यंदाही थेट नदीपात्रात गणरायांचे विसर्जन करण्यास मनाई! ‘अपघातमुक्त पॅटर्न’ कायम; ठरलेल्या ठिकाणीच विसर्जनास परवानगी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एकामागून एक प्रशासकीय अधिकार्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाल्याने संगमनेरातील यंदाच्या उत्सवावर अपघाताचे ढग जमा झाले होते. त्यातच यापूर्वी आलेल्या पोलीस निरीक्षकांनी आपलीच शेखी मिरवण्यात धन्यता मानायला सुरुवात केल्याने एकंदरीत उत्सवाबाबतच चिंता निर्माण झाली होती. मात्र पोलीस अधिक्षकांनी दैनिक नायकच्या वृत्तांची गांभीर्याने दखल घेत धुळ्याहून जिल्ह्यात आलेल्या पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या हाती शहराची सूत्रे देत गणेशोत्सवावर दाटलेले चिंतेचे मळभ हटवले आहेत. देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या पारंपरिक उत्सवाची माहिती घेण्यासह मुख्याधिकार्यांशी समन्वय करुन कृती आराखडा तयार केला असून पारंपरिक पद्धतीने गेल्या सहा वर्षांपासून राबवल्या जात असलेल्या पद्धतीनेच यंदाही विसर्जनाचा ‘अपघातमुक्त पॅटर्न‘ राबवला जाणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवापूर्वीच धरणांच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातील पावसानेही पूर्णतः विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभर ओसंडून वाहणार्या नद्यांची पात्रही आता आकुंचित झाली आहे. सद्यस्थितीत भंडारदरा, निळवंडे, आढळा व भोजापूर ही सर्वच जलाशये तुडूंब भरलेली आहेत. पुढील काही दिवसांत कोंकणच्या काही भागासह मध्य व उत्तर महाराष्ट्रात पाऊस होण्याचा अंदाज आहे. या वातावरणाचा परिणाम या धरणांच्या पाणलोटावर झाल्यास धरणांमधून त्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडावा लागेल. त्यातून एकीकडे नद्यांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता असताना दुसरीकडे तसे काहीही न घडताही संगमनेरच्या विसर्जनादरम्यान अपघात घडण्याची शक्यता कायम होती.
कारण पूर्वी नदीचे पात्र समान असल्याने आवर्तनाच्या कालावधीत होणार्या विसर्जनादरम्यान अपघाताची शक्यता फार दुर्मिळ असायची. मात्र गेल्या दीड दशकांत वाळू चोरांची जमात जन्माला येवून त्यांच्याकडून बेसुमार वाळू उपसा झाल्याने आजच्या स्थितीत नद्यांच्या पात्रांचे अक्षरशः वाळवंट झाले आहे. जागोजागी तस्करांनी पोखरुन केलेले जीवघेणे खड्डे, घाटांच्या आसपासची वाळूही उपसली गेल्याने निर्माण झालेल्या घातक कपारी, पात्रात वाळूच नसल्याने वाहुन येणार्या गाळामुळे निर्माण झालेला धोका अशा कारणांनी सहा वर्षांपूर्वीपर्यंत दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी संगमनेरच्या उत्सवाला वेदनेची किनार लागायची.
त्याला प्रतिबंध करण्यासाठी 2019 साली संगमनेरच्या प्रशासनाने एकमेकांच्या समन्वयातून विसर्जनाचा ‘आदर्श पॅटर्न’ निर्माण केला. त्याद्वारे संगमनेर शहरातील कोणत्याही नागरीकाला थेट नदीपात्रात जावून बाप्पांचे विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली. तेव्हापासून गेल्यावर्षीपर्यंत सलग सहा वर्ष हाच पॅटर्न राबवला गेल्याने या कालावधीत विसर्जनाला एकाही अप्रिय घटनेची नोंद झाली नाही. मात्र यावर्षी प्रशासनातील अधिकार्यांच्या एकामागून एक बदल्यांचे सत्र सुरु झाल्याने व त्यातच यापूर्वी शहराचा पदभार घेणार्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी ऐनवेळी बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीतून विसर्जनाचा मुख्य भार वाहणार्या बजरंग दल आणि एकवीरा फौंडेशनच्या सदस्यांनाच डावलल्याने चिंता निर्माण झाली होती.
याबाबत दैनिक नायकने सातत्यानेे लिखाण करुन संगमनेरचा विसर्जन सोहळा आणि दरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनांसह 129 वर्षांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रगल्भ परंपरेकडे पोलीस अधिक्षकांचे लक्ष वेधले. पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्यासारख्या आत्मकेंद्री अधिकार्यांमुळे कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या नायकच्या तथ्यावर त्यांनाही भरवसा बसल्याने अखेर त्यांना कार्यमुक्त करुन त्यांच्याजागी धुळ्याहून जिल्ह्यात आलेले रविंद्र देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी दैनिक नायकच्या वृत्तांची दखल घेत गुरुवारी (ता.12) बजरंग दल व एकवीरा फौंडेशनसह मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याशी समन्वय साधला.
यावेळी मुख्याधिकार्यांनी विसर्जनाच्या दिनी मुख्य मिरवणुकीच्या मार्गाला जोडणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय पोलिसांकडून सांगण्यात येईल त्या ठिकाणी बॅरिकेट्स उभारण्याची तयारी असल्याचे व मिरवणुकीच्या मार्गासह नदीपात्राकडे जाणार्या रस्त्यांवरही दिव्यांची व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली. प्रवरा परिसरातील साई मंदिराकडील रस्त्याने विजय घाट व मालपाणी हेल्थ क्लब रस्त्याने गंगामाई घाट या दोनच ठिकाणी विसर्जन करता येणार असून थेट या ठिकाणांपर्यंत वाहने नेता येणार नाहीत. याशिवाय जाणताराजा मैदान व पोफळे मळा या ठिकाणी पालिकेकडून कृत्रिम हौदही तयार करण्यात येणार आहे.
मूर्ती संकलनासाठी क्रीडा संकुलाचे पहिल्या क्रमांकाचे प्रवेशद्वार, बी.एड्.कॉलेज, गणेश गार्डन (गणेशनगर) व साईश्रद्धा चौक येथे केंद्र सुरु केली जाणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी बालम घाटाकडून जाण्याची व्यवस्था असून पालिकेच्या शबनम घाटावर कर्मचारी तैनात असणार आहेत. गंगामाई घाट व विजय घाट येथे घरगुती गणपती बाप्पांच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून एकवीरा फौंडेशनच्या स्वयंसेविका मूर्ती स्वीकारुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवतील. त्यानंतर गटागटाने त्यांची आरती करुन विधीवत वाहत्या पाण्यात त्यांचे विसर्जन केले जाईल. त्यासाठी बजरंग दलाला दोन तराफे, लाईफ जॅकेट, ट्यूब व दोरी देण्यात आली असून नदी परिसरात दिवे सुरु ठेवण्यासाठी जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी बंदोबस्ताची माहिती देताना मुख्य विसर्जन मिरवुणकीचा मार्ग विसर्जनाच्या मध्यरात्रीपासूनच बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. दहा दिवस उत्साहात आणि आनंदाने साजर्या होणार्या गणेशोत्सवाची सांगताही सुखकारक व्हावी यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून गंगामाई घाट व विजय घाट येथे घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाईल. या परिसरात जास्त गर्दी होवू नये यासाठी नदीपात्राकडे वाहने घेवून येणार्यांना साई मंदिराजवळील ओहरा महाविद्यालयाचे प्रांगण व हेल्थ क्लब रस्त्यावरील मालपाणींच्या पार्किंगमध्येच आपली वाहने उभी करता येतील. या दरम्यान कासारवाडीकडे जाणारा रस्ताही सील केला जाणार आहे. नागरीकांनी प्रशासनाच्या सूचनांनुसार विसर्जन करुन सहकार्य करावे असे आवाहनही पोलीस निरीक्षक देशमुख यांनी केले.
नागरिकांना आनंदाने आणि सुरक्षितपणे बाप्पांना निरोप देता यावा यासाठी संगमनेर नगरपरिषदेने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. पालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी जागोजागी कार्यरत राहणार आहेत. लायन्स क्लबच्या सहकार्याने मालपाणी हेल्थ क्लब व स्वामी समर्थ मंदिराजवळ निर्माल्य संकलन केंद्र व जाणता राजा मैदान आणि पोफळे मळा या ठिकाणी कृत्रिम हौदही तयार केला जाणार आहे. नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी सहकार्य करावे.
राहुल वाघ
मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद
‘अपघातमुक्त सोहळा’ समोर ठेवून पोलीस प्रशासन सज्ज आहे. या उत्सवादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही यासाठी शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या शिवाय वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले असून नदीपात्रापर्यंत कोणीही वाहने घेवून येणार नाही यासाठी दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील उत्सवाला मोठी परंपरा आहे, हा उत्सव आनंदाने आणि सुरक्षित साजरा व्हावा यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या केल्या जातील.
रविंद्र देशमुख
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर