‘स्मरणयात्रा’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयातील पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांच्या ‘स्मरणयात्रा’ पुस्तकाचे सोमवारी (ता.12) सकाळी 11 वाजता महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहात प्रकाशन होणार असल्याची माहिती पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष खेडलेकर व अभ्यासक्रम समन्वयक प्रा. सुशांत सातपुते यांनी दिली आहे.

या प्रकाशन सोहळ्यास नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अरुण गायकवाड हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. संगमनेर महाविद्यालयात मागील नऊ वर्षांपासून पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे लेखन कौशल्य शिकवले जाते. लेखन कौशल्य या विषयाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांचे नातेवाईक, मित्र किंवा इतर दिवंगत स्नेहींच्या आठवणी, त्यांचा आपसातील स्नेहबंध अशी मध्यवर्ती कल्पना घेऊन मृत्यूलेख लिहिले. यात आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण, मित्र, सासू-सासरे अशी विविध नात्यांवर आधारित 30 विद्यार्थ्यांनी लेख लिहिले. या सर्व लेखांचे पुस्तक प्रकाशित करण्याची कल्पना पुढे आली. पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असलेल्या प्रा. डॉ. अनुश्री खैरे, नितीन सूर्यवंशी व अर्चना साळुंके यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. पुस्तक सर्वदूर पोहोचावे व अधिकाधिक वाचकांना वाचता यावे म्हणून याच कार्यक्रमात पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे देखील प्रकाशन होणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली.

Visits: 331 Today: 1 Total: 2168829

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *