मानाच्या गणपती मंडळाची पुन्हा मनमानी! निम्म्या मंडळांची नाराजी; अवघ्या शंभर कर्मचार्यांचा बंदोबस्त..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेली दहा दिवस आनंद आणि उत्साहाला शिगेवर पोहोचवणार्या गणेशोत्सवाची आज (ता.18) पहाटे अडीच वाजता भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता मानाच्या सोमेश्वर-रंगारगल्ली मंडळाच्या मिरवणुकीने मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा मुख्य मिरवणुकीत मानाच्या नऊ मंडळांसह एकूण सोळा मंडळांनी सहभाग घेतला होता. मात्र दरवर्षीप्रमाणे मानाच्या मंडळाने आपली मनमानी कायम ठेवल्याने अपेक्षेप्रमाणे निम्म्याहून अधिक गणेश मंडळांना आपल्या लाडक्या बाप्पांना मूकपणे निरोप द्यावा लागला, त्यामुळे त्यांची नाराजी ठळकपणे दिसून आली. यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी शहर पोलिसांना कोणताही अतिरीक्त बंदोबस्त प्राप्त झाला नाही, मात्र तरीही अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा 129 वर्षांचा प्रगल्भ इतिहास असलेल्या सोमेश्वर-रंगारगल्ली मंडळाच्या मानाच्या पहिल्या गणरायाची मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, एकविरा फौंडेशनच्या संस्थापक जयश्री थोरात, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, तहसीलदार धिरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आदींसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती झाल्यानंतर संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
सनई-चौघडा, आदिवासी नृत्य, ढोल-ताशांचा गजर शिव-पार्वतीसह अन्य देखाव्यांचा समावेश आणि शेकडों कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पालखीत विराजमान झालेले बाप्पा अशा शाही थाटात निघालेली ही मिरवणूक यंदा सायंकाळी सहा वाजता नगरपालिकेजवळ पोहोचणे अपेक्षित होते. मात्र गेल्या दोन दशकांच्या अनुभवाप्रमाणे यावर्षीही ही मिरवणूक रेंगाळली. त्यामुळे त्यांना पालिकेपर्यंत येण्यासाठी रात्रीचे तब्बल आठ वाजले होते. त्यानंतरही तासभर ही मिरवणूक पालिकेजवळच रेंगाळल्याने त्या पाठीमागे एकामागून एक गणेश मंडळांची अक्षरशः दाटी झाली होती. मानाचा सातव्या क्रमांकाचा माळीवाडा मंडळाचा गणपती साईनाथ चौकात आला त्याचवेळी रात्रीचे बारा वाजल्याने पोलिसांनी सर्व मंडळांना आपापली वाद्ये बंद करण्यास भाग पाडले.
त्यामुळे माळीवाडा मंडळाच्या पाठोपाठ असलेल्या भगतसिंग व स्वामी विवेकानंद या मानाच्या दोन गणेश मंडळांसह एकूण नऊ गणेश मंडळांना टाळ्यांच्या गजरात आपल्या बाप्पांना निरोप द्यावा लागला. त्यामुळे त्यांनीही मानाच्या गणपती मंडळाच्या मनमानीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर्षीच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत सोमेश्वर-रंगारगल्ली मंडळासह चौंडेश्वरी, साळीवाडा, राजस्थान, चंद्रशेखर चौक, नेहरु चौक, माळीवाडा, भगतसिंग मंडळ व स्वामी विवेकानंद मंडळ या मानाच्या नऊ गणेश मंडळांसह बाजारपेठ व्यापारी मंडळ, भारत चौक, देवीगल्ली, महाराणा प्रताप, नवचैतन्य, शिवाजीनगर आणि तानाजी मित्र मंडळाच्या गणरायांचा सहभाग होता.
सकाळी साडेआठ वाजता सुरु झालेली संगमनेरची विसर्जन मिरवणूक आज (ता.18) पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरु होती. मित्रप्रेम तरुण मंडळ, श्री सत्कार समिती, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शाखा क्रमांक 11, ओंकार ग्रुप, साईनाथ युवक मंडळ, फ्रेंड्स सर्कल मंडळ, महात्मा फुले प्रतिष्ठान व संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने मिरवणुकीतील सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. या दरम्यान किरकोळ हाणामार्या वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे यापूर्वी उत्सवांच्या निमित्ताने शहराला अतिरीक्त पोलीस बंदोबस्त मिळत होता. यावेळी मात्र विसर्जनाचा संपूर्ण भार स्थानिक पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनाच वाहावा लागला.
यावर्षी विसर्जनासाठी नदीपात्रात पाणी वाहते होते. मात्र प्रवाह खूपच कमी असल्याने त्यात मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत नसल्याने दुपारी चार वाजता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने पाण्याचा प्रवाह वाढवण्यात आला. त्याचा परिणाम मध्यरात्रीनंतर दिसून आला. प्रशासनाने यंदाही नागरीकांना थेट नदीपात्रात जाण्यापासून रोखले होते. त्यासाठी संपूर्ण नदीकाठावर बॅरिकेट्स लावून नदीकडे जाणार्या रस्त्यांवरही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकविरा फौंडेशन आणि बजरंग दलाच्या संयुक्त परिश्रमाने सलग सातव्या वर्षी जवळपास 18 तास चाललेल्या संगमनेरच्या विसर्जन सोहळ्याची निर्विघ्नपणे सांगता झाली.
जातीय दंगलींची पार्श्वभूमी असलेल्या संगमनेरच्या गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुख्यालयाकडून अतिरीक्त बंदोबस्त देण्याची परंपरा होती, यावेळी मात्र ती मोडली गेली. त्यामुळे संगमनेरात मोठ्या प्रमाणात साजर्या होणार्या या उत्सवाची संपूर्ण जबाबदारी पोलीस उपअधिक्षक हरीश खेडकर व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख मार्गदर्शनाखाली सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे दहा अधिकारी, 56 पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या अवघ्या 40 जवानांनी पार पाडली.
सात वर्षांपूर्वी पर्यंत संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीला दुर्घटनेचे गालबोट लागायचे. मात्र 2019 साली प्रशासनाच्या समन्वयातून ‘आदर्श विसर्जना’चा नवा पायंडा घातला गेला. यावेळी मुख्याधिकारी राहुल वाघ वगळता जवळपास सर्वच अधिकारी नवीन त्यात मुख्याधिकारीही बदली आदेशाच्या प्रतिक्षेत असल्याने एकंदर विसर्जनाव दुर्घटनेचे सावट होते. मात्र मुख्याधिकारी वाघ यांनी प्रांताधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, तहसीलदार धिरज मांजरे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख या सर्वांशी उत्कृष्ट समन्वय साधून चोख व्यवस्था ठेवली. त्याचा परिणाम सलग सातव्या वर्षी संगमनेरच्या विसर्जनादरम्यान एकाही अप्रिय घटनेची नोंद झाली नाही. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्याने यंदाचा गणेशोत्सव आनंदासह सुरक्षितपणे पार पडला.