पडसाद आता तीव्रतेने उमटायला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून लखमीपूरा, जोर्वेनाका व राजवाडा परिसरात त्यावरुन सुरु असलेली धुसफूस बुधवारी दोन गटातील हाणामार्यांमध्ये परावर्तीत झाल्यानंतर आता मुस्लिम समाजातील एका मोठ्या गटाने कत्तलखान्यांविरोधात निर्णायक भूमिका घेतली आहे. संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखाने कायमस्वरुपी बंद करावेत व शहरातील गोहत्या पूर्णतः थांबवावी या मागणीसाठी मुस्लिम धर्मियांच्या एका गटाने आज तीनबत्ती चौकातून मोर्चा काढला. सदरचा मोर्चा शहर पोलीस ठाण्यात धडकल्यानंतर मोर्चेकर्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले असून त्यातून गेल्या दोन दिवसांतील घटनाक्रम आणि कत्तलखान्यांचा त्रास प्रशासनासमोर मांडला आहे. यामुळे शहरात आजही हा व्यवसाय मोठ्या ऐटीत सुरु असल्याच्या वृत्तालाही सत्याचे कोंदण मिळाले आहे.
शहराच्या सामाजिक स्वास्थालाच सुरुंग लावणार्या गोवंश कत्तलखान्यांच्या विरोधात आज दुपारी मुस्लिम धर्मियांनी तीनबत्ती चौकातून मोर्चा काढला होता. या मोर्चात लहान मुलांपासून महिला आणि तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकांचा सहभाग बघायला मिळाला. गवंडीपूरा, नवघर गल्ली, मोमीनपूरा मार्गे पोलीस ठाण्यात हा मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चेकर्यांनी तेथेच ठिय्या देत कत्तलखान्यांविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मोर्चेकर्यांचे नेतृत्त्व करणार्यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना आपल्या तक्रारीचे निवेदनही सोपवले.
त्यानुसार शहरातील भारतनगर, मौलाना आझाद मंगल कार्यालयाचा परिसर, जमजम कॉलनी, मदिनानगर या भागात खाटीक समाजातील माणसं सर्रासपणे गुंडगिरी करुन रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात गाई, वासरं व गोवंशाची कत्तल करीत असल्याचे म्हंटले आहे. राज्यात गोवंश हत्येला प्रतिबंध असतानाही संगमनेरातील काही कसाई पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन मोठ्या प्रमाणात हा धंदा करीत असून कापलेल्या गोवंश मांसाचा पुरवठा मुंबई, हैद्राबाद, गुलबर्गा सारख्या शहरांमध्ये केला जात आहे. त्यातून निघणारे टाकवू अवयव व रक्त नाटकी नाल्यात फेकले जात असल्याने या परिसरातील रहिवाशांचे जगणे अवघड झाल्याचा उल्लेखही या निवेदनात करण्यात आला आहे.
याबाबत वेळोवेळी स्थानिक नगर पालिका व पोलिसांना माहिती देवूनही येथील कसायांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नसून उलट त्यांच्याकडून होणार्या दादागिरीत मोठी वाढ झाली आहे. या बेकायदा धंद्यामुळे केवळ हिंदू धर्मियच नव्हेतर मुस्लिम समाजालाही खूप त्रास होत असून याबाबत खाटीक समाजाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या मुस्लिम समाजातील नागरिकांनाच त्यांच्या घरात घुसून गुंडशाहीने मारहाण करण्यात आली. याबाबत मुस्लिम समाजाने वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारीही केल्या तर, हिंदू समाजाने 40 ते 50 दिवस प्रांताधिकार्यांच्या कार्यालयासमोर उपोषण केल्याचा दाखलाही देण्यात आला आहे. मात्र तरीही येथील कसायांवर कोणताही परिणाम झालेला नसून आजही संगमनेरातील अवैध कत्तलखाने राजरोसपणे सुरु असल्याचेही निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
बुधवारी (ता.18) रात्री दहाच्या सुमारास शहरातील कत्तलखाने चालविणार्यांचा ‘सरदार’ असलेल्या नवाज जावेद कुरेशी, कैसर जावेद कुरेशी, नदीम खालीद कुरेशी, मुशरफ नासिर कुरेशी, तौसिफ बब्बू कुरेशी, अर्शद जावेद कुरेशी व इतर 15 ते 20 जणांनी लखमीपूर्यात येवून कत्तलखान्यांबाबत कोणीही चकार बोलायचे नाही अशी दमबाजी करीत नाहीतर तुमचे हातपाय तोडून टाकू, तुमच्या बायकांना नवरे राहणार नाहीत अशी धमकी देत महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा शिवराळ भाषेत शिवीगाळ केली. यावेळी या जमावाने तरुण व वयस्करांना तलवार, लाडकी दांडे, लोखंडी रॉडने मारहाण केली.
याबाबत परिसरातील शाहनवाज शकूर शेख व राहील खान हे दोघे फिर्याद देण्यासाठी जात असताना त्यांनाही जमावाने तलवारीसारख्या घातक हत्याराने मारहाण केली. यावेळी या जमावाने ‘पोलीस हमारा कुछ नहीं करेगी, पोलीस प्रशासन को हम खिशे भरकें पैसा देते है, नगरसे संगमनेर तक हम सबको पैसा देते है. आजतक हिंदुत्त्ववादी लोगोंने हमारे खिलाफ तक्रार दिये, पर हमारा कुछ वाकडा नहीं होता. हमको यह गुन्हे किरकोळ लफडा लगता है, एैसे कित्येभी गुन्हे दाखल होने दो, हमको ** फरक नहीं पडता. जो उखाडना है वो उखाडों’ अशा भाषेत नवाज कुरेशी, कैसर कुरेशी व नदीम कुरेशी यांनी दम दिल्याचेही या निवेदनातून सांगण्यात आले आहे.
बुधवारी रात्री या लोकांनी दादागिरी करीत मारहाण करुनही त्यांनी महिलांना पुढे करुन पोलिसांच्या मदतीने आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला असून येथील कत्तलखान्यांमुळे दोन समाजात वारंवार तणाव निर्माण होत असल्याचा दाखलाही देण्यात आला आहे. यापुढेही येथील कत्तलखाने सुरु राहिल्यास मुस्लिम समाज मोठ्या संख्येने जमा होवून त्या विरोधात मोठा मोर्चा काढील असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रकाराने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या शनिवारी बजरंग दलाचे कार्यकर्ते कुलदीप ठाकूर यांनी टोलनाक्यावर पकडलेल्या संशयीत वाहन प्रकरणात तालुका पोलिसांची भूमिका ठळकपणे कसायांच्या बाजूने असल्याचे समोर आले होते. त्यानंतर बुधवारी लखमीपूरा आणि खाटीकगल्ली परिसरात कत्तलखान्यांवरुनच दोन गटात धुमश्चक्री उडाली. त्याबाबतचा गुन्हा दाखल करताना ज्यांनी हल्ला केला त्यांनाच प्राधान्य दिले गेल्याने आता संगमनेर शहर पोलिसही पुन्हा एकदा संशयाच्या वलयात अडकू लागले आहेत.