वसुंधरेचे जतन आणि संवर्धन करणे काळाची गरज ः डॉ. राठी संगमनेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आरोग्य व सौख्य जर घरोघरी नांदायचे असेल तर, वसुंधरेचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. अनिल राठी यांनी केले.
संगमनेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व ओंकारनाथ विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चंदनापुरी (आनंदवाडी) येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य जसपाल डंग होते. तसेच पाणी फौंडेशनचे तालुकाप्रमुख राजेंद्र जाधव, चंदनापुरीचे (आनंदवाडी) सरंपच शंकर रहाणे, उपसरपंच भाऊराव रहाणे, संगमनेर शेतकी संघाचे माजी संचालक कैलास सरोदे, आनंदवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पोपट सोनवणे, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल देशमुख, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम, डॉ. वसंत खरात व डॉ. रोशन भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. राठी म्हणाले, अनुभव हा माणसाचा गुरु आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अनुभव आपल्याला मार्गदर्शन करत असतो. ही अनुभवाची शिदोरी देण्याचं काम संगमनेर महाविद्यालय करत आहे. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतील अलौकिक कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जसपाल डंग म्हणाले, श्रमदानाविषयी समाजाध्ये जागृती होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने श्रमाची पूजा केली पाहिजे. श्रमप्रतिष्ठा हे मूल्य प्रत्येकाने आपल्या अंगी बाणले पाहिजे. तसेच हे मूल्य खर्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे राष्ट्रहिताचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी रासेयो स्वयंसेवक अशोक थिटमे याची राजपथ दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अभिरुप युवा संसद स्पर्धेत महाविद्यालयाला तृतीय पारितोषिक मिळवून दिल्याबद्दल आकांक्षा सातपुते, कामक्षा मुंढे व संघातील इतर स्पर्धकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मंगेश जोर्वेकर यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. रोशन भगत यांनी मानले. या कार्यक्रमास 390 स्वयंसेवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सदस्य व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.