तिघांच्या टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण अकोले नाक्यावरील घटना; नेहमीचाच प्रकार असल्याची चर्चा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोले नाक्यावरुन प्रवरानदीकडे जाणार्या रिंगरोडवर नेहमीच दादागिरी करणार्या आणि यापूर्वी वाटसरुंना लुटण्याचेही काही प्रकार करणार्या तिघांच्या टोळक्याने किरकोळ वादातून एकाला बेदम मारहाण केली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जाजू पेट्रोलपंपाजवळ घडलेल्या या घटनेत संगमनेर खुर्द शिवारातील 27 वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याच्या फिर्यादीवरुन पोलीस दप्तरी वारंवार नोंद होणार्या तिघांवर घातक शस्त्राचा वापर करुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने अकोले नाक्यावरील गुंडांची दहशत पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार रविवारी (ता.9) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. या घटनेत किरकोळ कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसान संगमनेर खुर्द शिवारातील वैदुवाडीत राहणार्या राजेंद्र शंकर गायकवाड (वय 27) या तरुणाला तिघांनी मिळून बेदम मारहाण करण्यात झाले. यावेळी सराईत गुन्हेगार म्हणून पोलीस दप्तरी नोंद असलेल्या साई सूर्यवंशी (रा.भीलहाटी) याने आपल्याकडील बिअरची बाटली गायकवाड याच्या डोक्यात फोडल्याने त्याला दुखापत होवून तो खाली पडला.

यानंतर निखिल (पूर्ण नाव माहिती नाही.) व अमोल भाऊराव माळी (रा.कासारा दुमाला) या दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर रात्री दीड वाजता जखमी गायकवाड याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी वरील तिघांविरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुनहा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी यांच्याकडे सोपविला आहे.

वरील गुंडांच्या टोळक्याकडून वारंवार हाणामार्या, दादागिरी व गुन्हेगारी कारवाया सुरु असतात. यापूर्वी जाजू पेट्रोल पंपापासून स्वामी समर्थ मंदिराकडे जाणार्या लिंकरोडवर वाटसरुंना लुटण्याचेही काही प्रकार घडले होते. त्यात याच टोळक्याचा सहभाग असल्याची चर्चाही त्यावेळी समोर आली होती. त्याशिवाय या टोळक्याकडून अकोले नाका परिसरात सतत दादागिरी आणि हाणामार्या होत असल्याने पोलिसांनी त्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणीही आता होवू लागली आहे.

