विकासापेक्षा धर्माच्या नावावर होणारे राजकारण दुर्देवी ः थोरात वडगाव पान येथे भीम प्रतिष्ठानच्यावतीने संविधान स्तंभाचे लोकार्पण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अनेक विकासकामांना मोठी गती दिली आहे. आपल्या भागाला वरदान ठरणार्या निळवंडेच्या कालव्यांची कामे रात्रंदिवस अत्यंत वेगाने सुरू असून येत्या ऑक्टोबरमध्ये डाव्या व उजव्या दोन्ही कालव्याद्वारे पाणी आणण्यासाठी काम होत आहे. तालुक्यात सर्वांना समान संधी देत विकासाची घोडदौड कायम असून देशात सध्या जाती-धर्माच्या नावावर होणारी राजकारण दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेे.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे भीम प्रतिष्ठानच्यावतीने संविधान स्तंभाचा लोकार्पण सोहळा व विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते. तर व्यासपीठावर दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, महेंद्र गोडगे, बेबी थोरात, सुभाष सांगळे, बाळासाहेब गायकवाड, सरपंच श्रीनाथ थोरात, पद्मा थोरात, उपसरपंच सोमनाथ गायकवाड, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीलेश थोरात, गौरव डोंगरे, बाळू फकीरा गायकवाड, आदित्य गायकवाड, सागर गायकवाड, सुनील गायकवाड, जनार्दन गायकवाड, अन्वर तांबोळी, रावसाहेब जंबूकर आदी उपस्थित होते. यावेळी वडगाव पान-जोर्वे, काशिद वस्ती या रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
समाजातील अघोरी परंपरांविरुद्ध सर्वप्रथम भगवान बुद्धांनी आवाज उठवला. समतेच्या या परंपरेचा प्रसार विविध संतांनी केला. या समानतेच्या तत्वांना एकत्र आणण्याचे काम राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांनी जगाला सर्वात मोठी लोकशाही दिली असून समतेच्या अधिकारामुळे गरीब-श्रीमंती असा भेद लोकशाहीत नाही. भारतीय लोकशाही ही आपल्या सर्वांची ताकद आहे. मात्र सध्या देशामध्ये धर्माच्या नावावर राजकारण होत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. जातीपातीचे राजकारण करून मनभेद निर्माण केले जात आहे. याविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन मानवता या धर्मासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. स्वागत उपसरपंच सोमनाथ गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक बाळासाहेब गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार प्रदर्शन भालचंद्र गायकवाड यांनी केले.