ईद निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीला संगमनेरात गालबोट! दोन गटांत तुफान धुमश्‍चक्री; शहरातील बेकायदा कत्तलखान्यांची पार्श्‍वभूमी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मानल्या गेलेल्या प्रेषित हजरत मोहम्मद साहिब यांच्या जन्मदिनाचा उत्सव म्हणून बुधवारी (ता.18) संगमनेरात निघालेल्या विशाल मिरवणुकीला गालबोट लागले. हजारोंच्या उपस्थितीत निघालेल्या या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम धर्मियांमधील दोन गटांमध्ये हमरीतुमरी झाली होती. मात्र त्यावेळी समाजातील ज्येष्ठांनी मध्यस्थी करुन वाद मिटवल्यानंतर रात्री उशिराने त्याचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेत दोन्ही बाजूने तलवारी, चाकू, लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांचा मुक्त वापर करण्यात आला. राजवाडा परिसरात उडालेल्या या तुफान धुमश्‍चक्रीमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. या घटनेबाबत पोलिसांनाही उशिराने माहिती मिळाल्याने जवळपास तासभर लखमीपूरा, जोर्वेनाका, मोगलपूरा व राजवाड्यासह आसपासच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी एका गटाने सुमारे वीस जणांविरोधात तक्रार दिली असून दुसर्‍या गटाकडूनही तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.


याबाबत जखमी झालेल्या शेहनाज बादशहा कुरेशी (वय 54, रा.राजवाडा) यांनी शहर पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बुधवारी (ता.18) दुपारी निघालेल्या ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात शाब्दीक बाचाबाची झाली होती. मात्र त्यावेळी मिरवणुकीतील ज्येष्ठांनी वेळीच हस्तक्षेप करीत दोन्ही गटांना शांत केले. मात्र त्याचे पडसाद रात्री साडेदहाच्या सुमारास उमटले. दिवसभराच्या उत्सवानंतर सगळे मुस्लिम धर्मिय आपापल्या घरांमध्ये असताना लखमीपूरा परिसरात राहणारा 15 ते 20 जणांचा जमाव हातात तलवारी, चाकू, लोखंडी रॉड. बेस बॉलचे दांडे आणि दगडांसह राजवाडा परिसरात पोहोचला.


यावेळी या सर्वांनी राजवाडा परिसरातील खाटीक गल्लीत राहणार्‍या कसायांच्या घरासमोर येवून ‘कसाबडे तुम किधर हो, बाहर आवो’ अशी मोठमोठ्याने आरडाओरड करीत परिसरात दहशत निर्माण केली व त्यानंतर तुफान दगडफेक केली. त्यात शेहनाज कुरेशी जखमी झाले. त्यांनी याबाबत आज पहाटे दोनच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यावरुन पोलिसांनी दानिश फावडा, परवेज शेख, आदिल शेख, रजा मुख्तार, जमील शेख (सर्व रा.लखमीपूरा) यांच्यासह अज्ञात 10 ते 15 जणांविरोधात बेकायदा जमाव जमवणे, घातक शस्त्रांचा वापर करुन सहेतूने शांततेचा भंग करणे, मारहाण करुन दुखापत करणे, दंगल घडवणे आदी कारणांवरुन भारतीय न्यायसंहितेच्या कलम 118 (1), 115, 125, 189 (1) (2), 191 (2) (3), 190, 352, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणाच्या मुळाचा शोध घेतला असता या संपूर्ण घटनाक्रमामागे संगमनेर शहरात सुरु असलेले बेकायदा गोवंश कत्तलखाने असल्याचे ठळकपणे समोर आले आहे. ईद-ए-मिलादच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मुस्लिम बहुल परिसरात झेंडे, पताका व लाईट माळांची मोठी रेलचेल करण्यात आली होती. मात्र भारतनगर, खाटीकवाडा, मदिनानगर, आझाद मंगल कार्यालयाचा परिसर या भागातील कसायांची गोवंश जनावरे व त्यांचे कापलेले मांस भरलेली वाहने त्याला अडसर ठरु लागल्याने काही मुस्लिमांनी किमान सणांच्या कालावधीत तरी ही वाहतूक बंद रहावी या विचारातून अशा वाहनांना परिसरातून जाण्यास मज्जाव केला होता.


त्याचा परिणाम बुधवारी निघालेल्या मिरवणुकीत दिसून आला. यावेळी दोन्ही गट मिरवणुकीतच हमरीतुमरीवर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र मुस्लिम समाजातील ज्येष्ठांनी वेळीच दोन्ही गटांमध्ये हस्तक्षेप करीत त्यांना वेगळे केले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास पुन्हा एका गटाने राजवाड्या जवळील खाटीक गल्लीत जावून तेथील कसायांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरच हत्यारांसह तुफान दगडफेक करण्यात आली. त्यात राहिल रियाज खान व शहनाज शेख हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी अद्यापही त्यांचा जवाब नोंदवला नसल्याने दुसर्‍या बाजूने त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला असून संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने बंद करण्यासह बुधवारच्या घटनेतील दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संगमनेरचे सामाजिक सौहार्द नष्ट करण्यात येथील बेकायदा उद्योग कारणीभूत असल्याचा इतिहास आहे. त्यावरुनच शहरात जातीय दंगलीही घडल्या आहेत. मात्र पोलिसांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याने आजही शहरात मटका, जुगार, गांजा, दारु, बेकायदा वाळूसह गोवंश कत्तलखानेही जोमात सुरु आहेत. त्यावरुन यापूर्वीही शहरात तणाव निर्माण झाला होता, मात्र त्या उपरांतही पोलिसांचा हाव मिटत नसल्याने आता पुन्हा एकदा शहरातील कत्तलखाने चव्हाट्यावर आले आहेत.

Visits: 1 Today: 1 Total: 28764

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *