कासारवाडीचा बोगदा बनलाय गुटखा तस्करीचा अड्डा! मध्यरात्री पिकअपमधून वितरण; पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनही झोपेत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुटख्याच्या सेवनातून होणार्‍या दुष्परिणामांचा विचार करुन राज्य शासनाने आपल्या शेकडों कोटींच्या महसुलावर पाणी सोडून राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेतला. मात्र एक तपानंतरही प्रशासनाला सरकारच्या त्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करता आलेली नाही. राज्यात गुटख्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करण्यास मनाई आहे. मात्र असे असताना आजही राज्याच्या कानाकोपर्‍यात अगदी सायकल पंक्चरच्या दुकानांपासून चहाच्या टपर्‍यांपर्यंत सर्वत्र त्याची सर्रास विक्री सुरु आहे. यामागे अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांचा छुपा पाठींबा असल्याचे आरोपही झाले आहेत. त्यामुळे बिनधास्त असलेले गुटखा तस्कर यंत्रणांच्या नाकावर टिच्चून गुटख्याची तस्करी करीत असून त्यासाठी महामार्गालगतच्या कासारवाडी बोगद्याचा वापर सुरु झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी याच बोगद्यात महामार्गावरुन दगडं भिरकावून विद्यार्थीनींना जखमी करण्याचा प्रकार घडला होता. आता तेथूनच गुटख्याचे वितरण सुरु झाले आहे.


देशभरासह राज्यातील तरुणांना गुटख्याच्या व्यसनाने विळखा घालण्यास सुरुवात केल्याचे धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर, त्याच्या दुष्परिणांमाचा गांभीर्याने विचार करुन राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करण्यास बंदी घातली होती. तेव्हापासून सरकारच्या मुखी राज्यात गुटख्याचे उत्पादनही होत नाही आणि त्याचे सेवनही केले जात नाही. वास्तव मात्र अगदी उलट असून पूर्वी केवळ पान टपर्‍यांवर मिळणारा गुटखा झटपट लॉटरीसारखा झाल्याने या व्यवसायात अगदी सायकलचे पंक्चर काढणारे आणि चहावालेही उतरले आहेत. त्यामुळे एक तपानंतरही राज्यात सरकारच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसून गुटखा बंदीचा अक्षरशः फज्जा उडालेला आहे.


जिल्ह्यात मध्यप्रदेश व गुजरातच्या दिशेने येणार्‍या महामार्गावरुन गुटख्याची मोठ्या प्रमाणात आयात होते. त्यासाठी पुणे-नाशिक आणि नगर-मनमाड या महामार्गांसह त्यांच्या संलग्न रस्त्यांचा वापर होत असल्याचे वेळोवेळी समोरही आले आहे. त्यासोबतच पूर्वी सातारा औद्योगिक वसाहतीत उत्पादित होणारा मात्र बंदीनंतर कर्नाटकात हलवण्यात आलेल्या ‘हिरा’ गुटख्याचा थेट निपाणीतील कारखान्यातून राज्यभर विनासायस पुरवठा केला जातो. या तस्करीत गुटखा उत्पादक स्वतः आणि वाहतुकदार त्याचा पुण्यातील नातलग आहे. काही वर्षांपूर्वी श्रीरामपूर पोलिसांच्या कारवाईचा तपास या दोघांच्या गळ्यापर्यंत गेला होता. मात्र त्यानंतर आजवर पुन्हा त्यांची नावे कधीही चर्चेत आली नाहीत. त्यावरुन या संपूर्ण तस्करीला कोणाचे समर्थन आहे हे वेगळे सांगण्याची गरज निर्माण होत नाही.


सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित पुरवठादार जिल्ह्यातील मोजक्या तस्करांच्या गोदामापर्यंत मालाचा सुरक्षित पुरवठा करण्याची हमी घेतो. मात्र गोदामातून अन्य व्यापार्‍यांपर्यंत गुटखा पोहोचवण्याची जोखीम जिल्हा वितरकावर असते. त्यासाठी तो स्थानिक यंत्रणांशी जुळवण्याचा प्रयत्न करतो व तालुकानिहाय, शहर व गावनिहाय तस्करांना नियुक्त करुन त्यामार्फत गुटखा तस्करीची साखळी चालवतो. याचाच अर्थ माल कधी येणार आणि कोठून येणार याची कदाचित यंत्रणांनाही पूर्व कल्पना असावी. असाच संशय निर्माण करणारा प्रकार बुधवारी (ता.11) रात्री साडेअकराच्या सुमारास दिसून आला.


प्रस्तूत सूत्र मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या खासगी वाहनाने पुण्याहून कासारवाडीच्या पुलावर आल्यानंतर वळण घेवून उपरस्त्याने कासारवाडीत आले. यावेळी महामार्गाच्या बोगद्याखालून जात असताना त्यांना अंधारात संशयीतपणे उभा असलेला पांढर्‍या रंगाचा पिकअप टेम्पो आणि त्याभोवती दुचाकी चारचाकी वाहनधारकांची वर्दळ दिसली. त्यामुळे त्यांनी आपल्या वाहनाचा वेग कमी करुन काय सुरु आहे याची चाचपणी केली असता पिकअपमध्ये खचाखच गुटख्याच्या गोण्या भरलेल्या असल्याचे व गर्दी करणारी मंडळी किरकोळ विक्रेते असल्याची बाब प्रकर्षाने दिसून आली.

कोणी एक गोणी घेत होतं, तर कोणी चार. कोणाच्या दुचाकीवर आधीच एखादा जोडीदार तर, कोणीतरी एकटाच दोराने गोण बांधतोय. काहीजण सोबत आणलेल्या अलिशान कारमध्ये दोन-चार अशा संख्येने गुटख्याच्या गोण्या भरीत असल्याचे चित्रही यावेळी दिसून आले. यातील एकाच्याही चेहर्‍यावर पोलीस अथवा अन्न व औषध प्रशासनाच्या भीतीची एकही लकेर नव्हती. त्यावरुन त्यांना यंत्रणांचे पाठबळ असल्याचेही स्पष्ट दिसतं होतं. जवळपास अर्धातास सुरु असलेल्या गुटखा वितरणाच्या या खेळात भरलेला अख्खा टेम्पो खाली झाला आणि शहरातील टपर्‍यांटपर्‍यांवर तो अगदी सहज पोहोचला.


श्रीरामपुरातील एकरुखे येथील गुटखा गोदामावरील छाप्यानंतर पोलिसांच्या तपासाने थेट हिरा गुटख्याचा मालक आणि त्याचा पुण्यातील मेव्हणा तपास यंत्रणांच्या रडारवर आले होते. त्यांची नावे समोर आल्यानंतर काही दिवस मोठा धुरळाही उडाला, मात्र आता या गोष्टीला वर्षे लोटूनही त्यांची नावे पुन्हा चर्चेत आली नाहीत. गुटख्याच्या सेवनाने होणारे गंभीर परिणाम राज्यात गुटखा बंदी करण्यास कारणीभूत ठरले खरे, त्यासाठी राज्य शासनाने आपल्या कोट्यवधीच्या महसुलावर पाणीही सोडले. मात्र यंत्रणातील हे दोन घटक गुटखा तस्करांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याने जिल्ह्यात आजवर कधीही गुटखाबंदी दिसून आली नाही.

Visits: 61 Today: 2 Total: 65902

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *