येठेवाडी येथील जळीतग्रस्त मधे कुटुंबाला ‘आधार’! संसारोपयोगी साहित्यासह दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत


नायक वृत्तसेवा, घारगाव
शुक्रवारी भर दुपारी येठेवाडी (कर्जुले पठार, ता.संगमनेर) येथे विलास लहानू मधे यांच्या राहते घर आगीत खाक झाले. त्यानंतर संगमनेरातील आधार फाउंडेशनला या घटनेची माहिती मिळताच जळीतग्रस्त कुटुंबाला संसारोपयोगी साहित्यासह मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत केली.

घराला आग लागली त्यावेळी घरात झोपलेल्या आजीबाई मीनाबाई काळे या बालंबाल बचावल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, सर्व संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. ही घटना आधारचे समन्वयक सोमनाथ मदने यांना समजल्यानंतर तातडीने ग्रामसेवक अतीफ शेख व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष किरण भागवत यांच्याशी संपर्क साधून आधार फाउंडेशन व संत गाडगेबाबा सेवा प्रतिष्ठान संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विलास मधे यांच्या कुटुंबियांना सर्व संसारोपयोगी साहित्य, किराणा, सातवीतील दोन विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य, अंथरूण-पांघरूण साहित्य व महिलांना साड्या देण्यात आल्या.

याप्रसंगी किरण भागवत, उपसरपंच विनायक गुंजाळ, पिंपळगाव देपा सोसायटीचे अध्यक्ष उत्तम वाळुंज, गंगाधर आगलावे, संत गाडगेबाबा भानूप्रभाकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. चं. का. देशमुख, आधारचे समन्वयक सुखदेव इल्हे, सोमनाथ मदने, संजय जाधव, लहानू मधे व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. आधारचे सुखदेव इल्हे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. आधार व गाडगेबाबा प्रतिष्ठानच्या मदतीबद्दल किरण भागवत यांनी दोन्ही संस्थांचे आभार मानले.

सातवीतील विशाल व आरतीचे दप्तर जळून खाक झाल्याने ते चिंतेत होते. परंतु, नवी सॅक, कोर्‍या वह्या, कंपास व इतर साहित्य हाती पडताच त्यांचा आनंद द्विगुणित झाला. आगीतून बालंबाल बचावलेल्या आजी मीनाबाई काळे देखील ही सर्व मदत पाहून भावूक झाल्या.

Visits: 203 Today: 1 Total: 2165908

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *