रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा शिवसेना आमदार गायकवाडांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अनुसूचित जाती-जमाती अन्याय-अत्याचार प्रतिबंधक कायद्याविरोधात (अ‍ॅट्रॉसिटी) बेताल वक्तव्य केल्याने त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, राहुरी तालुक्यातील खडांबे येथील अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब लटके यास तत्काळ अटक करावी, राहाता तालुक्यातील रांजणगाव येथील दलित युवक रवींद्र लोंढे याच्यावर काही गुंडांनी केलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीस तत्काळ अटक करावी, आदी मागण्यांसाठी सोमवारी (ता.5) राहुरी तहसीलवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने (आठवले) उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

खामगाव तालुक्यातील दलित अत्याचार प्रकरणी चितोडा गावातील रमेश हिरवाळे या दलित तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. ही घटना अत्यंत गंभीर असून देखील तेथील शिवसेनेचे आमदार गायकवाड यांनी या गावात जाऊन चिथावणीखोर वक्तव्य करत दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला. आमदारांवर कारवाई करा, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर देखील भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

यावेळी मागण्यांचे निवेदन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, बाळासाहेब जाधव, विजय वाकचौरे, श्रावण वाघमारे, सीमा बोरूडे, स्नेहल सगळगिळे, रमेश गायकवाड, गोविंद दिवे, सचिन साळवे, दत्तात्रय भोसले आदिंसह भीमसैनिक उपस्थित होते.


आमदार गायकवाड यांच्या विरोधात कडक कारवाई करावी. अन्यथा रिपाई आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन हाती घेईल. जोपर्यंत गायकवाड यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत रिपाइं कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत.
– विलास साळवे (तालुकाध्यक्ष, रिपाइं)

राहुरी तालुक्यातील खडांबे येथील आरोपींना देखील तत्काळ अटक करावी, अशी मागणी आरपीआयच्यावतीने या मोर्चात करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या आंदोलनाला त्यांनी देखील पाठिंबा देऊन याठिकाणी येणे गरजेचे होते. मात्र, खर्‍याला खरं म्हणा.
– सुरेंद्र थोरात (जिल्हाध्यक्ष, रिपाइं)

Visits: 131 Today: 1 Total: 1416166

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *